Sunday, November 18, 2018

प्रोजेक्ट जैतापूर

 ...

"खेड्याकडे चला" असं वाक्य कृत्तिका च्या कानावर पडलं.. कॉलेज ची वक्तृत्व स्पर्धा आणि तिच्या काळ्याभोर डोळ्यासमोर चौकडा हाफ शर्ट घालून आवेशाने बोलणार अनिकेत होता . बोलके डोळे , खांद्यावर रुळणारे मोकळे केस , भुवयांच्या मधोमध शांती लावते तशी बाण असलेली टिकली आणि खळखळून हसणारे क्लोजप स्माईल असणारी कृत्तिका, हिची स्वप्न तिच्या डोळ्यात असणाऱ्या अनिकेतपेक्षा नक्कीच निराळी होती.
दोघे जेव्हा एकत्र झी मराठी पहायचे त्यावेळी "चमकत रहा" ची जाहिरात पाहून रंगत जाणारी स्वप्न तिची व अनिकेतच्या हातात प्रकाशवाटा व डोळ्यात वाढत जाणारा निर्धार दिसायचा.
ती नेहमी म्हणायची 12 वी नंतर मला मुंबईत जायच आहे,  MBA  करायचं आहे मोठ्या कंपनीमध्ये नोकरी, सगळं मोठं हवं .आपण खेड्यात आहोत म्हणून काय झालं? शहरात हुशार आणि मेहनती लोकांची कदर असते, पैसा मिळतो आणि.. हो खेड्यात असणाऱ्या नजरा सुद्धा नसतात बरका ??
आणि अनिकेत एक स्मित द्यायचा आणि म्हणायचा शहर म्हणजे त्या फुगणाऱ्या बेडकी सारखं झालय कधी फुटेल नेम नाही.. खेड्यात जर विकासाला चालना मिळाली तर एक वेगळ्या महाराष्टची निर्मिती होऊ शकेल . आपण चांगल्या समाजात जाण्यापेक्षा आपण जाताना लोकांना एक नवीन समाज देऊन जावा असं मला वाटतं. गांधीजीपासून ते प्रकाश आमटे यांनी लोकांनी मोठं म्हणावं म्हणून काम कधीच केले नाही .तेवढ्यात अनिकेतच्या आईच्या चहाने त्यांच्या भिन्न विचारांना समान पातळीवर आणले  मग दोघे हसले . कृतिका म्हणाली अहो समाजसुधारक साहेब तुमचे विचार चांगले आहेत पण बाजूला ठेवावे लागतील 12 वीच्या परिक्षेचे वेळापत्रक आले आहे . आणि म्हणाली चल मी निघते.. बाबा आले असतील .
कृत्तिकाचे बाबा स्टेट बँकेत बदलीवर जैतापूर ला आलेले आणि अनिकेत चे बाबा 8 एकर कोरडवाहू जमिनीचे भूमिपुत्र .एकिकडे पहिल्या तारखेची वाट  बघणारे बँक अकाउंट आणि एकीकडे पावसाची वाट पाहणारे बळीराजाचे डोळे अशी अवस्था असताना या दोघांचे मैत्रीचे सूर कसे जुळले याचं सगळ्या जैतापुर ला आश्चर्य होतं. पण फ्युजनच हे एकदम मराठमोळे उदाहरण होतें.हळूहळू अभ्यासाच्या रात्री वाढू लागल्या, हसण्याचा आवाज बदलून डिस्कशनचा झाला दिवस सरले  परीक्षा संपली दोघे 12 चा शेवटचा पेपर देऊन बाहेर आले .अनिकेत म्हणाला चला चहा घेऊ या, ती म्हणाली नको.. मी घरी जाते .  त्यावर तो म्हणाला चल मी सुद्धा येतो बरेच दिवस झाले सिनेमा सुद्धा पाहिला नाही . टीव्ही लावला तर, झी मराठीवर प्रकाश बाबा आमटे आणि झी टॉकीजवर टाईमपास .इथं सुद्धा कृत्तिकाची परीक्षा टीव्ही वहिनी सुद्धा घेतेय असं चित्र होतं.तेवढ्यात कृत्तिकाचे बाबा बँकेतून आले आणि म्हणाले काय अनिकेत कशी गेली परीक्षा? तुमच्या परीक्षेच्या निकलाआधी आमची परीक्षा आम्ही पास झालो असं दिसतंय.  म्हणजे काका? मी समजलो नाही. अरे बँकेने माझी बदली मुंबईला केली आहे पुढच्या आठवड्यात जॉईन व्हायचंय . मग अनिकेतला कृत्तिका गप्प का याचं कारण लक्षात लागलं.मग 12 वी नंतर काय? ये मुंबई ला.. तिथे चांगली वसतीगृह सुद्धा असतात.you have  good future. नाही काका जैतापूर  च्या शेतकी कॉलेजचा राज्यात वरचा क्रमांक लागतो मी इथेच शिकायचं ठरवलं आहे अनिकेत उत्तरला. माझ्या भविष्यापेक्षा माझ्या गावचं, राज्याचं भविष्य मला जास्त महत्वाचं आहे.बाहेर जाताना तो कृत्तिका ला म्हणाला मी शेतकऱ्याचा मुलगा आहे,आभाळाचा रंगावरून पावसाचा अंदाज बांधणारा तू जा. तुला तुझी स्वप्न आहेत ती पूर्ण मुंबईतच होतील. टाईमपास पाहत होतीस ना टक लावून ?.अंग मला कळतं तुझ्या मनातलं.. पण टाईमपास एक कथा आहे आणि प्रकाश बाबा आमटे ही सत्यकथा.अव्यक्त असून दोघांना उमजणाऱ्या प्रेमाला स्वप्न आणि ध्येय याच्या क्रॉसिंगवर  थांबावे लागले.नेमका त्याच दिवशी आलेल्या वळवाच्या पावसाने दोघांच्या अश्रूंना लपवून टाकले. दिवस पालटले अनिकेत व कृत्तिका दोघे विशेष प्रविण्याने उत्तीर्ण झाले . त्याने शेतकी कॉलेज व तिने बेडेकर कॉलेज ला प्रवेश घेतला .मधल्या काळातल्या कोरड्या दुष्काळात हळूहळू दोघांचे जग वेगळे बनले. वक्तृत्व स्पर्धेची जागा आंदोलनाच्या भाषणाने घेतली . जलयुक्त शिवार, शेततळी, कोरडवाहू शेती प्रयोग असे वेगळे विचार जैतापूर ला वाहू लागले. अनिकेत चा 5 वर्षात अनिकेत दादा रूपांतर झाले.  मुंबईत  सुद्धा कृत्तिका एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये रूजु झाली.एकाची जमिनीवर राहण्याची व एकीची गगनभरारी घेण्याची धडपड सुरू झाली.कृत्तिका खरंच चमकत रहा च्या जाहिरातीप्रमाणे तिच्या कंपनीमध्ये चमकत होती.रात्री उशिरा काम करून परत येताना आलिशान कार मध्ये कृत्तिका ला अधूनमधून जैतापूर च्या आठवणी यायच्या . "खेड्याकडे चला" हा आवाज घुमायचा पण नंतर पुन्हा “डेडलाईन” हा राक्षस  सगळ्या आठवणींना  मागे टाकायला भाग पाडायचा.
हळूहळू राजकारण हे ऑफिस आणि जैतापूर या दोन्हीकडे शिरकाव करत होते .एकीकडे समाजकारण आणि एकीकडे अर्थकारण या जगात योग्य राजकारण किती महत्वाचे आहे हे एका ध्येयवेड्या व एका स्वप्नवेडीला समजावत होते. खेड्याला योग्य न्याय हवा असेल तर योग्य  व्यासपीठ शहरात आहे, मंत्रालयात आहे हे विचार प्रोजेक्ट जैतापूर- चळवळ चालवणाऱ्या अनिकेतच्या मनात घर करत होते. राजकीय वर्तुळात सुद्धा शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून त्यांची ओळख वाढत होती .कृत्तिका तिच्या कंपनी मध्ये शेतमालाच्या भावांमध्ये होणाऱ्या अवमूल्यनामुळे उद्विग्न होत होती . सोनं पिकवणाऱ्या बळीराजाला खरा भाव न देता organic म्हणून माल दुप्पट नफ्याने विकणाऱ्या लोकांची तिला चीड येत होती .
या दरम्यान अनिकेतचे आमदार म्हणून निवडून येणे , वेगवेगळ्या वाहिन्यांवर त्याच्या प्रोजेक्ट चे होणारे कौतुक कृत्तिका च्या नजरेसही पडले होते. या गोष्टीचे कौतुक व आश्चर्य दोन्ही तिला होतेच पण काळाबरोबर त्यांचे मार्ग बदलले होते कदाचित फोन नंबर सुदधा...
 १२ वी मधला अनिकेत तिला नेहमी आठवायचा शेतकऱ्याबद्दल तळमळ आठवायची व सगळ्याचा उद्रेक होऊन तिने एक दिवस धाडस करून कोर्पोरेट दुनियेला रामराम ठोकला व तिने शेतकऱ्यांच्या मालाला नीट भाव मिळावा यासाठी NGO स्थापन केली व तिचा सुद्धा पहिला प्रोजेक्ट होता.. प्रोजेक्ट जैतापूर .
त्याच दिवशी मुख्यमंत्रि महोदयांनी मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा केली आणि  अनिकेत ने कृषिमंत्री पदाची शपथ घेतली .वर्तमानपत्रात मथळा होता प्रोजेक्ट “जैतापूर चळवळीचे प्रणेते अनिकेत पाटील यांची कृषिमंत्री म्हणून नियुक्ती”
.दोघांची स्वप्न व ध्येय प्रोजेक्ट जैतापूर या समान नावाने का होईना पुन्हा नव्याने कदाचित एका वाटेवर  आली होती.

जय
१८ ऑगस्ट २०१८

Friday, November 9, 2018

आणि .... सुबोध भावे


चित्रपट:    आणि... काशिनाथ घाणेकर

कलाकार ...सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी आणि बरेच मातब्बर कलाकार


दिग्दर्शक : अभिजीत देशपांडे


पाहावा की नाही: 'तुला पाहते रे पाहता का ?? ' मग उत्तर मिळेल..

नावात काय आहे असं बरेच जण सांगतात अनुभवतात पण जेव्हा एखादा बायोपिक तयार होतो त्याच्या नावातच सगळं असतं कुतुहुल, कथा, आठवणी ,परीक्षा आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्यासाठी दिग्दर्शक ते प्रेक्षक "याजसाठी केला अट्टहास" म्हणत असतात.

बहुचर्चित व दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित झालेला हा चित्रपट,  बऱ्याच जणांच्या लाडक्या असणाऱ्या डॉ काशिनाथ घाणेकर यांची कथा सध्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या मध्यमवयीन देखणा  आणि घाऱ्या डोळ्याचा नट सुबोध भावे साकारतो आहे म्हणजे कुतूहल व परीक्षा या दोन्ही गोष्टी  शिगेला असणारच..

यात काशीनाथ घाणेकर यांचा डॉक्टर ते ऍक्टर असा प्रवास.
सिगरेट च्या धुरासारखं उडत जाणारं वलयांकित  आयुष्य.
दारूच्या घोटसारखी  अर्थशात्रच्या इंजिल लॉ ऑफ consumption ला खोटे ठरवणारी अफाट प्रसिद्धी...
व उंच अशा धबधब्याजोगी प्रसिद्धी ते नाराजी असणारी त्यांच्या जगण्याची बेफीक्री या सगळ्याचा मिलाफ म्हणजे आणि डॉ काशीनाथ घाणेकर...

बालगंधर्व ,लोकमान्य आणि काशिनाथ या तीन भूमिका तितक्याच वेगळ्या पद्धतीने साकारणारे सोने म्हणजे सुबोध भावे . बालगंधर्व सम गळ्यातला लक्ष्मी हार असू दे की सोनेरी मानपत्र असलेलं लोकमान्यांचं आयुष्य... आणि हेवा वाटणारं व कधीही हरवेल अस मनगटात असणाऱ्या डॉ काशिनाथ घाणेकर यांचं ब्रेसलेट ...या सगळ्याची घडण सुबोध भावे यांच्या बावनकशी सोन्यातूनच घडलीय आणि एकदम शोभलीय सुद्धा..

स्क्रीनभर पुरून उरणारा सुबोध भावे , दिवाळीच्या फराळाच्या थाळीत असणारा प्रत्येक पदार्थ जसा आवश्यक असतोच आणि एकदम जमून जातो असे सर्व कलाकार व त्यांचे अभिनय  यामुळं सिनेमा मराठी रसिकांना पसंतीस पडेल हे नक्की..

सिनेममधली गाणी थोडासा रटाळ वाटणारा शेवट व फक्त अश्रू आणि संभाजी यावर सुपरस्टार होणारं डॉक्टरांच आयुष्य या गोष्टी खटकणा-या वाटतील सुदधा पण परिपूर्णता म्हणजे पूर्ण विराम .. त्यामुळे कलाकृती उद्गारवाचक , प्रश्नार्थक असणं जास्त चांगलं असं मला नेहमी वाटतं...उसमे क्या है !!!!

डॉ साहेबांनी रंगभूमीला पुष्कळ काही दिलं पण त्यांच्या धुरकट व प्यालाच्या  चष्म्यातून पाहिलेल्या आयुष्यामुळे आम्ही तरुण एका मोठ्या नटाला रंगभूमीवर पाहायला मुकलो याची खंत नक्कीच वाटते.

चित्रपटात एक स्वगत आहे की टाळी ही कलाकाराला सरस्वतीने दिलेला शाप आहे .
पण खरं तर सुधाकरापासून काशीनाथपर्यंत (बाकी सुद्धा बरेच) लोप पावणारे  स्पिरीट चे दिवे पाहिले की कळते की सुरा हाच कलेला न कळलेला  शाप आहे.

अर्ज किया है

ए गालिब तू वली होता
अगर तू बादाखार न होता

सुबोध भावे यांना त्यांच्या वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।।।

जेडी
9 नोव्हेंबर 2018

Sunday, October 28, 2018

सोनेरी क्षण





पहिल्या प्रेमाच्या सोनसाखळीतून
 सुवर्णमहोत्सवी संसाराच्या नथीतून
 भरघोस बोनसच्या हिऱ्याच्या कुडीतून
सोनेरी क्षण असेच बनतात अतूट प्रेमातून

आईच्या साठवलेल्या स्त्रीधनातून
कधी सासूबाईंच्या लक्ष्मीहारातून
ओवाळणी दिलेल्या गुंजभर सोन्यातून
सोनेरी क्षण असेच दृढ होतात अतूट प्रेमातून

शीलंगणाच्या अक्षय वळ्यातून
 गुरुपुष्याच्या वाढणाऱ्या मण्यातून
दिवाळीच्या लाजणाऱ्या ठुशीतुन
सोनेरी क्षण असेच वाढतात अतूट प्रेमातून

कधी हिऱ्यातून कधी सोन्यातून
कधी शुभ्र अशा चांदीतून
सोनेरी क्षण सदैव टिकतात WHP च्या सोबतीतून


जयदीप भोगले
4 ऑक्टोबर 2018

Saturday, October 27, 2018

पंचिविशी ते गद्धेपंचिविशी भोवऱ्यात .....तुला पाहते रेl


सहासष्ट भाग झाले आज आणि मला वाटलं आता काहीतरी लिहायला हवंच ..
66 म्हणजे साधारण 3 महिने म्हणजे एक  क्वार्टर ( हे सगळं क्वार्टर च्या वेळी सुदधा चर्चित होतेय)
झी मराठी वर  तुला पाहते रे ही मालिका म्हणजे एक झंझावात झाली आहे.

गद्धेपंचिविशी ची प्रेमकथा पंचिविशी ते चाळीशीच्या चष्म्यातून कौतुकाने पाहिली जात आहे.
सगळ्या मालिका स्त्रीप्रधान असतात असं म्हटल जातं पण 377 कलम हटवल्याच्या  आनंदात म्हणून की काय ( जस्ट जोकिंग)  ही मालिका स्त्री आणि पुरुष पाहतायात  सुबोध भावेसाठी .

नवतारका गायत्री दातार( "सर" चा  गायत्री मंत्र म्हणणारी) व यांच्या मालिकेमधल्या प्रेमाबद्दल अनभिज्ञ असणारी अभिज्ञा... 'मायराजी" यांची कामं नक्कीच छान आहेत यात वाद नाही  पण मी जितक्या लोकांना विचारलं सगळे म्हणतात आम्ही ना
..सुबोध भावे ला बघण्यासाठी ही मालिका आवर्जून पाहतो.

प्रत्येक वयाची व स्त्री पुरुषांचं कारण वेगळं नक्कीच असेल पण जिव्हाळा मात्र सुबोध भावे साहेबांवर
माझी आई मध्येच सुरांचा ध्यास घायला लागली होती आता यालाच पाहते रे..

बायको टी वी वर न जाणारी झी 5 वर जाऊन न चुकता एपिसोड पाहतेय। रे आणि म्हणते मला... तू अचानक स्टबल लुक का ठेवतोयस?? ...😢😢

सॉफ्टवेअर कंपनी मध्ये काम करून हैराण असलेला माझा मित्र तुला पाहतो रे ..।( हे नेटफ्लिक्स वगैरे सब झूट है)
परवा बसल्यावर म्हणाला माझ्या बायकोने मला सांगितलं "तुम्ही जे न चुकता तुला पाहते रे पाहताय हे मला काही समजलं नाही ...40 नंतर तुम्हाला असलं काही जमेल किंवा अशी कोणीतरी मिळेल या भ्रमात राहू नका "
तो म्हणाला अंग पण मी त्याला पाहतो रे... बायकोनं कपाळाला हात मारला
मला कुणीतरी सांगीतलं होतं की माणसे कथेवर प्रेम करत नाहीत तर करतात त्यातील कॅरेक्टर वर  ..
ते ज्यात असत ते पाहिलं जातंच !!!!
तुम्ही म्हणाल ....काहीही हा श्री ..☺️

तर प्रत्येक पुरुषात दडलेला विक्रांत सरंजामे यातल्या कथेमध्ये आपली कथा मिसळत असतो .त्याच्यासारखी तिखट जाळं पावभाजी खात असतो तिखट चालत नसताना सुद्धा...
हे सगळं झी मराठी ला कसं काय जमतं देव जाणे ???
पण गोंडस श्री नंतर 40 चा विक्रांत सरंजामे सुद्धा लोकांचा ताईत बनतो हे म्हणजे मुरलेल  लोणचे असते तसं  नाही का ??
 "ओल्ड वाईन "हे म्हणावं का नाही याबद्दल मी बराच विचार केला पण पुन्हा 377 कलमा बद्दल विचार केला... (जस्ट जोकिंग)
उद्या काय होणार हे बघायला लोक मालिका पाहतात असं म्हणतात पण इथं तर उद्या वाट्टेल ते होऊ दे पण एकदा पाहायला पाहिजेच अस काहीतरी मिश्रण तयार होतय अस मला वाटतंय...
याची कथा ,यातील बाकी कलाकारांचा अभिनय, या बद्दल मला काही सांगायला नकोच.. ते झी मराठी म्हणजे छानच असतं..😊
पण हे सगळं लिहिलंय हे उत्तर शोधावं म्हणून की लोक तुलाच  का पाहतायत रे ??

जयदीप भोगले (सरंजामे समजू नये)☺️☺️
27 10 2018

Sunday, September 16, 2018

यांत्रिकी आणि अभियांत्रिकी



अभियंता बनलो पण अभियांत्रिकी जमलीच नाही
माणसाच्या नादात मशीनची भाषा ऐकलीच नाही

रेफ्रिजरेशन आणि ऐरकंडिशनिंग हे नेहमीच राहू केतू वाटले
मशीन ड्रॉईंग पाहताच मला नेहमीच ब्रह्मान्ड आठवले
भावनांचे आणि ऑइल चे एकत्र कधी जमलेच नाही
माणसाच्या नादात मशीनची भाषा ऐकलीच नाही

 इंजिनिअर डे च्या दिवशी असलेच पंछि मला दिसतात
आपली ब्रँच सोडून हे सगळे दुसऱ्याच झाडावर बसतात
यांच्या शिक्षणाचे आणि करणाऱ्या नोकरीचे सूत कधी जुळलेच नाही
माणसाच्या नादात मशीनची भाषा ऐकलीच नाही

पण गॅरेज मधले  मेकॅनिक आणि कारपेंटर जेव्हां दिसतात
डिग्री घेतात अभियंता पण खरे अभियांत्रिकी हेच जगतात
मार्कंच्या जगात खरे टॅलेंट दिसलेच नाही
कॉलेज आहेत पुष्कळ पण विश्वेश्वरय्या उरलेच नाही!!!

सर्व मिसफिट इंजिनिअर लोकांनां आणि खऱ्या इंजिनिअर लोकांना इंजिनिअर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा

जयदीप भोगले
15 सप्टेंबर 2018


Wednesday, August 15, 2018

देशभक्ती व देहभक्ती



१५ ऑगस्ट जवळ आला की उगाच देशभक्तीपर गीते तिरंगी झेंडे ,जय हिंद चे फेसबुक स्टेटस आणि हो ..आजकालचे मनापेक्षा वेगाने पुढे जाणारे व्हाट्सएप मेसेजेस यात वाढ व्हायला लागते .हा दिवस फादर मदर आणि रोज या सारखाच एकदिवसाचा बनतोय असं मला नक्की वाटतंय.

आता हेच पहा ना हा लेख मी कदाचित जुलै महिन्यात सुद्धा लिहिला असता पण मला बरोबर 15 ऑगस्ट च्या तोंडावर सुचतोय म्हणजे मी सुदधा फार काही वेगळा नाही ,
पण देशभक्ती किंवा एकूण भक्ती या गोष्टीवरच चिंतन करावं असं मला वाटतंय म्हणून हे सगळं मनातलं मांडण्याचा खटाटोप .

मी माझ्या मुलाला जागृती सिनेमाचं आओ बच्चे गाणं दाखवतं होतो त्यावेळी त्याने मला विचारलं बाबा हे बलिदान म्हणजे काय असतं??
लहान वयात बलिदान वगैरे समजणं त्याला कठीण आहे मला कळत होतं ,पण मग त्यावरून मला लक्षात आलं की सध्या आपण एकूणच समाजाभिमुख भूमिकेकडून वयक्तिक दृष्टिकोन ठेवत आहोत .
 वयक्तिक दृष्टिकोन इतका जवळचा झालाय की माझा फोन ,माझा प्रोग्रॅम, माझा वेळ, माझी प्रायव्हसी अगदी माणसाचे गोल सुद्धा पर्सनल गोल्स बनत आहेत.
 आता इतकं जर वयक्तिक आपण आपल्या रोजच्या आयुष्यात बनत आहोत तर देशभक्ती सारखी अत्युच्च आणि समजायला कठीण अशी भावना मनात तयार होणे नक्कीच कठीण आह.
यात लोकांची किती चूक आहे हे मला सांगायचं नाही पण हेच कदाचित हळू हळू सर्व स्तरांवर होणाऱ्या बोथट भावनांचं कारण आहे असं मला वाटतं आहे

पहिल्यांदा येते शेअरिंग मग येते सामावून घेणे ते कळते तेव्हा त्याग समजायला लागतो व या सगळ्या गोष्टी जेव्हा एकदम रुजतात त्यावेळी खरी देशभक्ती ची भावना रुजायला लागते

देहभक्ती व वयक्तिक सुख व समाधान या सर्वात महत्वाचा वाटणारा विचार देशभक्ती कशी घडवून आणू शकतो कदाचित आणणे कठीण आहे .

आजकालची असणारी पोकळ आरक्षणे व समाज निदर्शने यात सुदधा फक्त वयक्तिक स्वार्थ यापेक्षा कुठलाही विचार समोर येतो आहे असं मला जाणवत नाही.

परदेशी कापडाची होळी व चरखा आणि खादी वापरण्याचा विचार असेल किंवा स्वतःच्या देशाच्या शिक्षण संस्था असाव्यात असा टिळकांचा व्यापक विचार असेल यात प्रत्येक ठिकाणी त्याग व सामावून घेण्याची भावना दिसून येते ती नक्कीच कमी झाली आहे.

समाज प्रगत होतो आहे . स्त्री जास्त स्वतंत्र होते आहे वेगवेगळ्या विचारामधले स्वातंत्र्य हे नक्कीच दिसून येते आहे .
पण भारत स्वतंत्र जरी होत असेल तर आपण स्वतः किती देशभक्त होत आहोत हे आपण अगदी आपल्या सार्वजनिक मालमत्तेच्या वापर असो की त्याचे होणारे नुकसान असो याच्या विषयी असणाऱ्या आस्थेवरून  आपल्याला पडताळून पाहणे गरजेचे आहे.

आता ही देशभक्ती ही केवळ शाहिद होणाऱ्या लोकांना अभिवादन करून वाढणार आहे का ? का आपण फक्त स्वदेशीचा वापर करून बळावणार आहे तर असं मला नक्कीच वाटतं नाही.

देशभक्ती ही फक्त सांडणारं रक्त आणि ऑलम्पिक मधल्या वाढणाऱ्या मेडल नी वाढत नसते .
आपण देशासाठी वाचवलेलं पेट्रोल, एखादं लावलेलं आणि वाढवलेल झाडं , सार्वजनिक मालमत्तेची जपणूक , वाचवलेलं एक ग्लास पाणी यातून सुध्दा ती तितकीच सार्थ बनू शकते .

आर्थिक दृष्ट्या दुर्बल असताना किंवा गुलामगिरीतला देश मेहनतीने व प्रतिकाराने आपली प्रगती करणे हे कदाचित न्यूटन च्या नियमात बसेल,
 पण जेव्हा आपला स्वयंपूर्ण होणारा व आर्थिक स्तर उंचावणारा समाज जेव्हा orbit shifting करून झेपावत असेल तर नियम वेगळ्या दृष्टीने पहाणे तितकेच महत्वाचे ठरेल असे मला सांगावे वाटते.

त्यामुळे या १५ ऑगस्टला ए मेरे वतन के लोगो ऐकून शाहिद लोकांचे स्मरण जरूर करू या पण आपल्या प्रत्येकाने देहभक्ती कडून थोडे तरी वेगळ्या पद्धतीने देशभक्त बनायला सुरवात करू या ...

जय हिंद

भारतीय स्वातंत्र्यादिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जयदीप भोगले
१५ ऑगस्ट २०१८

Wednesday, August 8, 2018

गटारी

गटामध्ये येऊन सारी
घेऊन  येती आज दारी
करती अवस ती साजरी
म्हणे गटारी ती

सौजन्य नसो की सोयरीक
पाणी असो वा की "नीट"
आज होती सगळे धीट
डोळे वटारी ...ती

कोंबडीस एक मासाचे अभय
मोडून रोजची ती सवय
दाढी वाढवायची ती सोय
वाटे विषारी  ती

आला वीकेंड तो जवळ
मित्र घालती हो शीळ
पटियाला भरून चंगळ
करतात गटारी ती

तळीरामच्या दुनियेत....
जयदीप (सुधाकर) भोगले
७ ऑगस्ट २०१८

😊😊😊

Sunday, August 5, 2018

मैत्री

मैत्री म्हणजेच एक कविता असते
वात्रटिका असो की भावगीत
दोन्ही जागी एकदम परिपूर्ण असते
फ्रेंडशिप डे च्या आठवणींची मुलाहिजा ती कधी बाळगत नाही
पण  या दिवशी खळखळून हसायला तिची कधीच ना नसते
भूतकाळ असो की वर्तमानकाळ कायम ती चिरतरुणच राहते
LIC  चं माहीत नाही पण ही जिंदगी के साथ और जिंदगी के बाद जरूर राहते

जयदीप भोगले
5 ऑगस्ट 2018

Monday, July 30, 2018

पुष्पवृष्टी व्हावी असे नाते ....पुष्पक विमान



गेले काही दिवस सगळीकडे पुष्पक विमानाच्या उड्डाणाची बरीच चर्चा आहे ......
मला पण कुतूहल आहे ...ते त्यातल्या आजोबा आणि नातवाच्या नात्याचे

" मी तुझी सुरवात आणि तू माझा शेवट  "  या वाक्यानेच माझी उत्कंठा शिगेला पोहोचलीय..

ही सिनेमाची समीक्षा किंवा त्याची जाहिरात आहे असं नक्कीच नाही पण या नात्याला अनुभवलेल्या आणि ते सुंदर नाते जवळून कौतुकाने पाहणाऱ्या प्रत्येक नातवाला उद्देशून आहे..

माझे आजोबा आमच्यापासून दूर असल्याने त्यांचा सहवास मला नक्कीच लाभला नाही .पण जेव्हा मी पहिल्यांदा त्यांना माझी तोडकी मोडकी यमक व अनुप्रास या दोनच गोष्टी ठळक असणारी कविता  ऐकवली ...अगदी ते ऐंशी वर्षाचे झाल्यानंतर....त्यांचा डोळ्यातली चमक मला कौतुकाची थाप देऊन गेली  ..

मला म्हणाले ...तुझा पप्पा फार काही कवितेला शोधू शकला नाही मला तुझ्यात ती आस्था दिसतेय आणि आता आजोबा नसताना सुदधा त्यांची तसबीर मला कुठेतरी त्यांच्याबरोबर घेऊन जाते .त्यांच्या कवितेच्या शेवट माझ्या कवितेची सुरवात करून गेला.

आजोबा आणि नातू हे अवखळपणा, बाळहट्ट ,न समजणारे संवाद तरीही हृदयाला भिडणारे असतात नाही का ??

माझी आई सांगते ...माझ्या पप्पानी आम्हाला जितके लहानपणी लाडाने जवळ घेतले नाही तेवढे ते आता ते माझ्या मुलाला खेळावतात...त्यांची ऊर्जा आणि माझ्या मुलाची ऊर्जा जुळते ..."एनर्जी लेव्हल " म्हणतात ना मराठीत .

 कुठेतरी ते त्यांना त्याच्यात शोधत राहतात .बहुतेक.
 मला शिस्त लावणारे त्याच्या "डोक्यात जाणाऱ्या"  दंग्याला सुद्धा प्रीमिअर चे पासेस दिल्यासारखे आनंदून एन्जॉय करतात

आता हे असे वयाच्या पलीकडे जाणारे नाते एककेंद्री कुटुंबात आजकाल कमी अनुभवायला मिळत असेल, पण तरीही ते नाते एखादे बी अगदी ओलावा मिळाला की कसे लगेच रुजते त्याप्रमाणे एका भेटीत आपलं एक विश्व निर्माण करते ..

 लोक म्हणतात जरा नातं दृढ व्हायला वेळ दे.. तसला वेळ याला कधी लागतच नाही.

आजोबा आणि नातवाची दुडकी पाऊले व   अगदी कुठलाही वेग नसलेली अशी जोडी लांबून पाहिली की जनरेशन गॅप इतका कमी होऊ शकतो हे या स्पीड क्रेझी जगाला ला कदाचित समजू शकेल

आजोबा नातवासाठी मॅगी चवीने खातात आणि नातू विठ्ठलाच्या मंदिरात डोरेमॉन सोडून पळतो असे आध्यत्मिक साक्षात्कार बहुतेक हेच नाते अनुभवताना येतात.

आयुष्यात सगळं कमावून, गमावण्याची कसलीही चिंता नसलेलं विश्व ,कार सोडून वाटी चमच्याने खेळायचं अशा व्यवहारदूर विश्वात कसं समरस झालेलं असतं हे प्रत्येक आजोबा व नातू कुठेतरी नक्कीच अनुभवतात हे मला वेगळं सांगायला नकोच ..

 आता हे नातं आजीबरोबर असतं का ?नातीचं काय ???
असलं स्त्रीवादी सध्या मी बोलू शकत नाही अगदी त्याबद्दल सगळ्या आजीबाईंची व नातींची  माफी मागायला मी तयार आहे

कारण पुष्पक विमान च्या जाहिरातीने मी आधीच आजोबांच्या आठवणीत आहे व एका आजोबांना व नातवाला जवळून पाहतो आहे..

आता हा सिनेमा पडद्यावर यशस्वी होणार का ???वगैरे व्यावहारिक गणित करायला बरेच बाबा लोक असतील ...आहेतही... त्यामुळे त्यात मला सध्या नातू म्हणून पडायचे नाही..

पण सगळ्या आजोबा - नातवांचा स्पेशल शो असेल तर 3 ऑगस्ट ला आमच्या घरट्याच्या जोडगोळीला या विमानाचा प्रवास घडवावा हे मात्र नक्कीच माझ्या मनात आहे ते सुद्धा तिकीट काढून...
 कारण काही तरी अव्यवहारीक जवळीक अनुभवायची असेल तर इतकं व्यावहारिक जरूर असावं असं माझ्या आजोबांनी मला नक्कीच शिकवलं आहे...

जयदीप भोगले
30 जुलै 2018

Friday, July 27, 2018

गुरू


चक्रव्यूह भेदण्यासाठी
लढवय्या होण्यासाठी
सिकंदर म्हणून जिंकण्यासाठी
कधी पोरस म्हणून हरण्यासाठी
एक गुरूच हवा
पायावर उभारण्यासाठी
जमीनीवरच  राहण्यासाठी
विशाल समुद्रात पोहण्यासाठी
गगनभरारी घेण्यासाठी
एक गुरुच हवा

अर्जुनाच्या कर्तव्यासाठी
एकलव्यासम त्यागासाठी
विवेकानंदाच्या विरक्तीसाठी
आणि नतमस्तक होण्यासाठी
एक गुरुच हवा
जयदीप भोगले
27 जुलै 2018
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
व माझ्या सर्व गुरुंना सादर  प्रणाम🙏🙏🙏

Friday, July 6, 2018

कोडे


अवघड कोडी सोपी होतात अन सोप्या गोष्टी अवघड
दृष्टिकोनाचा गुण कधी कधी दोष डोळ्यावरची झापड
धुरंधर म्हणता म्हणता होई नोकियाचीही पडझड 
नवशिका म्हणता म्हणता हळूच गुगल होई वरचढ
उघडे डोळे उघडे कान हाच मंत्र तू वापर
झाडे नेहमी तोडली जाती .गवताचे बनते छप्पर
जयदीप भोगले


6 जुलै 2018

Saturday, June 9, 2018

अपेक्षा



वेळेवर येण्याची
 वेळेवर जाण्याची
 पापणी लवण्याची
 डोळे मिटण्याची
अपेक्षाच ती

धडधडत्या हृदयाची
धडपडत्या श्रमाची
हातातल्या फुलाची
वाट पाहत्या मुलाची
अपेक्षाच ती

अडीच अक्षराची
न पाहिलेल्या ईश्वराची
सभेतल्या टाळ्यांची
स्थितप्रज्ञ डोळ्यांची
अपेक्षाच ती

भाकरीच्या तुकड्याची
शाळेच्या बाकड्याची
खाटकाच्या च्या बोकडाची
सरणावरच्या लाकडाची
अपेक्षाच ती

  पूर्ण होण्याची
 पूर्ण करण्याची
आश्वस्त होण्याची
 आश्वासन देण्याची
अपेक्षाच ती....

जयदीप भोगले
9 जून 2018

Thursday, March 8, 2018

रोझ रोमिओ



प्रेमाचा गुलाब दिला दिले व्हॅलेंटाईन चं नाव
ह्रदयात तिच्या वसवले  प्रीतीचे टेम्पररी गाव
मागचं होते वेगळं आज कुछ नया तो दिखाव
दर वर्षी हाच दिवस पण तिचे नवीन असो नाव

लाईफ मध्ये हमेशा कुछ तो नया करो
Boring बनेल एकीबरोबर आणि होईल स्ट्राईक रेट झिरो
माझ्या प्रेमाचं सॉफ्टवेअर कोई update करावं
दर वर्षी हाच दिवस पण तिचे नवीन असो नाव

कॉफी कशी सेम पण वेगवेगळी बनते
कपोचिनो लाटे आणि अमेरिकानो असते
दिल मेरा वैसा कॊई स्टारबक्स तो बनाव
दर वर्षी हाच दिवस पण तिचे नवीन असो नाव

चॉकलेट टेडी रोझ सगळं दिल तिला आज

म्हटलं वाट पाहतंय हार्ड रॉक कॅफे आहे तिथे जॅझ

ती बोले इस साल तेरा मेरा ब्रेकअप असे राव
घरपे सब बोले थोडा कमिटमेंट तो लाव
व्हॅलेंटाईन सब ठीक है लेकींन पाडवा भी मनाव
दर वर्षी हाच दिवस पण नेहमी तुझेच असो नाव

जयदीप
14 फेब्रुवारी 2018

Wednesday, March 7, 2018

माध्यमे आणी बोली भाषांचे वाढते महत्त्व


पूर्वी साहित्य म्हटले की प्रमाण भाषा, शुद्ध भाषा किंवा पुणेरी भाषा असेच गृहीत धरले जायचे
मग त्या साहित्यात फक्त कविता ,कथा कादंबरी नाही तर टेलिव्हिजन युगात कार्यक्रम आणी
सिरिअल सुद्धा बनवल्या जायच्या.
ज्याप्रमाणे पुस्तकांमध्ये नवसाहित्य, मुक्तछंदात्मक कविता ,सामाजिक लेखन, दलित साहित्य
अशी हाताळणी विविध लेखकांनी केली ती तितक्या सहजपणे टीव्ही नवीन आल्यावर सहज
येऊ शकली नाही.
टीव्ही हे कदाचित नवीन माध्यम असल्यामुळे त्यात येणारे कलाकार त्यांना अप्रोच होणारे
निर्माते कलाकार हे सगळे पुण्या मुंबईचे असायचे . टीव्हीवर दूरदर्शन ही एकच वाहिनी
असल्यामुळे साहजिकच त्याचा सर्वप्रथम प्रसार व उपलब्धता ही याच शहरांमध्ये झाली
व या लोकांपर्यंत पोहीचतील असेच कार्यक्रम निर्मात्यांनी बनवले .
हे कार्यक्रम गुणवत्तेनुसार नक्कीच उत्तम होते यात काही शंका नाही पण सर्वसामान्य जनतेच्या
बाजू मांडणारे त्यांच्या घरचे वाटणारे कार्यक्रम कमीच किंवा विरळ असायचे.
आता मी लहानपणी “चाळचाळ नावाची वाचाळ वस्ती “हा कार्यक्रम आवडीने बघयचो पण
आमच्या गावातले जीवन व या शहरी जीवनात खूप फरक असायचा . मला त्यावेळी नक्कीच
चॉईस नसल्यामुळे मी सर्व पाहत होतो पण त्याकाळात बाकी बोली भाषेत नवीन कार्यक्रम
लोकप्रिय होऊ शकतील असे बऱ्याच जणांना कदाचित वाटलेच नाही
मराठी सिनेमा मध्ये सुद्धा ग्रामीण म्हणजे फक्त कोल्हापूर पुरते मर्यादित होते पण महाराष्ट्रात
28 जिल्हे आणि किमान 6 ते 7 अगदी भिन्न म्हणता येतील अशा बोलीभाषा असून सुद्धा
त्याबद्दल त्याचा विचार कधी झाला नाही
पण गेल्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये प्रसार माध्यमे व चित्रपट यामध्ये बोली भाषा व त्यांचे सौन्दर्य
त्यातील खास विनोद ,त्या भागातील व्यक्तिविशेष या सर्व गोष्टींचा जास्त सखोल विचार होऊ
लागला आहे
नोकरी व शिक्षणानिमित्त लोकांचे होणारे स्थलांतरण , टीव्ही ची सहज उपलब्धता, जुन्या
साहित्यामधील नावीन्य चा अभाव व कालाबाह्यता , आणी इतर महाराष्ट्रातून येणारे कलाकार
व त्यांना जनतेने दिलेली पसंती या सर्व पूरक कारणामुळे अशा पद्धतीने नवीन प्रयोग यशस्वी
होऊ शकतात याचा निर्माते व चॅनेल चे कार्यकारी निर्माते व चित्रपट निर्माते यांना वाटते आहे
हा बदल महाराष्ट्रापुरता नसून संपूर्ण भारतभर याचा प्रभाव होतो आहे असं मला गेल्या दहा
वर्षांपासून नक्कीच जाणवत आहे

मी 2005 ला पाहिलेला खोसला का घोसला ने दिल्ली मधल्या खास भाषा शैलीला सुरेखपणे
हाताळले होते. मी दिल्लीत शिक्षणानिमित्त असल्यामुळे अशी भाषा मी जवळून अनुभवलेली
त्यामुळे त्याचे खास कौतुक व authenticity नक्कीच मला जाणवली .
मग ओंकारा, बंटी आणि बबली , बँड बाजा ते अगदी अलीकडच्या दंगल पर्यंत प्रत्येक भाषा
आणि तिथल्या व्यक्ती आणी वल्ली आपण पाहत आहोत पसंत करत आहोत.
धाकड म्हणजे काय हे शब्दशः समजले नाही तरीही सिनेमामध्ये असलेल्या वातावरणात
आपल्याला उमजून जाते आणि याला प्रमाण भाषेतला पर्यायी शब्द कोणता हे आपण विचारत
नाही
हाच धागा ना आना इस देस लाडो , अफसर बीटीया, बालिका वधू ते थेट तारक मेहता या हिंदी
मालिकांमध्ये सुदधा हाताळलेला आपल्याला दिसला असेल
मराठी मालिका हा माझा स्वतः चा जिव्हाळ्याचा विषय ...यात सुद्धा असे कित्येक प्रयोग
यशस्वी पद्धत्तीने झी मराठी ने सुद्धा केलेले आहेत
अवंतिका पासून ते रात्रीस खेळ चाले व तुझ्यात जीव रंगला पर्यंत तिने केलेला प्रवास हा
बोलीभाषेने माध्यमात केलेला प्रवास दाखवतो
सैराट हा इतका ग्रामीण भाषेचा सिनेमा असून सुद्धा 100 करोड चा टप्पा गाठू शकतो याचे श्रेय
निर्माते यांनां तर द्यावेच लागेल पण बोली भाषा प्रमाण भाषेतकीच लोकांना आवडते याचा एक
हा मैलाचा दगडच आहे की काय असे म्हणावे लागेल.
अमेरिकन संस्कृती आणि ब्रिटिश संस्कृती मध्ये सुद्धा स्कॉटिश व कृष्णवर्णीय बोलीभाषा
तितक्याच सशाक्तपणे प्रमाण भाषेबरोबर जाऊन बसलेल्या आपल्याला दिसतात
म्हणूनच की काय आजकाल तरुण पिढीला want पेक्षा waana जास्त जवळचे वाटते हे बोली
भाषेचे जिव्हाळ्याचे नातेच म्हणावे लागेल
पण मराठी मध्ये खूप मस्त आणि उत्कृष्ट हे शब्द लै भारी ने कधी रिप्लेस होतील का हे मात्र
कदाचित येणारी वर्षे ठरवू शकतील.
मकरंद अनासपुरे , भारत गणेश पुरे, संकर्षण कराडे, भाऊ कदम ही सर्व वेगवेगळ्या बोली
भाषा बोलणारी पण तितकीच लोकप्रिय मंडळी बोली भाषांचा झेंडा फडकवत ठेवताना
दिसतात. यांच्या अभिनयाबरोबर आपण बोली भाषेचे सुद्धा कौतूक करायला हवे.
धातू ज्याप्रमाणे कमी जास्त प्रमाणात कार्बन घातल्यास पोलाद ते अगदी बीड बनतो पण दोघे
तितकेच उपयोगी व सुंदर असतात .अगदी तसेच शुद्ध अशुद्ध भेद न ठेवता प्रत्येक भाषा हा
वेगळ्या धातूच्या रुपाप्रमाणे मानला तर नक्कीच त्याचे सौंदर्य जास्त उत्तम पद्धतिने कळू
शकेल.

लेखनामध्ये काही मर्यादा येण्यामुळे बऱ्याचदा वर्तमानपत्रे अजूनसुद्धा बोली भाषेचा वापर
लेखामध्ये करत नाहीत पण व्हिडीओ माध्यमे ही जास्त प्रभावी असल्यामुळे ती ही जबाबदारी
उत्तम पद्धतीने पार पाडत आहेत
येत्या काळात आपण एखादी सामाजिक चर्चा न्यूज वाहिनीवर सुद्धा मराठवाडी भाषेत पाहू
शकलो तर मला त्यात काही गैर वाटणार नाही
भाषा ही माणसाच्या मनातले लोकांना समजण्यासाठीच असते आणि ती वेगळ्या बोली
भाषांतील शब्दसिद्धीमुळे जास्त समृद्ध होऊ शकते
ज्याप्रमाणे दोन राग मिश्र राग बनवू शकतात तसेच दोन बोली भाषा या नक्कीच नविन मिश्र
भाषा तयार करू शकतात मग त्याला आपण जसे अनवट रागानां स्थान देतो तसे त्या भाषेला
सुद्धा दिले तर काय हरकत आहे
अगदी पनीर टिक्का पिझ्झा असं काहीतरी बनू शकते आणि तो किती छान लागतो हे मी
तुम्हाला नक्कीच सांगायला नको
-- 
जयदीप भोगलेटीप हा लेख  मराठी कल्चरस अँड फेस्टिव्हल या इ दिवाळी अंकात छापून आला होता

शहीद



रक्ताचं पाणी आणि हाडाची काडे
क्वार्टर चा ग्राफ कसा उंच उंच वाढे

"पॅट" चा चाबूक आणि "सॅप" चा लगाम
घड्याळाचा काटा कसा जाई भर भर पुढे

इक्विटी आणि डेट असे राहू केतू
बॅलन्स करून सुद्धा सूर्याला ग्रहणच पडे

इन्व्हेस्टर रिलेशन आणि कंपनीची पोजिशन
एकावर एक शिलेदार कसा उचली विडे

मॅरेथॉन ची शर्यत डाएट ची नियत
हृदयाच्या धडधडीचा चा कसा विसरच पडे

कॉर्पोरेट च्या धावण्यात सुरवात होते फक्त
शेवट होतो जेव्हा शरीर निपचित पडे

जयदीप
20 फेब्रुवारी 2018

काही जुन्या बातम्या वाचून हळहळ व्यक्त करून काही गुणी कॉर्पोरेट शाहिदांना समर्पित

बचेंगे तो और भी लढेंगे।।।। 0

पॅट- PAT ( profit after tax)
सॅप- SAP ( असं काहीतरी असत)

सविनय ....




तुमचा विनय आमचा माज
होऊन जाऊ दे द्वंद्व आज
तलवारीच्या खणखणीचा
छेडून टाकू नवीन साज

तूमची समानता आमची विषमता
पण पोळी दोघे भाजू आज
लेनिन असो की गांधीबाबा
हटवू त्यांना विकू समाज

तुमची मीडिया आणि आमचा भेडीया
बाजूस काढू होऊ विराज
मेणबत्ती आणि काळे झेंडे
डोळे मिटू आणि करूया राज

जयदीप भोगले
7 मार्च 2018
15.22

Tuesday, February 27, 2018

प्रेम मराठी अभिमान मराठी

मराठी दिन म्हणजे नुसता स्मरणदिन नसावा
अभिमान तिचा मनी कायम ठसावा

प्रेम तिच्यावर सागरागत असावे
जरी आली ओहोटी पुन्हा उचंबळून यावे

देवासारखे तिला देव्हारी का बसवावे
आईसम तिस नित्य नियमी बोलावे

गणेशसुत वंदी कुसुमाग्रजांना
मराठीदिनाच्या शुभेच्छा सर्व मराठी मनांना

प्रेम मराठी अभिमान मराठी

जयदीप भोगले
27 फेब्रुवारी 2018

Friday, February 2, 2018

कॉफी


धुंद तुझा गंध सखे
स्वच्छदं अशी साथ
श्याम रंग तुझा रात्र जागे
दौडे अशी तू मनात
शहाणी असे तू उष:काली
वेडी होई  जेव्हा रात
गप्पा असो की आठवण
प्रत्येक प्यालातून हाक
पहाडवरची ललना जणू
वाफेतून लागे घुमू
निर असो क्षीर कधी
तुझाच सम्राज्ञी चा थाट
ब्राझील ची लेडी म्हणू
का कुर्ग ची परी तू अस्मानी
काळी जादू करे जगात
जरी दुनिया गोऱ्यांची दिवाणी
कौतुकाचे शब्द माझे
कॉफी असे नाव तुझे
जुनी मैत्री असो की प्रीत नवी
सर्वांनाच तू हवी हवी

जयदीप भोगले
5 जानेवारी 2018
मुंबई एअरपोर्ट

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...