Wednesday, October 12, 2016

दिल मराठी धडकन मराठी – झी मराठी अवार्ड्स


सर्वांना सर्वप्रथम विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
विजय म्हणजे बक्षीस मिळणे , मन जिंकणे , मान मिळणे , विजयी पताका आणि विजयी जल्लोष हे सगळ आपसुख येतच .आणि जिंकण्याची गोष्ट, जर  रसिकांची मने जिंकल्यामुळे कुठे तरी रसिकांनी दिलेली प्रेमाची पावती आणि प्रेमाचे बक्षीस म्हणजे झी मराठी अवार्ड्स ...
दरवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा झी मराठी अवार्ड्स २३ ऑक्टोबर ला  रसिकांच्या भेटीला येणार आहे असे प्रोमोवरून समजले .
पण यावर्षीचा जल्लोष काय वेगळा असेल काय धमाल असेल याची उत्कंठा सगळ्याच लोकांना असते तशी मला सुद्धा तितकच लागून राहिली आहे

एक वाहिनीचा प्रामाणिक दर्शक म्हणून मला यावर्षी झी मराठी मध्ये काही विशेष जाणवते ते म्हणजे  मालिकांचे वैविध्य, विषयांची  व्याप्ती , विषय कौटुंबिक असूनही प्रत्येक कृतीची हटके  मांडणी , मालिकांची भव्यता दिपवून सुद्धा मराठी साधेपणाला जपणारी हाताळणी .
आणि म्हणूनच संध्याकाळी सहा पासून रात्री १२ वाजेपर्यंत प्रत्येक दर्शकाला आवडले ,रुचेल , असे कार्यक्रम होम मिनिस्टर पासून ते  रात्रीस खेळ चाले पर्यंत झी मराठी घेऊन येते आणि प्रत्येक दर्शक आपल्या हृदयातल्या एका कप्यात झी मराठीचा अनुभव जपत असते .

मराठी भाषाप्रकार आणि बोली भाषा यांची गोडी वेगवेगळी असूनही प्रत्येकाची गोडी तितकीच हवीहवीशी वाटणारी  आहे याचा अनुभव मला फक्त झी मराठीवर पाहायला मिळतो. मग नागपुरी बोलीमधील माझ्या नव-याची बायको असो की कोकणातील रात्रीस खेळ चाले असो. प्रत्येक दर्शकाला जोडणारी मालिका बनवणे हा फक्त प्रसिद्धीचा भाग असू शकत नाही तर  यात प्रत्येक मराठी मनाला समजून घेण्याची मानसिकता आहे असे जाणवते.

जगामध्ये प्रत्येक “brand” तेव्हाच मोठा होतो जेव्हा त्याचे लोकांशी भावनिक नाते बनले जाते.म्हणूनच झी मराठी ही एक वाहिनी न राहता आता त्याचा एक “ brand” झाला आहे असे मला एक मार्केटिंग चा माणूस म्हणून जाणवते .
आता या अशा कार्यक्रमाचे मालिकांचे अवार्ड्स जेव्हा असतील त्यावेळी मला बक्षीस कुणाला मिळेल यापेक्षा प्रत्येक कलाकाराचे केलेले कौतुक जास्त महत्वाचे वाटते . झी मराठी मधले कार्यक्रम म्हणजे मला टीम इंडिया ची तेंडुलकरच्या काळची क्रिकेट टीम वाटते . मग तेंडूलकर सारखे फटकेबाजी करणारी “हवा येऊ द्या” असो की सावधपणे संथ गतीने द्रविडसारखी माझ्या नव-याची बायको असो . प्रत्येक कार्यक्रम वाहिनीला उंचीवर नेतो . तेंडूलकर मोठा म्हणून द्रविड नको असे म्हणता येत नाही .


बर जाऊ दे मी लई सिरीअस  बोललो . 
मला काहे दिया परदेस जाम आवडते .. “शिव” आवडणाऱ्या कित्येक मुली मला माहिती आहेत आणि गौरी ला बघून “ आयला अशी कुणीतरी मिळाली पाहिजे “ अशी स्वप्नाळू पोरही .

रात्रीस खेळ चाले याची मालवणी भाषा कशी चुकीची !!! अशी खास पुणेरी चर्चा मी ऐकली आहे .

चला हवा येऊ द्या चा जिलेट- सलून झालय रे.... अशी टीका करून सैराट चा एपिसोड काय भारी झाला “ आईच्या गावात” असे म्हणणारे मित्रांचे वोटसप वाचले आहेत

आणि जय मल्हार आता फार खेचली असे म्हणून “ काल सातला लाईट गेलेले म्हणून मी अकरा वाजता रिपीट पहिला” असा म्हणणा-या  माझ्या मावशीचा फोनही ऐकला आहे .

अशा या मालिकांचा कौतुक सोहळा त्यात विनोदी नाटक नाच आणि मस्त निवेदन याची फोडणी म्हणजे ३ तासात झी मराठीचे आठ तास पाहिल्यासारखे आहे ... विजेची बचत आणि वेळेचीही ...


फक्त या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाच्या दिवशी  पुरुषांनी घ्यायची काळजी
 पुरुषांनी रिमोट लपवून ठेवू नये ...( सीमावादापेक्षा मोठा गदारोळ होऊ शकतो)

कामवाल्या बाईला सुट्टी स्वताहून देणे किंवा संध्याकाळी बाहेरून काहीतरी मागवणे . पाककुशल पुरुषांनी आधीच स्वयपाक केल्यास गौरीसदृश्य  कौतुकाची नजर तुम्हालाही घरबसल्या मिळू शकते .

माझ्या नवऱ्याची बायको यात बायकोची बाजू बरोबर आहे हे सदैव सांगणे .( नाहीतर मोबईल वर पहारा बसल्यामुळे “कमल” या तुमच्या बॉस च्या फोन ला सुद्धा संशयी नजर मिळू शकेल )

बिग बॉस या कार्यक्रमाबद्दल फार जवळीक न दाखवता स्त्रीसहिष्णू राहणे या दिवशी चांगले.

वामन हरी पेठे ज्वेलर्स याचे प्रायोजक असल्यामुळे हसतमुखाने दिवाळीला आपले पाकीट हलके करावे लागू शकते याची आगाऊ मानसिक तयारी करणे.



तर मित्रहो ... मी ही सगळी काळजी  घेऊन हा सोहळा  माझ्या कुटुंबासमवेत नक्की पाहणार आहे कारण “ there are some emotions  which TV cannot fulfill  for everything else there is Zee Marathi”

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...