नाविन्य , औत्सुक्य , भव्यता या तिहेरी धाग्यात जेव्हा काही विणले जाते आणि त्यातून जी कलाकृती बनते , ती नेहमीच कलासक्त माणसाचा आणि अगदी अरसिक मनाचा सुद्धा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही . या धर्तीवर आपली लाडकी झी मराठी वाहिनी नेहमीच काहीतरी घेऊन येते . मग अगदी सारेगमप असो , मराठी पाउल पुढे ते थेट विनोद या तीन अक्षरी शब्दाला नया है म्हणून हसायला लावणारी फु बाई ,. या प्रत्येक कार्यक्रमात ही तीन वैशिष्ट्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात …

तर सगळ्या प्रस्तावनेचा प्रयोजन असं की १८ मे पासून जय मल्हार ही मालिका झी वाहिनीवर येतेय असं ऐकलय असं वाचलंय . आता पुन्हा तेच तीन गुण ,
नाविन्य … असा प्रयोग मराठी मालिकेत झाला नाही . तसा पुरुष नायक असलेल्या मालिकेचे या टी वी ला वावडेच असते म्हणा… पण ह्याचा हिरोच जर आमचा मल्हारी मार्तंड आहे तर अजून काय सांगू ? .आणी खंडोबा आपला कुलदैवत आहे, पण आपल्या कुलदैवता बद्दल माहिती असतेच असे नाही त्यामुळे कथा नवीन आहे हे वेगळे कशाला सांगावे
औत्सुक्य…. प्रोमो वरून तर उत्कंठा वाढती आहे . खंडोबा ची भूमिका कोण करताय ? त्याची कहाणी काय .आपण जेजुरी ला जातो, पण जुने जेजुरी कसे होते …
भव्यता … वर्तमानपत्रात लिहिल्याप्रमाणे ही सर्वात महागडी मालिका असेल, त्यामुळे ही मालिका भव्य असावी कारण प्रोमो तर नक्कीच भव्य वाटतोय . पौराणिक व ऐतिहासिक काळ दाखवताना जर भव्य नसेल तर त्याचा परिणाम होणार नाही त्यामुळे ती भव्य असेल अशी आशा तरी झी मराठीकडून नक्कीच करू शकतो .
आजकाल झी मराठी होणार सून , जुळून येती मुळे प्रसिद्धीच्या शिखरावर असल्यामुळे, कांचनगंगा शिखर सर करणाऱ्या गिर्यारोहकाला जसे एवरेस्टच गाठावे लागते, तसे काही या मालिकेकडून अपेक्षित आहे हे मात्र नक्की .
मी लहान असताना आलेले 'भारत एक खोज' मला एकदम निराळे वाटले होते. तसा काहीतरी अनुभव ही मालिका देऊन जाईल का?
सासू सुनाच्या ओशट प्रेम आणी अश्रूंच्या पुरातून वाचवून ही मालिका टी वी ला थोडे रांगडेपण देईल का ? स्वयपाक घरातील राजकारण आणी मागच्या परसात हैदोस घालणाऱ्या , पुढच्या पावलाच्या मालिकांची ही हकालपट्टी करेल का ?
असे बरेच प्रश्न माझ्या मनात तर आहेत . त्याची उत्तरे मिळायला थोडा वेळ तर लागेल . पण तितके वाट पाहण्याची सवय आपल्याला जाहिरातींनी लावलेलीच आहे .
त्यामुळे एखादी आवडीचा कार्यक्रम पाहताना जसा मी दबा धरून बसतो तसाच जय मल्हार पाहण्यासाठी बसतोय …
तुमच्यापैकी सुद्धा माझे काही मित्र अशी वाट नक्कीच पाहत असाल …
पाहू या तर मग येळकोट मल्हारी मार्तंडचा ….
जयदीप भोगले
23 .04.14