Thursday, January 13, 2011

चला बाई जाऊ - होम मिनिस्टर पाहू

कार्यक्रम - होम मिनिस्टर जाऊ बाई जोरात
वाहिनी- झी मराठी 
वेळ- ६ वाजता मकर संक्रांति पासून 
का पाहावा - खाली वाचा 
का  पाहू नये - टी वी बंद असेल , दुरुस्तीस दिला असेल ,किंवा आपल्याच घरी शुटींग चालले असेल तेव्हा  

रसिकहो , आणि नियमित टी वी पाहणं-या माझ्या मित्रांनो,   झी मराठी ... ( आलं का पुन्हा तुमचं झी मराठी ..असे कदाचित तुम्ही म्हणत असाल ) पण काय करणार काही गोष्टींना  पर्याय नसतो 
आणि जसे  पर्याय निर्माण करावा म्हणून उगीच लोकसत्ता आणि म टा सोडून  दैनिक भम्भेरी , नसत्या उचापती असे वृत्तपत्र आपण  वाचत नाही तसेच मला, नव्हे  महाराष्ट्राच्या ब-याच टी वी दर्शकांना झी मराठीला पर्याय सापडत नाही असे माझे मत आहे .. कदाचित हे आत्यंतिक असू शकेल पण जसे एखाद्या मराठी बाईला पैठणीपेक्षा काही चांगले असू शकते असे वाटत नाही ( कदाचित असू ही शकेल ) तसे मला झी मराठी बद्दल वाटते .
असो पैठणी वरून आठवले की बांदेकर भाऊजी यांनी अवघ्या महाराष्ट्राच्या वनिता समाजाला , महिला मंडळाला पैठणी चा नजराणा दिला नवे तर रोजचा रतीब च लावला ..आता मला सांगा दुधाचा रतीब असतो तसे पैठणीचा रतीब.. काय अजब होते नाही.. याच खेळाने आता काही दिवस अल्पविराम घेतला होता  तो पुन्हा आपल्या सगळ्यांसमोर येतो आहे एका नव्या दिमाखात .. होम मिनिस्टर जाऊ बाई जोरात ...

आणि या वेळी याच्या प्रोमो मध्ये छोटे भाऊजी आहेत असे दिसते .. त्यांचे नाव आहे निलेश साबळे, निलेश साबळे महाराष्ट्राचा सुपर स्टार नंतर फु बाई फु मध्ये जाऊन आता जाऊ बाई जोरात म्हणतो आहे .. मी म्हणलो जाऊ हां जाऊ  ..

साडे माडे तीन .. हो शो साडे माडे तीन करत लवकर कटला .. त्यानंतर असले नंबरी कार्यक्रम येऊ लागतात की काय अशी भीती वाटली होती पण परवाच संध्याकाळी प्रोमो पाहिला आणि हायसे वाटले. आता होम मिनिस्टर आधी साडे सहा ला यायचा आता सहा वाजता येणार आहे एवढेच .. आता करमणूक आणि पैठणी यासाठी अर्धा तासाची तडजोड महिलांनी नक्कीच शक्य आहे .. 
भाजी आधी चिरायची किंवा त्याचे मोठे तुकडे करून लवकर चिरायची इतकीच तडजोड आहे ..  

होम मिनिस्टर हा कार्यक्रम हलका फुलका, आगळा वेगळा आहे हे काही वेगळे सांगायची गरज नाही .. त्यातील महिला वर्गाची घेतलेली फिरकी .. त्यांनी घेतलेले नाव ( ते घेतले की मला पु लं च्या असा मी असामी मधील हिंद मातेचा उखाणा आठवतो आणि हसू येते ) एकदा एका बाईने याच कार्यक्रमात पाच पांडवांची नावे सांगा म्हंटल्यावर .. कौरव अशी सुरवात केली होती..

अशी प्रासंगिक विनोदची फोडणी , भाउजीनी घेतलेली फिरकी , त्यामधले निरर्थक वाटणारे पण तितकेच क्रियेटीव्ह  खेळ , नातेवायीकांचा घोळका अशा कितीतरी गोष्टी या शो ला मालिकांपेक्षा लज्जतदार बनवतात .
( महिला वर्गाला मालीकापेक्षा काही चांगले आहे असे म्हटल्यामुळे जाहीर माफी )

आता फक्त सस्पेन्स हाच आहे की जाऊ बाई जोरात आहे तरी काय .. जुनी रेसिपी  नवीन प्लेट मध्ये की सर्वच नवीन ?. पुलाव का फोडणीचा भात ? मटणाचे कबाब का मटणसदृश सुरण कबाब?... हे प्रत्यक्ष आल्यावर ठरवावे लागेल . फक्त इतकेच सांगतो अपेक्षा ही आधीच्या चांगल्या काळाची बहिण असते  त्यामुळे जाऊ बाई जोरात .. जोरदार असेल असे अपेक्षित आहे 
आणि संक्रांतीला तीळ गुळ घ्या आणि गोड बोला असे म्हणत असल्यामुळे उगीच कटू मत व्यक्त करून कारले कशाला खायला घालू ..

तर गड्यानो मी उद्या जाणार जोरात आणि तुम्ही ...

जयदीप भोगले

No comments:

Post a Comment

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...