Monday, July 30, 2018

पुष्पवृष्टी व्हावी असे नाते ....पुष्पक विमान



गेले काही दिवस सगळीकडे पुष्पक विमानाच्या उड्डाणाची बरीच चर्चा आहे ......
मला पण कुतूहल आहे ...ते त्यातल्या आजोबा आणि नातवाच्या नात्याचे

" मी तुझी सुरवात आणि तू माझा शेवट  "  या वाक्यानेच माझी उत्कंठा शिगेला पोहोचलीय..

ही सिनेमाची समीक्षा किंवा त्याची जाहिरात आहे असं नक्कीच नाही पण या नात्याला अनुभवलेल्या आणि ते सुंदर नाते जवळून कौतुकाने पाहणाऱ्या प्रत्येक नातवाला उद्देशून आहे..

माझे आजोबा आमच्यापासून दूर असल्याने त्यांचा सहवास मला नक्कीच लाभला नाही .पण जेव्हा मी पहिल्यांदा त्यांना माझी तोडकी मोडकी यमक व अनुप्रास या दोनच गोष्टी ठळक असणारी कविता  ऐकवली ...अगदी ते ऐंशी वर्षाचे झाल्यानंतर....त्यांचा डोळ्यातली चमक मला कौतुकाची थाप देऊन गेली  ..

मला म्हणाले ...तुझा पप्पा फार काही कवितेला शोधू शकला नाही मला तुझ्यात ती आस्था दिसतेय आणि आता आजोबा नसताना सुदधा त्यांची तसबीर मला कुठेतरी त्यांच्याबरोबर घेऊन जाते .त्यांच्या कवितेच्या शेवट माझ्या कवितेची सुरवात करून गेला.

आजोबा आणि नातू हे अवखळपणा, बाळहट्ट ,न समजणारे संवाद तरीही हृदयाला भिडणारे असतात नाही का ??

माझी आई सांगते ...माझ्या पप्पानी आम्हाला जितके लहानपणी लाडाने जवळ घेतले नाही तेवढे ते आता ते माझ्या मुलाला खेळावतात...त्यांची ऊर्जा आणि माझ्या मुलाची ऊर्जा जुळते ..."एनर्जी लेव्हल " म्हणतात ना मराठीत .

 कुठेतरी ते त्यांना त्याच्यात शोधत राहतात .बहुतेक.
 मला शिस्त लावणारे त्याच्या "डोक्यात जाणाऱ्या"  दंग्याला सुद्धा प्रीमिअर चे पासेस दिल्यासारखे आनंदून एन्जॉय करतात

आता हे असे वयाच्या पलीकडे जाणारे नाते एककेंद्री कुटुंबात आजकाल कमी अनुभवायला मिळत असेल, पण तरीही ते नाते एखादे बी अगदी ओलावा मिळाला की कसे लगेच रुजते त्याप्रमाणे एका भेटीत आपलं एक विश्व निर्माण करते ..

 लोक म्हणतात जरा नातं दृढ व्हायला वेळ दे.. तसला वेळ याला कधी लागतच नाही.

आजोबा आणि नातवाची दुडकी पाऊले व   अगदी कुठलाही वेग नसलेली अशी जोडी लांबून पाहिली की जनरेशन गॅप इतका कमी होऊ शकतो हे या स्पीड क्रेझी जगाला ला कदाचित समजू शकेल

आजोबा नातवासाठी मॅगी चवीने खातात आणि नातू विठ्ठलाच्या मंदिरात डोरेमॉन सोडून पळतो असे आध्यत्मिक साक्षात्कार बहुतेक हेच नाते अनुभवताना येतात.

आयुष्यात सगळं कमावून, गमावण्याची कसलीही चिंता नसलेलं विश्व ,कार सोडून वाटी चमच्याने खेळायचं अशा व्यवहारदूर विश्वात कसं समरस झालेलं असतं हे प्रत्येक आजोबा व नातू कुठेतरी नक्कीच अनुभवतात हे मला वेगळं सांगायला नकोच ..

 आता हे नातं आजीबरोबर असतं का ?नातीचं काय ???
असलं स्त्रीवादी सध्या मी बोलू शकत नाही अगदी त्याबद्दल सगळ्या आजीबाईंची व नातींची  माफी मागायला मी तयार आहे

कारण पुष्पक विमान च्या जाहिरातीने मी आधीच आजोबांच्या आठवणीत आहे व एका आजोबांना व नातवाला जवळून पाहतो आहे..

आता हा सिनेमा पडद्यावर यशस्वी होणार का ???वगैरे व्यावहारिक गणित करायला बरेच बाबा लोक असतील ...आहेतही... त्यामुळे त्यात मला सध्या नातू म्हणून पडायचे नाही..

पण सगळ्या आजोबा - नातवांचा स्पेशल शो असेल तर 3 ऑगस्ट ला आमच्या घरट्याच्या जोडगोळीला या विमानाचा प्रवास घडवावा हे मात्र नक्कीच माझ्या मनात आहे ते सुद्धा तिकीट काढून...
 कारण काही तरी अव्यवहारीक जवळीक अनुभवायची असेल तर इतकं व्यावहारिक जरूर असावं असं माझ्या आजोबांनी मला नक्कीच शिकवलं आहे...

जयदीप भोगले
30 जुलै 2018

Friday, July 27, 2018

गुरू


चक्रव्यूह भेदण्यासाठी
लढवय्या होण्यासाठी
सिकंदर म्हणून जिंकण्यासाठी
कधी पोरस म्हणून हरण्यासाठी
एक गुरूच हवा
पायावर उभारण्यासाठी
जमीनीवरच  राहण्यासाठी
विशाल समुद्रात पोहण्यासाठी
गगनभरारी घेण्यासाठी
एक गुरुच हवा

अर्जुनाच्या कर्तव्यासाठी
एकलव्यासम त्यागासाठी
विवेकानंदाच्या विरक्तीसाठी
आणि नतमस्तक होण्यासाठी
एक गुरुच हवा
जयदीप भोगले
27 जुलै 2018
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
व माझ्या सर्व गुरुंना सादर  प्रणाम🙏🙏🙏

Friday, July 6, 2018

कोडे


अवघड कोडी सोपी होतात अन सोप्या गोष्टी अवघड
दृष्टिकोनाचा गुण कधी कधी दोष डोळ्यावरची झापड
धुरंधर म्हणता म्हणता होई नोकियाचीही पडझड 
नवशिका म्हणता म्हणता हळूच गुगल होई वरचढ
उघडे डोळे उघडे कान हाच मंत्र तू वापर
झाडे नेहमी तोडली जाती .गवताचे बनते छप्पर
जयदीप भोगले


6 जुलै 2018

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...