Tuesday, October 19, 2010

निवड तुमची .. आवड महाराष्ट्राची - आली वेळ झी मराठी अवार्ड्सची


रसिकांच्या मनावर राज्य करणा-या आणि ११ वर्षे पाय रोवून करमणुकीत एक नवीन टप्पा गाठणार-या झी मराठी वाहिनीने नेहमीच आपल्या मनावर,आणि हो आपल्या टी वी च्या रिमोट वर, आणि आपसुखच  आपल्या हॉलवर ही   राज्य केले आहे ..
कार्यक्रमांची विविधता आणि त्याची गुणवत्ता टिकवत नेहमी काहीतरी नवीन कार्यक्रम आपल्यासमोर आणले. आपल्यासमोर रोज येऊन आपले मनोरंजन करणारे आपले कलाकार त्यांच्या व्यक्तिरेखा या कुठेतरी वाखाणल्या जाव्यात त्यांच्या 
कार्यक्रमांना कुठेतरी पावती मिळावी म्हणून सात वर्षापुरी आपला अल्फा अवार्ड आणि आता झी मराठी अवार्ड याच्या रूपाने आपल्यासमोर आणला .आता तोच अवार्ड लवकरच मुंबईत संपन्न होणार आहे आणि कदाचित महिना अखेर बहुतेक ३० तारखेला त्याचे प्रक्षेपण होणार आहे. 
झी मराठी अवार्ड नेहमी रविवारी ७.३० वाजताच दाखवला जातो त्यामुळे प्रत्येक रविवारी टी वी समोर जाऊन बसले कि काम झाले मग कधी येणार नाही की नाही त्याचे काही मला फार विशेष महत्व वाटत नाही.
 झी मराठी अवार्ड मध्ये वेगवेगळ्या गटात कलाकारांना पुरस्कृत केले जाते उदा. व्यक्तिरेखा , उत्तम जोडी , भाऊ बहिण , कुटुंब , खलनायक , कथाबाह्य कार्यक्रम ..इत्यादि 
याचे निवेदन आणि संचलन ही एखादी जोडी करते .. एकदा अतुल परचुरे आणि सुमीत होते मागच्या वर्षी पुष्कर आणि निर्मिती 
झी मराठी अवार्ड अवार्ड बरोबर बरेच काही असते .. त्यातल्या निवेदकांच्या कॉमेंट , विनोद , मधल्या नाट्यछटा ,गाणी, नाच सर्वच भन्नाट असते  
मी हा कार्यक्रम दोन वर्षापूर्वी म्हणजे अतुल परचुरेच्या वेळी थेट पहिला होता . तो कार्यक्रम मला आजही लक्षात आहे .. त्यावेळी वाहिनीचा लाडका आदेश भाऊजी प्रेक्षकांमधून स्टेजवर आला होता आणि तेथून जो कार्यक्रम रंगला .की सांगायला शब्द नव्हते ..तेव्हा  मी पुन्हा टी वी वर तो पहिल्यापासून जाहिरातींना ना टाळता  रिमोटला न हात लावता पाहिला का ? अहो कुठे मी दिसतो का हे पाहण्यासाठी .. पण तिथे कित्तेक उत्तम चेहरे असताना माझ्या चेहऱ्यावर कॅमेरा यायला न मी प्रमुख पाहुणा आणि ना कलाकार .. पण असे नाही बर का की सामान्य प्रेक्षक दिसत नाहीत .. माझी बहिण तर दोनदा तीनदा गेली होती कार्यक्रमाना आणि सगळ्या वेळी दिसली असो ...
यावेळी मला काही व्यक्तिरेखा विशेष वाटतात .. मनु- लज्जा , बाप्पाजी - भाग्यलक्ष्मी ( ह्यांना मला बघून जाम हसू येते म्हणून मी पाहतो) 
नंतर फु बाई फु , सा रे ग म प , आणि जोडी तर माझिया प्रियाची या वेळी अवार्ड घेऊन जातील असे दिसते
शीर्षक गीत लज्जा आणि माझिया प्रिया दोन्ही मस्त आहेत पण माझिया प्रिया ला मिळेल वाटते, कारण  लोकल लोकल मध्ये मला त्याची रिंग टोन ऐकू येते ..
पण या बरोबर नाट्य छटा , गाणी , नाच पाहण्यासाठी हा टी वी वर पाहायला मजा येते आणि यावेळी सुद्धा येईल
मी तर वाट पाहणार आहे आणि तुम्ही ...

जयदीप भोगले
१९  . १० . २०१०  

Friday, October 15, 2010

करमणुकीची सरबत्ती --- कौन बनेगा करोडपती


 कार्यक्रम- कौन बनेगा करोडपती 
वेळ- ९.००-१०.००
वाहिनी- सोनी 
पहावा की नाही - अवश्य पहा ..
स्टार वाहिनीवर सुरवात करून स्टार आणि अमिताभ या दोघांनाही लोकप्रियतेच्या उच्चांकाला नेणारा  सर्वांचा लाडका प्रश्नोतरांचा कार्यक्रम कौन बनेगा करोडपती याने सोनी या वाहिनीवर  या सोमवारपासून नवीन सुरवात नाही तर शुभारंभ केला ( कॅडबरी चोकलेट हे याचे प्रस्तुतकर्ता आहेत .)
चुरशीच्या लढाईमुळे हाच कार्यक्रम शाहरुख खान याने काही काळ सुत्रसंचालीत केला होता .. बादशाह आणि बिग बी यांची चढाओढ कितीही रंजित केली तरी यावेळी मात्र आपल्या हिंदुस्तांनाच्या नव्हे तर प्रत्येक भारतीय मनावर राज्य करणाऱ्या श्री अमिताभ बच्चन यांनी सूत्र पुन्हा आपल्या हाती घेतली ..
यातच आता ही चुरशीचे पारडे कुणाकडे झुकले हे काही वेगळे नमूद करावे असे मला वाटत नाही. असो मोठ्यांच्या वादात आपलं विषयांतर नको .
सोनी वाहिनीवर जरी हा प्रोग्राम नव्याने  सुरु झाला तरी यात काही लाइफ लाईन  सोडल्या तर फार बदल नाहीत ..
पण अमिताभ बच्चन यांची पुन्हा एकदा भेट हेच प्रमुख आकर्षण आहे. 
आता लोकांनी कितीही सांगितले कि आता तो तोच तोच पणा वाटतो .. आता ती एनर्जी नाही .. अजून पुष्कळ कार्यक्रम पाहण्यासारखे आहेत. पण बच्चनची मजा काही वेगळीच
पहिल्याच भागात त्यांनी अग्निपथ आणि दिवार याचा संवाद सादर केला आणि जिंकले .. कदाचितच  इतकी इंटेन्स डिलेव्हरी कुणी दुसरे करू शकते .
अमिताभ बच्चन ज्या पद्धतीने आपल्या समोर बसलेल्या जन सामान्याला वागवतात, त्याचाशी संवाद साधतात , त्याचा आनंदाशी कुठेही वरचढ न होता एकरूप होतात हे वाखाणण्यासारखे आहे आणि हे या खेळाचे वैशिष्ट्य .. आणि कदाचित प्रश्नापेक्षा मला हेच पाहायला जास्त आवडते .
या वेळी एक्स्पर्ट पाहुणा एक नवीन भाग आहे आणि ते सुद्धा चपखलपणे बसवले आहे .
प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असल्यामुळे प्रत्येक जिंकलेल्या रकमेत आपल्याला उत्तर माहिती असेल तर आपणही जिंकू शकलो असतो ही हुरहूर प्रत्येक दर्शक करत असावा ..
शिवाय मी याबद्दलच्या चर्चा  जुन्या करोडपति  मध्ये तर रस्त्यावर, पानाच्या गादीवर, किराणा दुकानावर सुद्धा ऐकल्या आहेत ..त्यामुळे कोण स्पर्धक किती छान दिसतो पासून कोण किती बावळट ,निर्बुद्ध, ढ अशा सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया आपण कितीही सुमार बुधिमत्तेचे असलो तरी आपण मस्त ठोकून देऊ शकतो कारण आपल्याला उत्तर काय.. हे माहिती होते,
 अणि ही याची गम्मत आहे .
या कार्यक्रमाने स्लम डॉग ला सुद्धा मदतीचा हात दिला आणि त्या सिनेमात सुद्धा करोडपती हा महत्वाचा भाग होता.
याच कार्यक्रमाने कितीतरी क़्विज शो , विडम्ब्ने आणली .. प्रत्येक कॉमेडी कार्यक्रमात बच्चनची नक्कल केली जाऊ लागली 
कदाचितच इतकी लोकप्रियता आणि त्यावर भाजून घेतलेल्या पोळ्या दुस-या कुठल्या कार्यक्रमात झाल्या असतील असे मला वाटत नाही  ...
आणि सोनी वाहिनीसाठी प्रतिस्पर्धी बिग बॉस हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे  सोनी ला टी आर पी साठी फायदाच होईल नव्हे एव्हाना झाला असेल 
पण दूसरा हुशार मुलगा अजारी पडला म्हणून मी पहिला आलो असा कार्यक्रम करोडपति नक्कीच नाही .. आणि इतर चांगले काही नाही म्हणून बच्चन ला बघू असे दिवस किंवा दर्जा बच्चन साहेब कधीही येऊ देणार नाहीत ..
म्हणुनच सांगतो बच्चनच्या चाहत्यानी , मला लॉटरी लागली तर असे स्वप्न रंगवणा-या स्वप्नाळू दर्शकांनी ..,बरबटलेल्या कार्यक्रमातून आपल्या मुलाला कसे वाचवावे या विचारात असणा-या पालकांनी , आणि आमच्यासारख्या चूक की बरोबर ,चांगले की वाईट अशी उठाठेव करणार-या समीक्षकांनी कौन बनेगा करोडपती अवश्य पाहावा
नाराजी होणार नाही एवढी खात्री .. बाकी आपण सुज्ञ आहात ..
तो चलिये आप और हम देखते है दुनिया का अदभूत खेल ,, जिसका नाम है  -- कौन बनेगा करोडपती ....
 
जयदीप  भोगले
१५ .१० .  २०१० 

Thursday, October 14, 2010

मला भावलेले चित्रपट का पहावेत ? (भाग ५)

मित्रांनो ,




जगाच्या पाठीवर १९६०
दिग्दर्शक- राजा परांजपे 
संगीत- सुधीर फडके
पटकथा आणि गीते - ग दि माडगुळकर
कलाकार- राजा परांजपे , सीमा देव, धुमाळ
ह्या चित्रपटाचे मी लहानपणी पाहिलेले पोस्टर आठवते ... जगाच्या पाठीवर  लिहिलेले नाव आणि एका पेक्षा सुमधुर अशा गीतांची नावे असे या पोस्टर चे स्वरूप हिते
या वरूनच तुम्हाला कल्पना आली असेल कि या चित्रपटाची अजरामर बाजू याच्या गीतांमध्ये आहे.
मागे म्हटल्या प्रमाणे  सोप्या चालींची अवीट  गोडीची गाणी म्हणजे बाबूजींची गाणी .. आणि आधुनिक वाल्मिकी - गदिमांनी त्या गीतांचा प्राण म्हणजेच त्याचे शब्द असे रचले आहेत कि त्याबद्दल चांगले किंवा वाईट म्हणणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखे होईल त्यामुळे या दोघांना त्रिवार वंदन ...
गीतांबरोबर तितकीच   ह्रदयस्पर्शी पटकथा दर्जेदार मन हेलावून टाकणारे कलाकारांचे अभिनय यामुळे सुद्धा हा चित्रपट मनात कायमचे घर करून जातो .
बाबूजींच्या गीतांसाठी हा चित्रपट संग्रही ..




सांगत्ये ऐका -१९५९
दिग्दर्शक- अनंत माने 
कलाकार - जयश्री गडकर , सुलोचना , दादा साळवी , चंद्रकांत ,सुर्यकांत
सांगत्ये ऐका आणि जयश्री गडकर एक समीकरण आहे .. आठवणीतील चित्रपट आणि एखाद्या कलाकारासाठी लक्षात राहणारे काही चित्रपट असतात तर जयश्री गडकर यांच्यासाठी  हा सिनेमा लक्षात राहतो
चित्रपटाची कथा ग्रामीण पठडीतली व प्रभावी अशी आहे .
तमाशाप्रधान चित्रपटांच्या यादीत अव्वल असणा-या यादीत या चित्रपटाचे नाव मी पहिल्या तीनात नक्की ठेवले असते
बुगडि माझी .. आणि क्लाय्मक्स चा  तमाशा  अतिशय सुन्दर आहेत .

श्यामची आई - १९५३
दिग्दर्शक- प्र के अत्रे
कथा - साने गुरुजी 
कलाकार -वनमाला , माधव वझे , दामुनाना जोशी
श्यामची आई या साने गुरुजींच्या आत्म्चारीत्रावरून ह्या चित्रपटाची निर्मिती झाली.
श्यामची आई हे पुस्तक प्रत्येक मराठी मनात आई आणि मुलाबद्दल च्या नात्याबद्दल आदर निर्माण करते .या चित्रपटाला पहिले भारताबाहेरील सुर्वण कमळ देऊन गौरवण्यात आले . याला राष्ट्रीय पुरस्कार हि देण्यात आला .आजच्या पैशाच्या मागे लागलेल्या जगाला गरिबीत सुद्धा आपली मूल्य ढळू कशी देऊ नये हे हा चित्रपट शिकवून जातो.
प्रत्येक  मुलाने आपल्या आई बाबा बरोबर  पहावा असा चित्रपट ..


कुंकू  १९३७ 
दिग्दर्शक - वी शांताराम 
कलाकार- केशवराव दाते , शांता आपटे, शकुंतला परांजपे 
संगीत- केशवराव भोले 
मला हा चित्रपट एक सामाजिक चित्रपट म्हणून आणि कथानकाच्या पुरोगामी विचारसरणी या मुळे जास्त आवडतो. 
हा चित्रपट मी अगदी अलीकडे पहिला आणि मला कथानक अजिबात माहिती नव्हते .. पण चित्रपट पाहिल्यावर त्यातला अभिनय आणि कथानकामुळे मी फार प्रभावित  झालो . समाजप्रबोधन म्हणून ज्यावेळी चित्रपट बनवले जायचे त्यावेळी अशा पध्दतीची मांडणी अतिशय धाडसी वाटते ..
प्रभातच्या निर्मितीला सलाम..

संत तुकाराम - १९३६  

दिग्दर्शक- विष्णुपंत   गोविंद दामले  , फत्तेलाल 
कलाकार - विष्णुपंत  पागनीस , श्री भागवत , गौरी 
संत तुकाराम हा चित्रपट हा त्यातल्या संत भावासाठी बघावा .. कदाचित खरे तुकाराम कसे असतील जर कुणाला प्रश्न पडत असेल तर त्यांनी हा चित्रपट पाहावा.
माझी आजी हा चित्रपट पाहायला सिनेमागृहाच्या बाहेर चप्पल ठेऊन गेली होती  .. त्यात त्या काळातल्या साध्या प्रवृत्तीचे आणि त्या चित्रपटाच्या खरेपणाचे चित्र आपल्याला समजू शकेल.
प्रभात ची अजून एक अविस्मरणीय भेट


इतके दिवस आपल्यासमोर मला आवडलेले चित्रपट टप्प्या टप्प्याने सादर केले . कदाचित आपल्याला सुद्धा हे नक्कीच आवडतील अशी आशा करतो .
या लेखाला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आभार .
आपली मराठी चित्रपट सृष्टि अशीच समृद्ध रहो हीच सदिच्छा 

जयदीप भोगले 
१४.१०.१०
चित्रपट , कथानक ,प्रभात , फत्तेलाल , लेख  


Monday, October 4, 2010

निरोप

अखेरची ही साद तुला सखे
तुझा गाव सोडतो आहे
तू नसशील परी मन तुझा निरोप घेऊ पाहे
       
आता दिसणार नाही ती साउली
       फ़क्त स्वप्नात शोधणार आहे
       आयुष्याच्या उंब-यावर जणू तुझी वाट पाहणार आहे


मध्यानेची रखरख ही तुझ्या केसात श्यामल   झाली
आता पहाटेचा गारवा जणू दाह पोचवणार आहे

तू काचेच्या महालात मी फुलांच्या कुंपणात आहे
दोघे जणू मुक्त पण मन बंदिवान आहे
   
आता विचार नको प्रिये काय होते काय होणार आहे
   जुनी पाने गळतात  तेव्हा नवीन पालवी येणार आहे

  जयदीप भोगले   
१० मे २००२

Friday, October 1, 2010

मला भावलेले चित्रपट - का बघावेत ? ( भाग ४)




सिंहासन - १९८०
दिग्दर्शक - डॉ. जब्बार पटेल
संगीत - प. हृदयनाथ मंगेशकर 
कलाकार- अरुण सरनाईक , निळू फुले , सतीश दुभाषी ... आणि इतर सर्व मात्तबर मंडळी ...
सिंहासन हा अरुण साधू यांच्या मुंबई दिनांक आणि सिंहासन या कादंबऱ्यांवर आधारित सिनेमा आहे . मल्टी स्टार चित्रपात मराठी मध्ये जरा बोटावर 
मोजण्या  इतकेच आहेत त्यापिकी हा एक . ७० च्या दशकात रंगमंच गाजवणारे सर्व कलाकार एकत्र येण्याची पर्वणी या चित्रपटात घडून आली .
हा चित्रपट मला कोल्ड सिनेमा या धर्तीचा वाटतो . फार तद्काहेबाज संवाद नसूनही सिनेमाची पकड सुटत नाही .
धुरंदर आणि वास्तववादी राजकारणावर प्रकाश टाकणार चित्रपट .राजकारण . समाजकारण , कामगार संघटना यांचे तिरंगी बंडाळी यात दिसते  
या सर्व कलाकार मंडळींसाठी संग्रही ठेवावा असा चित्रपट 

हा खेळ सावल्यांचा १९७४
दिग्दर्शक -वसंत  जोगळेकर
कथा - मधुसूदन कालेलकर
संगीत - प. हृदयनाथ मंगेशकर
कलाकार- काशिनाथ घाणेकर, आशा काळे ,धुमाळ , राजा गोसावी
मराठी चित्रपट सृष्टीत भयपट आणि सस्पेन्स चित्रपट खूपच कमी झाले . पारध, अशी एक रात्र होती, एक रात्र मंतरलेली , झपाटलेल्या बेटावर,  पण पारध सोडता बाकी सगळे सुमार होते ..
उत्तम गाणी आणि खिळवून ठेवणारी कथा या मुळे हा चित्रपट एक उत्तम  भयपट म्हणून संग्रही हवा   
आशा काळे मला यात विशेष आवडली .. आणि गाणी तर मला वेगळे काही सांगायला नको अशीच आहेत 

सामना - १९७४ 
दिग्दर्शक- डॉ जब्बार पटेल
कथा आणि संवाद- विजय तेंडूलकर 
कलाकार - निळू फुले , डॉ श्रीराम लागू 
सामना हा चित्रपट मला या पूर्ण यादीत सर्वात जास्त आवडतो . दोन व्यक्ती आणि व्यक्तिमत्वाची झुंज . विजय तेंडूलकर यांची कथा आणि अतिशय प्रभावी संवाद, निळूभाऊ आणि डॉ लागू यांची कदाचित सर्वोत्तम ठरावी असा अभिनय आणि संवाद शैली .
हिंदुराव पाटील आणि मास्तर ( विफल गांधीवादी ) या व्यक्तिरेखा कदाचितच कुणाला अजून उत्तम रंगवता येतील किंवा आल्या असत्या. 
प्रत्येक बाबतीत हा चित्रपट सरस आहे .. हा चित्रपट रिलीज झाल्यावर ज्यांनी हा पडद्यावर पहिला मला त्यांचा हेवा वाटतो . या चित्रपटाशी निगडीत सर्व व्यक्तींना माझं त्रिवार वंदन 
प्रत्येक मराठी माणसाने  उत्तुंग आणि आंतरराष्ट्रीय  दर्जाचा मराठी चित्रपट( छायाचित्रण सोडून) म्हणून हा संग्रही ठेवावाच ...




पिंजरा - १९७२
दिग्दर्शक- वी शांताराम
संगीत- राम कदम 
गीते - जगदीश खेबुडकर 
कलाकार- श्रीराम लागू, निळू फुले, संध्या 
सामनाच्या दर्जाचा हा अजून एक चित्रपट . पिंजरा हा चित्रपट न ऐकलेला मराठी माणूस मी अजून पाहिलेला नाही .उत्तम लावण्या ( संगीत आणि गीते या दोन्हीही तितक्याच दर्जेदार ) आणि अभिनय याने नटलेला  हा एक चित्रपट
या चित्रपट मला तर  लागूंच्या व्यक्तिरेखेच्या होणा-या दैनेबद्दल डोळ्यात पाणी येते . काही काही डायरेक्शन सीन  अविस्मरणीय आहेत . राम कदम आणि जगदीश खेबुडकर यांनी या चित्रपटाचे सोने केले
सर्व दृष्टीने पंचतारांकित सिनेमा .. शांताराम बापूंच्या सिनेमा चाहत्यांच्या संग्रही असावा असा चित्रपट ..

सोंगाड्या - १९७०
कलाकर - दादा कोंडके , उषा चव्हाण , निळू फुले
संगीत - राम कदम
हा चित्रपट मी दादा कोंडके याच्या जयंतीदिवशी प्रभात सिनेमा पुणे इथे पहिला साल २००३ , आणि विशेष म्हणजे हाउसफुल ,. आणि आम्ही पहिल्या रांगेतून  पहिला.
दादांच्या  झंजावाती युगाची सुरवात करून  देणारा  चित्रपट . या नंतर दादांनी मराठी गावरान मेवा दिला ते काही सांगायची गरज नाही .
राम कदम यांचे संगीत, दादांची अफलातून अदाकारी. आणि कृश्न्धवल असून रंगीत वाटणारी गाणी यामुले हा चित्रपट अवीट गोडीचा आहे.


मुंबईचा जावई - १९७०
संगीत - सुधीर फडके
गीतकार- ग दि माडगुळकर 
हा चित्रपट तसा अगदी नेहमीच्या पठडीतला पण .  १९७० मध्ये मुंबईच्या चाळकरी जीवनतील गमती जमती आणि त्यातून फुलणारी कौटुंबिक प्रेमकथा हा विषय मस्त होता .
याची गाणी मला कधीही ऐकायला आवडतात .. साधी आणि सोपी गाणी कशी अवीट करावीत यात बाबुजींचा हात कुणीच धरू शकणार नाही,
संगीतासाठी चित्रपट संग्रही
.. आवडते गीत आज कुणी तरी यावे आणि प्रथम तुज पाहता ..

एकटी १९६८ 
निर्माता - राजा ठाकूर 
दिग्दर्शक - चौगुले 
नावाप्रमाणेच हा  चित्रपट म्हणजे आतडे पिळवटून टाकणारा सुलोचनाबाईंचा अभिनय ... खूप लहानपणी पाहिलेला चित्रपट ...
आईवेड्या मुलाने हा चित्रपट पाहून जर डोळ्यात पाणी आले नाही तर शपथ .... म्हणजे इतर लोकांनाही तितक्याच भावना आवरणार नाहीत हे ही खरे !!१
इथून दृष्ट काढते .. हे गीत ..तर लाजवाबच आहे ...मला मोलकरीण या चित्रपटापेक्षा हा चित्रपट जास्त वास्तव वाटतो म्हणून मी याला जास्त झुकते माप दिले ..

हा माझा मार्ग एकला  १९६४ 
दिग्दर्शक - राजा परांजपे
कलाकार - सचिन ( बालकलाकार ) राजा परांजपे 
हा चित्रपट एका बालकलाकाराचा म्हणालात तरी चालेल .. काही अफलातून छायाचित्रीत सीन्स , उत्तम गाणी . राजा परांजपे यांचा उच्च अभिनय 
आणि हळुवार पण कष्टी करणारी कथा ...
जुन्या सालच्या सिनेमामध्य या चित्रपटाचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते ..


जयदीप भोगले 







31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...