Monday, August 30, 2010

असेच... नेहमी ..आयुष्यावर बघू ( बोलू) काही .


कार्यक्रम- आयुष्यावर बोलू काही
 दिनांक रविवार २९ ऑग २०१०- 
वाहिनी -   झी  मराठीवर झाला, ( होत असतो )
                बाजारात सी डी उपलब्ध आहे
 सलील आणि संदीप यांची बहारदार मैफल 
कालच संध्याकाळी झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी हा कार्यक्रम पुन:प्रक्षेपित करण्यात आला आणि या कार्यक्रमाबद्दल कुठेतरी लिहावे असे वाटले म्हणून हा  छोटासा प्रयत्न ..
आजकाल अभिरुचीसंपन्न साहित्य, कविता ,गाणी हवी असतील तर आपल्याला जुन्या लेखकांच्या दुनियेत जावे लागते किंवा जुन्या ध्वनिमुद्रित गीतांकडे वाट वळवावी लागते असे जर आपणास वाटत असेल, तर कदाचित ही समीक्षा आपल्याला काहीसे आपले मत बदलायला लावेल पण वेगळ्या पण तितक्याच अभिरुचीच्या जगात जायची वाट दाखवेल.
डॉ सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी सुरु केलेल्या " आयुष्यावर बोलू काही " या कार्यक्रमाबद्दल जर सांगयचे झाले तर हा एक अभिरुचीसंपन्न आणि दर्जेदार मैफिल आहे जी काही काळ आपल्याला जगण्याच्या सर्व क्षणांची अलवार अशी आठवण करून देते.त्यावर प्रेम करायला शिकवते.
झी मराठीने ५०० वा विशेष भाग विशेष निर्मित करून गेल्या वर्षी आपल्या समोर सादर केला. आणि अगदी २ वेळा थेट कार्यक्रम बघणा-या लोकांनीही तितक्याच आवडीने  हा कार्यक्रम पहिला .
विशेष म्हणजे सलील आणि संदीप यांच्या जोडगोळीबरोबर बेला शेंडे यांची गीते , सुनील बर्वे यांचे निवेदन यामुळे या कार्यक्रमाची लज्जत आणखीनच वाढली.
शिवाय काही मातब्बर मंडळी , सोनाली कुलकर्णी मधुरा वेलणकर यांसारखी नयन सुखवर्धक उपस्थिती कानाबरोबर डोळ्यानाही सुखावण्याची काळजी घेत होती हे ही इथे सांगावेसे वाटते . 
हा कार्यक्रम एखाद्या निरस माणसाला सुद्धा कवितेबादल प्रेम नाही तर आदर तर  नक्कीच निर्माण करत असावा.
तसा आयुष्यावर बोलू काही नवीन असतानाच पुण्यात मी एका छोट्या सभागृहात पाहिला होता. " मी मोर्चा नेला नाही" नामंजूर , लव लेटर , या सारख्या कवितांना मिळणारा तरुणाईचा ( माझा सुद्धा-- कारण मी सुद्धा तरुणच आहे ) प्रतिसाद पाहून कुठेतरी कळून गेले की यांची फ्यान मंडळी हि बरेच आहेत.आणि ही वाढतच जाणार आहेत 
 हा कार्यक्रम नुसताच तरुण लोकांचा तरुण लोकांसाठी  आहे असे नाही , सलील आणि संदीप यांनी हा कार्यक्रम त्यांच्या नवीन अल्बम आणि चित्रपट गीतांनी नित्य नूतन बनवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ढीपरी  ढिपांग, अग्गोबाई ढग्गोबाई , निशाणी डावा अंगठा या मधल्या काही वेगळ्या पण श्रवणीय अशा गीतांनी अबालवृद्धाना आवडणारा बनतो आहे.
या कार्यक्रमात गायलेले "बाबांची कहाणी" बघितल्यावर भावपूर्ण गीतांना भाडोत्री अश्रूंची गरज नसते हे कुठेतरी जाणवून जाते. आणि कदाचित टी वी वाहिन्यांसाठी ही पर्वणी आणि आश्चर्याची बाब असे दोनीही ठरली असावी
. हा कार्यक्रम म्हणजे मला माझ्या पुण्यातल्या होस्टेल जीवनासारखा पुढे जातो असे वाटते.. सकाळी उठावे बेडेकर मिसळ खावी मग, बादशाही मध्ये जेवण नंतर फुलचंद पान ,संध्याकाळी हिंदुस्तान बेकरीची प्याटीस, आणि रात्री प्रभातचा सिनेमा किंवा बालगंधर्वला नाटक अगदी पुणेरी आणि साधा वाटला तरी अस्सल मराठमोळा आणि लज्जतदार अनुभव ... अगदी तसाच अनुभव या कार्यक्रमात येतो .
 आता मी इतर कार्याक्रमंवर टीका म्हणून नाही पण सांगतो प्रत्येक कार्यक्रमला आपला एक बाज असतो आणि तो तसाच पुढे जातो आणि संपतो. पण वैविध्य टिकवणे आणि सर्वाना ते आवडणे हे खूप अवघड असते
 आणि " आयुष्यावर बोलू काही" मध्ये चपखलपणे हे सलील आणि संदीप साधून जातात. 
आता या कार्याक्रमची सी डी बाजारात आली आहे पण तरीही मला सांगवेसे वाटते एखादी संध्याकाळ, अगदी दिवसही चालेल पण आयुष्यावर बोलू काही आपल्या शहरात आल्यास चुकवू नये .
प्रेमभंग असो की प्रेमात रंग असो , तरुण असो की म्हातारा , मित्रांची टोळी असो की मैत्रिणीची टाळी, हा कार्यक्रम कुणाबरोबर ही बघता येईल त्याचा आनंद लुटता येईल.  या कार्यक्रमाबद्दल मला वेगळेसे सांगावे लागणार नाही पण इतर शहरात, भारताबाहेर आपल्याला हा कार्यक्रम माहित नसेल तर हा अवश्य पाहावा .. 
म्हणूनच म्हणतो जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही .. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही...
जयदीप भोगले
३० -०८-२०१० 
 
 


2 comments:

  1. सलील आणि संदीप सुंदर..अप्रतिम आहेत हे दोघे..लेख ही छान..

    ReplyDelete

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...