Friday, November 9, 2018

आणि .... सुबोध भावे


चित्रपट:    आणि... काशिनाथ घाणेकर

कलाकार ...सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी आणि बरेच मातब्बर कलाकार


दिग्दर्शक : अभिजीत देशपांडे


पाहावा की नाही: 'तुला पाहते रे पाहता का ?? ' मग उत्तर मिळेल..

नावात काय आहे असं बरेच जण सांगतात अनुभवतात पण जेव्हा एखादा बायोपिक तयार होतो त्याच्या नावातच सगळं असतं कुतुहुल, कथा, आठवणी ,परीक्षा आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्यासाठी दिग्दर्शक ते प्रेक्षक "याजसाठी केला अट्टहास" म्हणत असतात.

बहुचर्चित व दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित झालेला हा चित्रपट,  बऱ्याच जणांच्या लाडक्या असणाऱ्या डॉ काशिनाथ घाणेकर यांची कथा सध्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या मध्यमवयीन देखणा  आणि घाऱ्या डोळ्याचा नट सुबोध भावे साकारतो आहे म्हणजे कुतूहल व परीक्षा या दोन्ही गोष्टी  शिगेला असणारच..

यात काशीनाथ घाणेकर यांचा डॉक्टर ते ऍक्टर असा प्रवास.
सिगरेट च्या धुरासारखं उडत जाणारं वलयांकित  आयुष्य.
दारूच्या घोटसारखी  अर्थशात्रच्या इंजिल लॉ ऑफ consumption ला खोटे ठरवणारी अफाट प्रसिद्धी...
व उंच अशा धबधब्याजोगी प्रसिद्धी ते नाराजी असणारी त्यांच्या जगण्याची बेफीक्री या सगळ्याचा मिलाफ म्हणजे आणि डॉ काशीनाथ घाणेकर...

बालगंधर्व ,लोकमान्य आणि काशिनाथ या तीन भूमिका तितक्याच वेगळ्या पद्धतीने साकारणारे सोने म्हणजे सुबोध भावे . बालगंधर्व सम गळ्यातला लक्ष्मी हार असू दे की सोनेरी मानपत्र असलेलं लोकमान्यांचं आयुष्य... आणि हेवा वाटणारं व कधीही हरवेल अस मनगटात असणाऱ्या डॉ काशिनाथ घाणेकर यांचं ब्रेसलेट ...या सगळ्याची घडण सुबोध भावे यांच्या बावनकशी सोन्यातूनच घडलीय आणि एकदम शोभलीय सुद्धा..

स्क्रीनभर पुरून उरणारा सुबोध भावे , दिवाळीच्या फराळाच्या थाळीत असणारा प्रत्येक पदार्थ जसा आवश्यक असतोच आणि एकदम जमून जातो असे सर्व कलाकार व त्यांचे अभिनय  यामुळं सिनेमा मराठी रसिकांना पसंतीस पडेल हे नक्की..

सिनेममधली गाणी थोडासा रटाळ वाटणारा शेवट व फक्त अश्रू आणि संभाजी यावर सुपरस्टार होणारं डॉक्टरांच आयुष्य या गोष्टी खटकणा-या वाटतील सुदधा पण परिपूर्णता म्हणजे पूर्ण विराम .. त्यामुळे कलाकृती उद्गारवाचक , प्रश्नार्थक असणं जास्त चांगलं असं मला नेहमी वाटतं...उसमे क्या है !!!!

डॉ साहेबांनी रंगभूमीला पुष्कळ काही दिलं पण त्यांच्या धुरकट व प्यालाच्या  चष्म्यातून पाहिलेल्या आयुष्यामुळे आम्ही तरुण एका मोठ्या नटाला रंगभूमीवर पाहायला मुकलो याची खंत नक्कीच वाटते.

चित्रपटात एक स्वगत आहे की टाळी ही कलाकाराला सरस्वतीने दिलेला शाप आहे .
पण खरं तर सुधाकरापासून काशीनाथपर्यंत (बाकी सुद्धा बरेच) लोप पावणारे  स्पिरीट चे दिवे पाहिले की कळते की सुरा हाच कलेला न कळलेला  शाप आहे.

अर्ज किया है

ए गालिब तू वली होता
अगर तू बादाखार न होता

सुबोध भावे यांना त्यांच्या वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।।।

जेडी
9 नोव्हेंबर 2018

No comments:

Post a Comment

ध्यासपर्वाची विलक्षण अनुभूती -आनंदी गोपाळ

निर्मिती - फ्रेश लाईम फिल्म्स, झी स्टुडिओज दिग्दर्शक- समीर विद्वंस कलाकार - ललित प्रभाकर ,अंकिता गोस्वामी आणि भाग्यश्री मिलिंद आणि गीता...