Showing posts with label जयदीप भोगले. Show all posts
Showing posts with label जयदीप भोगले. Show all posts

Friday, February 14, 2020

जोडीदार आणि ड्रेस ची निवड



मला नेहमी जोडीदार शोधणे आणि ड्रेस घेणे यात साधर्म्य वाटले आहे . हा काही जणांना अगोचर पणा किंवा how mean ?? how insensitive  असं वाटू शकतं पण कल्पकतेला  मर्यादा असू नयेत… नाही का ?? म्हणून हा शब्दप्रपंच…
ड्रेस घेताना आपण ब्रँड , कलर, कपडा व फील, ट्रेंड,किंमत, कुठे मिळतो आणि फिट व कम्फर्ट या सर्व  कंगोऱ्याचा विचार करत असतो . सगळे लोक या गोष्टी उघड बोलत नसतीलही पण जोडीदार निवडताना  याचा कळत नकळत  विचार होत असतो
: ब्रँड - कुठल्या कॉलेजचा ,शहर ,IIT IIM  या गोष्टी ला काहीजण प्राधान्य देतात . गावाकडचा वाटतो... बांद्रा मध्ये राहतो ... पेठेत राहतो ... अरण्येश्वर ला बंगला आहे   या गोष्टींना प्राधान्य दिल्यामुळे ऐनवेळी काहीतरी गडबड आहे असं जाणवायला लागते
रंग -हा कपडा व जोडीदार हुडकण्याचे एकदम हुकमी माप .. या मध्ये हा रंग नाही का ?? असे विचारणारे लोक जोडीदार सुद्धा काळा, गोरा ,लक्ख गोरा ,सावळा, उजळ,  तरतरीत असले डोक्यात ठेवून आपलं ठरवत असतात
यात बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड वधू वर या सगळ्या मध्ये हे सर्व मापदंड लागू असतात हे मला इथे विशेष सांगावे वाटते..
कपडा व फील .. जोडीदाराची भाषा ,  शिक्षण झालेले माध्यम जात धर्म जन्मगाव असले तक्ते म्हणजे कपडा व फील सिलेक्ट केल्यासारखे आहे.. रंग छान आहे पण कपडा 100 टक्के कॉटन नाही असं म्हणण्यासरखं असतं
 ट्रेंड आणि किंमत -आता आज valentine day   असल्यामुळे हा मापदंड जास्त जवळून हाताळावा असं मला उगीच वाटतंय
वधू किंवा गर्लफ्रेंड हुडकताना ट्रेंड हा लोकांना एकदम नवाच हवा असतो .. जितकं मॉडर्न तितकं महाग असतं .. महाग असलं की परवडत नसतं .. अगदी धाडस केलं तरी हे मॉडर्न प्रकरण आपल्या एरियात कसं वागवायचं हा एक मोठा प्रश्न असतो .. एकदम हटके हे तितकंच हटलेलं सुद्धा असू शकतं तरी एकदम चम्या दिसतो .. एकदम काकुबाई वाटते... बाबा आजम के जमानेकीं वगैरे असल्या उपाधी आपण ऐकल्या असतीलच ...
: कुठे मिळतो - हा प्रकार जरा नवीन वाटला तरी सुदधा तितकाच महत्वाचा निकष ठरवला जातो
आपल्याला आवडणारा पॅटर्न आपल्याला परवडेल अशा किमतीत निवडणंयाचं कसब प्रत्येकाला अवगत नसतं तसं आपल्या कोष्टकात बसणार जोडीदार कुठं मिळतो हे सुदधा हुडकण्याच एक तंत्र असतं
फर्ग्युसन पेक्षा SP बरे .. मिठीभाई व जेवीयर्स पेक्षा रूपारेल किंवा साठे म्हणजे हुशार असेल  असल्या गोष्टी आपल्या आपल्या गावप्रमाणे आपण केल्या असतीलच...

: कम्फर्ट आणि फिट-    प्रत्येक माणूस वरच्या निकषा मध्ये इतका गुरफटून जातो की घेतल्यावर कळते अरे याचं फिट गडबड आहे फिट वाटतंय पण मी कम्फर्टेबल नाही
आणि सगळ्या मध्ये इथं नडतं
बरेच लोक वाचताना हे म्हणत असतील सुदधा…” मी फिट ला जास्त महत्व देते कम्फर्ट महत्वाचा आहे हे मला माहीत आहेच”
पण विचार केला तर लक्षात येईल ब्रँड कलर ट्रेंड या सर्व गोष्टी मध्ये दिवसेंदिवस लोक फिट आणि कम्फर्ट विसरत चालले आहेत  .. यालाच अंतरंग असं काहीतरी म्हणतात . म्हणुन आपल्याला पूर्वी एखादा खुजा आणि एक उंच काळी व गोरी आनंदाने सहजीवनाची 50 वर्ष पूर्ण केलेली दिसतील व ट्रेंडी आणि ब्रँड वाली लोकं something is missing   म्हणून नाक मुरडताना दिसतात.
: त्यामुळं प्रत्येक जोडीदाराने निवड करताना बाकी सगळं सोडून आपण कसे आहोत आपलं कुटूंब कसं आहे हे विचारात घेऊन बेस्ट फिट निवडलं की ते कायम हवं हवं वाटतं आणि
जोडा लक्ष्मीनारायणासारखा दिसण्यापेक्षा असणं जास्त समाधानाचं असतं चिरकाल टिकणारं राहतं
Valentine Day  च्या हार्दिक शुभेच्छा

जयदीप भोगले
14 02 2020

या विषयाला हलकं फुलक मानानु कपडे व जोडीदार यांची निवड याची तुलना केल्यामुळे राग मानू नये Tangent मध्ये तर नक्कीच जाऊ नये

Thursday, August 15, 2019

सिनेमा आणि देशभक्ती



देशभक्ती ही भावना लोकांच्या मनात ठेवायची ,वाढवायची ,आठवण करुन द्यायचं काम  भारतीय सिनेमा ने केले आहे . हा विषय नुसता काढला तरी किमान दहा सिनेमे आपल्या प्रत्येकाला आठवल्या शिवाय राहणार नाहीत
सिनेमा हा या भावनेचा वापर प्रसिद्दी व व्यावसाईक यश यासाठी करत जरी असेल तरी त्यांच्या या कामातून नकळत का होईना देशभक्ती हा विचार रंजक पद्धतिने का होईना लोकांपर्यंत पोहचतो या बद्दल सिनेमासृष्टी व सिनेमा वाहिन्या यांचे अभिनंदन करावं असं मला वाटतं
समाजाचा सांस्कृतिक सहभागाचा स्वातंत्र्यपूर्व काळा पासून देशभक्ती वाढवण्यासाठी नक्कीचं खूप उपयोग झाला आहे.
पोवाडे समर गीते मेळे संगीत नाटकं ते आता असणाऱ्या भव्य 3D सिनेमा यापर्यंत त्यांचे योगदान प्रत्येकाला विसरून चालणार नाही.

चीन च्या युद्धावर प्रकाश टाकणारा हकिकत
जय जवान जय किसान वर प्रकाश टाकणारा 'उपकार' असो विविध लक्षवेधी सिनेमातून हिंदी सिनेमा 1942 A love स्टोरी... ते 'उरी'  व 'केसरी' यापर्यंत फुलत आला आहे.
देशभक्ती व सामाजिक जाणिव याची बाजू सर्वात सुंदर पद्धतीने मनोज कुमार यांनी आपल्या चित्रपटातून मांडली असं मला नेहमी वाटतं । आता यात काही टीकाकार त्यांच्या चित्रपटात असलेले व्यावसायिक कंगोरे यावर टीका करू शकतील पण 50 वर्षांनंतर सुद्धा जर देशभक्तीपर सिनेमा असं आठवायचं असेल तर त्यांच्या सिनेमाचा वरचा क्रमांक कुणी नाकारू शकणार नाही

मराठी सिनेमा पण देशभक्ती पेक्षा सामाजिक प्रबोधन करण्याऱ्या चित्रपटात जास्त लक्षात राहिला असं मला नेहमी जाणवतं ।  लोकमान्य , फर्जंद , सावरकर असे काही तुरळक प्रयत्न सोडले तर मराठी सिनेमा मधलं खड्ग छत्रपतीकालीन काळात जास्त यशस्वी व रममाण झालं असं मला नमूद करावं वाटतं। आद्य क्रांतिकारक वासुदेव फडके, चाफेकर बंधू ,आणि कितीतरी मोठे क्रांतीप्रणते  महाराष्ट्रात होऊन गेले तरी व्यावसायिक यश मराठी देशभक्तीपर सिनेमाला मिळालं नाही .
याला कुठली कारणं आहेत व होती हा शोधनिबंधाचा विषय असू शकतो पण हा विचार तुम्ही एक मराठी म्हणून केला तर तुम्हाला ते जाणवून जाईल.
या  दिनानिमित्त केलेल्या उहपोहातून चित्रपट हे माध्यम नेहमी आपल्याला क्षणिक का होईना देशभक्ती च्या जवळ घेऊन जाते याबद्दल मला सर्व चित्रपट सृष्टी चे अभिनंदन करावे वाटते.
आपल्याला देशभक्ती म्हटलं की कुठले चित्रपट आठवतात याचा विचार एक भारतीय एक सिनेमा चाहते म्हणून नक्की करा
व  बाटला हाऊस च तिकीट बुक करा नाही मिळाले...

 नाहीतर झी सिनेमा वर केसरी आहेच तो पाहून सिनेमाच्या माध्यमातून थोडे देशभक्त होऊ या


73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जयदीप भोगले
15 ऑगस्ट 2019

Tuesday, April 30, 2019

नजरिया



काश ये आसमां हमारा होता
तो जमीं का नजारा कूछ और होता

हमारे  मकाम के रास्ते हम उपर से ही खोज लेते
इस गली कुचे मे शायद गुमशुदा नही होता

जमीं की खूबसुरती उपर से ही देख लेते
यूँ बुतों के बाजार मे बेजार नही होता

इस सोच को पल भर एक बादल ने तोडा
जोरो से बरस के जमीं पे ला छोडा

जब टूटा तो जमीन के इंसां से जुडा
 नही तो आस्मान का खुदा बन गया होता

जयदीप भोगले
30 एप्रिल 2018
नेरुळ 2200

Sunday, February 17, 2019

ध्यासपर्वाची विलक्षण अनुभूती -आनंदी गोपाळ



निर्मिती -फ्रेश लाईम फिल्म्स, झी स्टुडिओज
दिग्दर्शक- समीर विद्वंस
कलाकार - ललित प्रभाकर ,अंकिता गोस्वामी आणि भाग्यश्री मिलिंद आणि गीतांजली कुलकर्णी
संवाद -इरावती कर्णिक
गीते- वैभव जोशी संगीत -हृषीकेश दातार जसराज जोशी

प्रत्येकाने पहावा व दुसऱ्यांना दाखवावा असा

डॉ आंनदी बाई जोशी पहिल्या महिला डॉक्टर असं हुशार मुले ,सामान्य ज्ञान असणारी जिद्यांसू मुले , यांना हे नाव कदाचित परिचित असेलच..

पण एखादं नाव नावारूपाला येण्याआधी त्यामागचा संघर्ष ,तिच्या आयुष्यातील खडतर प्रवास, प्रतिकूल परिस्थिती असून त्यावर केलेली मात आणि ही ज्ञानगंगा चित्रलोकी आणण्याचं काम करणारा भगीरथ म्हणजे गोपाळराव जोशी  ( आनंदी बाईंचे पती ) या सर्वाचं सिंहावलोकन करून 2 तास 14 मिनिटात त्याचा एक बायोपिक पाहुन जेव्हा नतमस्तक व्हाव वाटतं  ती कलाकृती म्हणजे "आनंदी गोपाळ "
प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे असणाऱ्या अगणित माता पत्नी शिक्षक यांची मोठी यादी आपल्याकडे नक्कीच असते पण  150 वर्षांपूर्वी आपण शिकू शकतो हे मनाला शिवत सुद्धा नाही अशा स्त्री ला आपल्या काहीशा जिद्दी हेकेखोर टोकाच्या आणि तऱ्हेवाईक दृष्टीकोन ठेवुन डॉक्टर बनवणारे वल्ली भगीरथ म्हणजे गोपाळराव जोशी .  या जोडप्याच्या ध्यासाची आणि त्यांच्या प्रवासाची अत्यंत प्रभावशाली गोष्ट म्हणजे चित्रपट ..आंनदी गोपाळ

... चित्रपट म्हणून एक उत्कृष्ट कथा, त्यामागची भूमिका जाणून केलेलं जाणतं दिग्दर्शन ,ते घडताना तोच दृष्टीकोन दाखवणारं  डोळस छायाचित्रण, या छायाचित्रणाला 150 वर्षापूर्वी घेऊन जाणारे अत्यंत प्रभावी असे कला दिग्दर्शन आणि वेशभूषा, या सर्व गोष्टीला साजेसे हृदया व मनाला हलवणारे संवादलेखन व गीतलेखन
व या पंचमहाभूतातून बनलेले व्यक्तिचित्र आणि त्या भूमिका जगणारे ललित प्रभाकर ,भाग्यश्री मिलिंद, गौरी कुलकर्णी
या मुळे अतिशय उत्कृष्ट चित्रनिर्मिती  म्हणजे… आनंदी गोपाळ

उंच माझा झोका सारखी सारखी उत्कृष्ट मालिका सासू सून झंझावात असताना सुद्धा झी मराठीने प्रवाहाविरुद्ध निर्माण केली आणि त्याच सोनं केलं या झी समूहाने या विषयाला भक्कम निर्मिती साथदिली हेंसुद्धा त्यांनी गोपाळराव जोशी यांच्या प्रयत्नांना साथ दिल्यासारखं आहे असं मला इथं म्हणावं वाटतं

हा सिनेमा हा फक्त त्या काळाचं दर्शन व जाणीव किंवा डॉ आनंदीबाई जोशी  यांना वंदन करून थांबणारा नक्कीच नाही तर अजूनही प्रत्येक पुरुषाला महिलांना समान संधीच्या वाटा निर्माण करून देण्याची गरज आहे हे सांगणारा सुदधा आहे.
अजून सुद्धा आपली संस्कृती “पंचकन्या स्मरे नित्यम” म्हणणारी जरी असली तरी काचेचं छप्पर देऊन तिला रोखणारी सुद्धा तितकीच आहे हे सगळ्या पुरुषांना कळत नकळत माहीत असेलचं..
कदाचित म्हणूनच चित्रपताशेवटी असणाऱ्या काही वेधक छायाचित्रात अजूनही पहिली महाराष्ट्राची मुख्यमंत्री स्त्री नाही हे कुठतरी जाणवून जातेच..
पण हा सिनेमा पाहून आल्यावर उद्या जर आपल्या घरातील स्त्री ची कुठलीही महत्वाची मीटिंग काम असेल तर तिचा डबा जरी घरच्या पुरुषाने भरून दिला तर चित्रपट निर्मितीचा सर्व खर्च कारणी लागला असं निर्मात्यांना  म्हणावं लागेल..

हे सर्व वाचल्यावर आणि आनंदी गोपाळ सिनेमागृहात पाहिल्यावर कदाचित तुमच्या मधला सकारात्मक गोपाळ जागा होईल व तुमच्या जवळच्या आनंदीला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देईल ही ईश्वर चरणी प्रार्थना...

जयदीप भोगले
17 फेब्रुवारी 2019

Monday, January 14, 2019

पतंग


पतंग होऊनि उडे अस्मानी
दुनिया बघते होऊन दिवाणी
सैर सपाटा पतंग करतो
परी, मांजा पकडे एक शहाणी
म्हणे कशी ती तू स्वछन्दी
पवन अश्व तो अन तू आनंदी

म्हणतो पतंग हळूच पामर
तुझाच मांजा ...मी  गं ..चाकर
उंच उडतो.. अन मिळते संधी
पण अस्मानी मी तुझाच बंदी
पतंग आहेत बहुत अस्मानी
पण दोर सांभाळी त्यांचीच राणी
जगास  भव्य  ते नाट्य दिसे
पण घरीच बनते त्याची कहाणी
सर्व पत्नी लोकांना सर्व पतंग सम पती  जमातीच्या संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या गोड बोला
जयदीप भोगले
14 जानेवारी 2019

Thursday, January 3, 2019

लग्न (लग्नसराई साठी खास)

मी म्हणाले एकदा
लग्न मॅरेज शादी म्हणजे काय रे भाऊ ???
सगळे म्हणाले ..आम्ही करून फसलोय तू तिथे नको जाऊ

मी म्हणाले..
आता त्याला हो म्हणून बसलीय
येवल्याची पैठणी आणि पेठयांची ठुशी घालून बसलेय
काही नवीन तुझ्याकडे असेल तर मला छान सांग पाहू..
लग्न मॅरेज शादी म्हणजे काय रे भाऊ???

भाऊ म्हणाला

लग्नानंतर आपला प्रियकर एकदम नवरा च बनून जातो
ताई सारख्या लोकांना चक्क "साली" म्हणू लागतो
डेमो एकदम असतो छान..  2 लेवल पेक्षा जास्त खेळून नको पाहू..
सगळे म्हणाले.. आम्ही करून फसलोय तू तिथे नको जाऊ

मी आता म्हणाले आता काय करावे ??
बोहल्यावर  चढल्यावर मागे का फिरावे ?
पीएचडी पर्यंत शिकतेय आता ही सुदधा परीक्षा देऊनच पाहू.

सगळे म्हणाले आम्ही फसलोय तू तिथे नको जाऊ.

इतक्यात एक मला आजोबा आजी दिसले
आजीना माळून गजरा शेजारी जाऊन बसले

आजोबा म्हणाले

50 वर्ष झाली एकत्र ..पण अजून पुढं जायचं आहे
पॅरिस च आयफेल टॉवर दोघांना एकत्र बघायचं आहे
भांडण वाद आणि वैताग मी जरा बाजूलाच ठेवतो
कारण हिच्यासारखा चहा जगात कदाचित कुणाला येतो?

विश्वास आणि प्रेम असलं की जोडपं होतं मनमिळावू...

जयदीप भोगले
24 dec 2018

Sunday, October 28, 2018

सोनेरी क्षण





पहिल्या प्रेमाच्या सोनसाखळीतून
 सुवर्णमहोत्सवी संसाराच्या नथीतून
 भरघोस बोनसच्या हिऱ्याच्या कुडीतून
सोनेरी क्षण असेच बनतात अतूट प्रेमातून

आईच्या साठवलेल्या स्त्रीधनातून
कधी सासूबाईंच्या लक्ष्मीहारातून
ओवाळणी दिलेल्या गुंजभर सोन्यातून
सोनेरी क्षण असेच दृढ होतात अतूट प्रेमातून

शीलंगणाच्या अक्षय वळ्यातून
 गुरुपुष्याच्या वाढणाऱ्या मण्यातून
दिवाळीच्या लाजणाऱ्या ठुशीतुन
सोनेरी क्षण असेच वाढतात अतूट प्रेमातून

कधी हिऱ्यातून कधी सोन्यातून
कधी शुभ्र अशा चांदीतून
सोनेरी क्षण सदैव टिकतात WHP च्या सोबतीतून


जयदीप भोगले
4 ऑक्टोबर 2018

Wednesday, August 15, 2018

देशभक्ती व देहभक्ती



१५ ऑगस्ट जवळ आला की उगाच देशभक्तीपर गीते तिरंगी झेंडे ,जय हिंद चे फेसबुक स्टेटस आणि हो ..आजकालचे मनापेक्षा वेगाने पुढे जाणारे व्हाट्सएप मेसेजेस यात वाढ व्हायला लागते .हा दिवस फादर मदर आणि रोज या सारखाच एकदिवसाचा बनतोय असं मला नक्की वाटतंय.

आता हेच पहा ना हा लेख मी कदाचित जुलै महिन्यात सुद्धा लिहिला असता पण मला बरोबर 15 ऑगस्ट च्या तोंडावर सुचतोय म्हणजे मी सुदधा फार काही वेगळा नाही ,
पण देशभक्ती किंवा एकूण भक्ती या गोष्टीवरच चिंतन करावं असं मला वाटतंय म्हणून हे सगळं मनातलं मांडण्याचा खटाटोप .

मी माझ्या मुलाला जागृती सिनेमाचं आओ बच्चे गाणं दाखवतं होतो त्यावेळी त्याने मला विचारलं बाबा हे बलिदान म्हणजे काय असतं??
लहान वयात बलिदान वगैरे समजणं त्याला कठीण आहे मला कळत होतं ,पण मग त्यावरून मला लक्षात आलं की सध्या आपण एकूणच समाजाभिमुख भूमिकेकडून वयक्तिक दृष्टिकोन ठेवत आहोत .
 वयक्तिक दृष्टिकोन इतका जवळचा झालाय की माझा फोन ,माझा प्रोग्रॅम, माझा वेळ, माझी प्रायव्हसी अगदी माणसाचे गोल सुद्धा पर्सनल गोल्स बनत आहेत.
 आता इतकं जर वयक्तिक आपण आपल्या रोजच्या आयुष्यात बनत आहोत तर देशभक्ती सारखी अत्युच्च आणि समजायला कठीण अशी भावना मनात तयार होणे नक्कीच कठीण आह.
यात लोकांची किती चूक आहे हे मला सांगायचं नाही पण हेच कदाचित हळू हळू सर्व स्तरांवर होणाऱ्या बोथट भावनांचं कारण आहे असं मला वाटतं आहे

पहिल्यांदा येते शेअरिंग मग येते सामावून घेणे ते कळते तेव्हा त्याग समजायला लागतो व या सगळ्या गोष्टी जेव्हा एकदम रुजतात त्यावेळी खरी देशभक्ती ची भावना रुजायला लागते

देहभक्ती व वयक्तिक सुख व समाधान या सर्वात महत्वाचा वाटणारा विचार देशभक्ती कशी घडवून आणू शकतो कदाचित आणणे कठीण आहे .

आजकालची असणारी पोकळ आरक्षणे व समाज निदर्शने यात सुदधा फक्त वयक्तिक स्वार्थ यापेक्षा कुठलाही विचार समोर येतो आहे असं मला जाणवत नाही.

परदेशी कापडाची होळी व चरखा आणि खादी वापरण्याचा विचार असेल किंवा स्वतःच्या देशाच्या शिक्षण संस्था असाव्यात असा टिळकांचा व्यापक विचार असेल यात प्रत्येक ठिकाणी त्याग व सामावून घेण्याची भावना दिसून येते ती नक्कीच कमी झाली आहे.

समाज प्रगत होतो आहे . स्त्री जास्त स्वतंत्र होते आहे वेगवेगळ्या विचारामधले स्वातंत्र्य हे नक्कीच दिसून येते आहे .
पण भारत स्वतंत्र जरी होत असेल तर आपण स्वतः किती देशभक्त होत आहोत हे आपण अगदी आपल्या सार्वजनिक मालमत्तेच्या वापर असो की त्याचे होणारे नुकसान असो याच्या विषयी असणाऱ्या आस्थेवरून  आपल्याला पडताळून पाहणे गरजेचे आहे.

आता ही देशभक्ती ही केवळ शाहिद होणाऱ्या लोकांना अभिवादन करून वाढणार आहे का ? का आपण फक्त स्वदेशीचा वापर करून बळावणार आहे तर असं मला नक्कीच वाटतं नाही.

देशभक्ती ही फक्त सांडणारं रक्त आणि ऑलम्पिक मधल्या वाढणाऱ्या मेडल नी वाढत नसते .
आपण देशासाठी वाचवलेलं पेट्रोल, एखादं लावलेलं आणि वाढवलेल झाडं , सार्वजनिक मालमत्तेची जपणूक , वाचवलेलं एक ग्लास पाणी यातून सुध्दा ती तितकीच सार्थ बनू शकते .

आर्थिक दृष्ट्या दुर्बल असताना किंवा गुलामगिरीतला देश मेहनतीने व प्रतिकाराने आपली प्रगती करणे हे कदाचित न्यूटन च्या नियमात बसेल,
 पण जेव्हा आपला स्वयंपूर्ण होणारा व आर्थिक स्तर उंचावणारा समाज जेव्हा orbit shifting करून झेपावत असेल तर नियम वेगळ्या दृष्टीने पहाणे तितकेच महत्वाचे ठरेल असे मला सांगावे वाटते.

त्यामुळे या १५ ऑगस्टला ए मेरे वतन के लोगो ऐकून शाहिद लोकांचे स्मरण जरूर करू या पण आपल्या प्रत्येकाने देहभक्ती कडून थोडे तरी वेगळ्या पद्धतीने देशभक्त बनायला सुरवात करू या ...

जय हिंद

भारतीय स्वातंत्र्यादिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जयदीप भोगले
१५ ऑगस्ट २०१८

Wednesday, August 8, 2018

गटारी

गटामध्ये येऊन सारी
घेऊन  येती आज दारी
करती अवस ती साजरी
म्हणे गटारी ती

सौजन्य नसो की सोयरीक
पाणी असो वा की "नीट"
आज होती सगळे धीट
डोळे वटारी ...ती

कोंबडीस एक मासाचे अभय
मोडून रोजची ती सवय
दाढी वाढवायची ती सोय
वाटे विषारी  ती

आला वीकेंड तो जवळ
मित्र घालती हो शीळ
पटियाला भरून चंगळ
करतात गटारी ती

तळीरामच्या दुनियेत....
जयदीप (सुधाकर) भोगले
७ ऑगस्ट २०१८

😊😊😊

Sunday, August 5, 2018

मैत्री

मैत्री म्हणजेच एक कविता असते
वात्रटिका असो की भावगीत
दोन्ही जागी एकदम परिपूर्ण असते
फ्रेंडशिप डे च्या आठवणींची मुलाहिजा ती कधी बाळगत नाही
पण  या दिवशी खळखळून हसायला तिची कधीच ना नसते
भूतकाळ असो की वर्तमानकाळ कायम ती चिरतरुणच राहते
LIC  चं माहीत नाही पण ही जिंदगी के साथ और जिंदगी के बाद जरूर राहते

जयदीप भोगले
5 ऑगस्ट 2018

Monday, July 30, 2018

पुष्पवृष्टी व्हावी असे नाते ....पुष्पक विमान



गेले काही दिवस सगळीकडे पुष्पक विमानाच्या उड्डाणाची बरीच चर्चा आहे ......
मला पण कुतूहल आहे ...ते त्यातल्या आजोबा आणि नातवाच्या नात्याचे

" मी तुझी सुरवात आणि तू माझा शेवट  "  या वाक्यानेच माझी उत्कंठा शिगेला पोहोचलीय..

ही सिनेमाची समीक्षा किंवा त्याची जाहिरात आहे असं नक्कीच नाही पण या नात्याला अनुभवलेल्या आणि ते सुंदर नाते जवळून कौतुकाने पाहणाऱ्या प्रत्येक नातवाला उद्देशून आहे..

माझे आजोबा आमच्यापासून दूर असल्याने त्यांचा सहवास मला नक्कीच लाभला नाही .पण जेव्हा मी पहिल्यांदा त्यांना माझी तोडकी मोडकी यमक व अनुप्रास या दोनच गोष्टी ठळक असणारी कविता  ऐकवली ...अगदी ते ऐंशी वर्षाचे झाल्यानंतर....त्यांचा डोळ्यातली चमक मला कौतुकाची थाप देऊन गेली  ..

मला म्हणाले ...तुझा पप्पा फार काही कवितेला शोधू शकला नाही मला तुझ्यात ती आस्था दिसतेय आणि आता आजोबा नसताना सुदधा त्यांची तसबीर मला कुठेतरी त्यांच्याबरोबर घेऊन जाते .त्यांच्या कवितेच्या शेवट माझ्या कवितेची सुरवात करून गेला.

आजोबा आणि नातू हे अवखळपणा, बाळहट्ट ,न समजणारे संवाद तरीही हृदयाला भिडणारे असतात नाही का ??

माझी आई सांगते ...माझ्या पप्पानी आम्हाला जितके लहानपणी लाडाने जवळ घेतले नाही तेवढे ते आता ते माझ्या मुलाला खेळावतात...त्यांची ऊर्जा आणि माझ्या मुलाची ऊर्जा जुळते ..."एनर्जी लेव्हल " म्हणतात ना मराठीत .

 कुठेतरी ते त्यांना त्याच्यात शोधत राहतात .बहुतेक.
 मला शिस्त लावणारे त्याच्या "डोक्यात जाणाऱ्या"  दंग्याला सुद्धा प्रीमिअर चे पासेस दिल्यासारखे आनंदून एन्जॉय करतात

आता हे असे वयाच्या पलीकडे जाणारे नाते एककेंद्री कुटुंबात आजकाल कमी अनुभवायला मिळत असेल, पण तरीही ते नाते एखादे बी अगदी ओलावा मिळाला की कसे लगेच रुजते त्याप्रमाणे एका भेटीत आपलं एक विश्व निर्माण करते ..

 लोक म्हणतात जरा नातं दृढ व्हायला वेळ दे.. तसला वेळ याला कधी लागतच नाही.

आजोबा आणि नातवाची दुडकी पाऊले व   अगदी कुठलाही वेग नसलेली अशी जोडी लांबून पाहिली की जनरेशन गॅप इतका कमी होऊ शकतो हे या स्पीड क्रेझी जगाला ला कदाचित समजू शकेल

आजोबा नातवासाठी मॅगी चवीने खातात आणि नातू विठ्ठलाच्या मंदिरात डोरेमॉन सोडून पळतो असे आध्यत्मिक साक्षात्कार बहुतेक हेच नाते अनुभवताना येतात.

आयुष्यात सगळं कमावून, गमावण्याची कसलीही चिंता नसलेलं विश्व ,कार सोडून वाटी चमच्याने खेळायचं अशा व्यवहारदूर विश्वात कसं समरस झालेलं असतं हे प्रत्येक आजोबा व नातू कुठेतरी नक्कीच अनुभवतात हे मला वेगळं सांगायला नकोच ..

 आता हे नातं आजीबरोबर असतं का ?नातीचं काय ???
असलं स्त्रीवादी सध्या मी बोलू शकत नाही अगदी त्याबद्दल सगळ्या आजीबाईंची व नातींची  माफी मागायला मी तयार आहे

कारण पुष्पक विमान च्या जाहिरातीने मी आधीच आजोबांच्या आठवणीत आहे व एका आजोबांना व नातवाला जवळून पाहतो आहे..

आता हा सिनेमा पडद्यावर यशस्वी होणार का ???वगैरे व्यावहारिक गणित करायला बरेच बाबा लोक असतील ...आहेतही... त्यामुळे त्यात मला सध्या नातू म्हणून पडायचे नाही..

पण सगळ्या आजोबा - नातवांचा स्पेशल शो असेल तर 3 ऑगस्ट ला आमच्या घरट्याच्या जोडगोळीला या विमानाचा प्रवास घडवावा हे मात्र नक्कीच माझ्या मनात आहे ते सुद्धा तिकीट काढून...
 कारण काही तरी अव्यवहारीक जवळीक अनुभवायची असेल तर इतकं व्यावहारिक जरूर असावं असं माझ्या आजोबांनी मला नक्कीच शिकवलं आहे...

जयदीप भोगले
30 जुलै 2018

Friday, July 27, 2018

गुरू


चक्रव्यूह भेदण्यासाठी
लढवय्या होण्यासाठी
सिकंदर म्हणून जिंकण्यासाठी
कधी पोरस म्हणून हरण्यासाठी
एक गुरूच हवा
पायावर उभारण्यासाठी
जमीनीवरच  राहण्यासाठी
विशाल समुद्रात पोहण्यासाठी
गगनभरारी घेण्यासाठी
एक गुरुच हवा

अर्जुनाच्या कर्तव्यासाठी
एकलव्यासम त्यागासाठी
विवेकानंदाच्या विरक्तीसाठी
आणि नतमस्तक होण्यासाठी
एक गुरुच हवा
जयदीप भोगले
27 जुलै 2018
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
व माझ्या सर्व गुरुंना सादर  प्रणाम🙏🙏🙏

Friday, July 6, 2018

कोडे


अवघड कोडी सोपी होतात अन सोप्या गोष्टी अवघड
दृष्टिकोनाचा गुण कधी कधी दोष डोळ्यावरची झापड
धुरंधर म्हणता म्हणता होई नोकियाचीही पडझड 
नवशिका म्हणता म्हणता हळूच गुगल होई वरचढ
उघडे डोळे उघडे कान हाच मंत्र तू वापर
झाडे नेहमी तोडली जाती .गवताचे बनते छप्पर
जयदीप भोगले


6 जुलै 2018

Saturday, June 9, 2018

अपेक्षा



वेळेवर येण्याची
 वेळेवर जाण्याची
 पापणी लवण्याची
 डोळे मिटण्याची
अपेक्षाच ती

धडधडत्या हृदयाची
धडपडत्या श्रमाची
हातातल्या फुलाची
वाट पाहत्या मुलाची
अपेक्षाच ती

अडीच अक्षराची
न पाहिलेल्या ईश्वराची
सभेतल्या टाळ्यांची
स्थितप्रज्ञ डोळ्यांची
अपेक्षाच ती

भाकरीच्या तुकड्याची
शाळेच्या बाकड्याची
खाटकाच्या च्या बोकडाची
सरणावरच्या लाकडाची
अपेक्षाच ती

  पूर्ण होण्याची
 पूर्ण करण्याची
आश्वस्त होण्याची
 आश्वासन देण्याची
अपेक्षाच ती....

जयदीप भोगले
9 जून 2018

Wednesday, March 7, 2018

माध्यमे आणी बोली भाषांचे वाढते महत्त्व


पूर्वी साहित्य म्हटले की प्रमाण भाषा, शुद्ध भाषा किंवा पुणेरी भाषा असेच गृहीत धरले जायचे
मग त्या साहित्यात फक्त कविता ,कथा कादंबरी नाही तर टेलिव्हिजन युगात कार्यक्रम आणी
सिरिअल सुद्धा बनवल्या जायच्या.
ज्याप्रमाणे पुस्तकांमध्ये नवसाहित्य, मुक्तछंदात्मक कविता ,सामाजिक लेखन, दलित साहित्य
अशी हाताळणी विविध लेखकांनी केली ती तितक्या सहजपणे टीव्ही नवीन आल्यावर सहज
येऊ शकली नाही.
टीव्ही हे कदाचित नवीन माध्यम असल्यामुळे त्यात येणारे कलाकार त्यांना अप्रोच होणारे
निर्माते कलाकार हे सगळे पुण्या मुंबईचे असायचे . टीव्हीवर दूरदर्शन ही एकच वाहिनी
असल्यामुळे साहजिकच त्याचा सर्वप्रथम प्रसार व उपलब्धता ही याच शहरांमध्ये झाली
व या लोकांपर्यंत पोहीचतील असेच कार्यक्रम निर्मात्यांनी बनवले .
हे कार्यक्रम गुणवत्तेनुसार नक्कीच उत्तम होते यात काही शंका नाही पण सर्वसामान्य जनतेच्या
बाजू मांडणारे त्यांच्या घरचे वाटणारे कार्यक्रम कमीच किंवा विरळ असायचे.
आता मी लहानपणी “चाळचाळ नावाची वाचाळ वस्ती “हा कार्यक्रम आवडीने बघयचो पण
आमच्या गावातले जीवन व या शहरी जीवनात खूप फरक असायचा . मला त्यावेळी नक्कीच
चॉईस नसल्यामुळे मी सर्व पाहत होतो पण त्याकाळात बाकी बोली भाषेत नवीन कार्यक्रम
लोकप्रिय होऊ शकतील असे बऱ्याच जणांना कदाचित वाटलेच नाही
मराठी सिनेमा मध्ये सुद्धा ग्रामीण म्हणजे फक्त कोल्हापूर पुरते मर्यादित होते पण महाराष्ट्रात
28 जिल्हे आणि किमान 6 ते 7 अगदी भिन्न म्हणता येतील अशा बोलीभाषा असून सुद्धा
त्याबद्दल त्याचा विचार कधी झाला नाही
पण गेल्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये प्रसार माध्यमे व चित्रपट यामध्ये बोली भाषा व त्यांचे सौन्दर्य
त्यातील खास विनोद ,त्या भागातील व्यक्तिविशेष या सर्व गोष्टींचा जास्त सखोल विचार होऊ
लागला आहे
नोकरी व शिक्षणानिमित्त लोकांचे होणारे स्थलांतरण , टीव्ही ची सहज उपलब्धता, जुन्या
साहित्यामधील नावीन्य चा अभाव व कालाबाह्यता , आणी इतर महाराष्ट्रातून येणारे कलाकार
व त्यांना जनतेने दिलेली पसंती या सर्व पूरक कारणामुळे अशा पद्धतीने नवीन प्रयोग यशस्वी
होऊ शकतात याचा निर्माते व चॅनेल चे कार्यकारी निर्माते व चित्रपट निर्माते यांना वाटते आहे
हा बदल महाराष्ट्रापुरता नसून संपूर्ण भारतभर याचा प्रभाव होतो आहे असं मला गेल्या दहा
वर्षांपासून नक्कीच जाणवत आहे

मी 2005 ला पाहिलेला खोसला का घोसला ने दिल्ली मधल्या खास भाषा शैलीला सुरेखपणे
हाताळले होते. मी दिल्लीत शिक्षणानिमित्त असल्यामुळे अशी भाषा मी जवळून अनुभवलेली
त्यामुळे त्याचे खास कौतुक व authenticity नक्कीच मला जाणवली .
मग ओंकारा, बंटी आणि बबली , बँड बाजा ते अगदी अलीकडच्या दंगल पर्यंत प्रत्येक भाषा
आणि तिथल्या व्यक्ती आणी वल्ली आपण पाहत आहोत पसंत करत आहोत.
धाकड म्हणजे काय हे शब्दशः समजले नाही तरीही सिनेमामध्ये असलेल्या वातावरणात
आपल्याला उमजून जाते आणि याला प्रमाण भाषेतला पर्यायी शब्द कोणता हे आपण विचारत
नाही
हाच धागा ना आना इस देस लाडो , अफसर बीटीया, बालिका वधू ते थेट तारक मेहता या हिंदी
मालिकांमध्ये सुदधा हाताळलेला आपल्याला दिसला असेल
मराठी मालिका हा माझा स्वतः चा जिव्हाळ्याचा विषय ...यात सुद्धा असे कित्येक प्रयोग
यशस्वी पद्धत्तीने झी मराठी ने सुद्धा केलेले आहेत
अवंतिका पासून ते रात्रीस खेळ चाले व तुझ्यात जीव रंगला पर्यंत तिने केलेला प्रवास हा
बोलीभाषेने माध्यमात केलेला प्रवास दाखवतो
सैराट हा इतका ग्रामीण भाषेचा सिनेमा असून सुद्धा 100 करोड चा टप्पा गाठू शकतो याचे श्रेय
निर्माते यांनां तर द्यावेच लागेल पण बोली भाषा प्रमाण भाषेतकीच लोकांना आवडते याचा एक
हा मैलाचा दगडच आहे की काय असे म्हणावे लागेल.
अमेरिकन संस्कृती आणि ब्रिटिश संस्कृती मध्ये सुद्धा स्कॉटिश व कृष्णवर्णीय बोलीभाषा
तितक्याच सशाक्तपणे प्रमाण भाषेबरोबर जाऊन बसलेल्या आपल्याला दिसतात
म्हणूनच की काय आजकाल तरुण पिढीला want पेक्षा waana जास्त जवळचे वाटते हे बोली
भाषेचे जिव्हाळ्याचे नातेच म्हणावे लागेल
पण मराठी मध्ये खूप मस्त आणि उत्कृष्ट हे शब्द लै भारी ने कधी रिप्लेस होतील का हे मात्र
कदाचित येणारी वर्षे ठरवू शकतील.
मकरंद अनासपुरे , भारत गणेश पुरे, संकर्षण कराडे, भाऊ कदम ही सर्व वेगवेगळ्या बोली
भाषा बोलणारी पण तितकीच लोकप्रिय मंडळी बोली भाषांचा झेंडा फडकवत ठेवताना
दिसतात. यांच्या अभिनयाबरोबर आपण बोली भाषेचे सुद्धा कौतूक करायला हवे.
धातू ज्याप्रमाणे कमी जास्त प्रमाणात कार्बन घातल्यास पोलाद ते अगदी बीड बनतो पण दोघे
तितकेच उपयोगी व सुंदर असतात .अगदी तसेच शुद्ध अशुद्ध भेद न ठेवता प्रत्येक भाषा हा
वेगळ्या धातूच्या रुपाप्रमाणे मानला तर नक्कीच त्याचे सौंदर्य जास्त उत्तम पद्धतिने कळू
शकेल.

लेखनामध्ये काही मर्यादा येण्यामुळे बऱ्याचदा वर्तमानपत्रे अजूनसुद्धा बोली भाषेचा वापर
लेखामध्ये करत नाहीत पण व्हिडीओ माध्यमे ही जास्त प्रभावी असल्यामुळे ती ही जबाबदारी
उत्तम पद्धतीने पार पाडत आहेत
येत्या काळात आपण एखादी सामाजिक चर्चा न्यूज वाहिनीवर सुद्धा मराठवाडी भाषेत पाहू
शकलो तर मला त्यात काही गैर वाटणार नाही
भाषा ही माणसाच्या मनातले लोकांना समजण्यासाठीच असते आणि ती वेगळ्या बोली
भाषांतील शब्दसिद्धीमुळे जास्त समृद्ध होऊ शकते
ज्याप्रमाणे दोन राग मिश्र राग बनवू शकतात तसेच दोन बोली भाषा या नक्कीच नविन मिश्र
भाषा तयार करू शकतात मग त्याला आपण जसे अनवट रागानां स्थान देतो तसे त्या भाषेला
सुद्धा दिले तर काय हरकत आहे
अगदी पनीर टिक्का पिझ्झा असं काहीतरी बनू शकते आणि तो किती छान लागतो हे मी
तुम्हाला नक्कीच सांगायला नको
-- 
जयदीप भोगलेटीप हा लेख  मराठी कल्चरस अँड फेस्टिव्हल या इ दिवाळी अंकात छापून आला होता

Monday, September 25, 2017

गणेशवंदन

गणांचा तू नायक 
जगाचा तू पालक
मूषकी विराजी 
वरदविनायक
बुद्धी चा तू देवता
कलेचा तू चाहता
सिंदूर् लेपसी
गिरीजात्मज





कृपेचा तू सागर
ज्ञानाचे तू आगर
भक्तांची चिंता हरसी
चिंतामणी गजानन

दहा दिवस येसी
पृथ्वीवासी होशी
भक्तास तू पावसी
होऊन गणेश

गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया

काही करतो का आपण स्वातंत्र्य मिळवून

झेंड्यांची पेड दिवाळी करून

देशभक्तीची गाणी  डॉल्बीवरून

येत सगळ्यांचे मन एकच दिवस उचंबळून

काही करतो का आपण स्वातंत्र्य मिळवून??

अच्छे दिन येतील म्हणून

मल्या च्या पलायन वर कानाडोळा करून

नव्या निवडणुकीला पुन्हा सामोरे जाऊन

काही करतो का आपण स्वातंत्र्य मिळवून??

गुन्हेगारी  साठी धृतराष्ट्र बनून

आरक्षणांचा अश्र्वमेध खुला सोडून

एका नवीन गुलामगिरी चा रस्ता शोधून


काही करतो का आपण स्वातंत्र्य मिळवून??



जयदीप भोगले
१५ ऑगस्ट २०१७




















शेअरचा शिरा





शेअरची कढई आणि लाभाचा रवा

भाजायचा कसा तो कळायला हवा


स्टॉप लॉस चा वास दुरूनच घ्यावा
आणि पोजिशन चा पाक थोडा एकतारी करावा

रवा आणि मैदा जसा एकत्र करायचा नसतो




पन्नास शेअरचा पोर्टफोलिओ एकत्र बनवायचा नसतो

शेअरच्या शिऱ्याची रेसिपी नुसती वाचून जमत नसते

लाभाची चव स्वतः परतल्याशिवाय मिळत नसते







जयदीप भोगले
१२ ऑगस्ट २०१७


Tuesday, July 25, 2017

हमनवाज



फायदे और वायदे के मुद्दे मे ना उलझ ए दोस्त
इरादे और वजूद कभी डगमगाया भी करते है
शिशे और शराब का नही है कुछ वासता मगर
राहगिर सफर मे कुछ वक्त साथ निभाया करते है
हमनवाज

कूछ इस तरह तुम न देखो हमें
ख्वाब हकीकत कि दहलीज पे ठहरा नहि करते
किताबे तो कहानी बया कर देगी मगर
रिश्ते अल्फाजो के तरकीब से बना नही करते

जमाने कि और हमारी दुष्मनी पुरानी ही सही
दुनिया  मे दोस्ती का इल्म कभी दिया  नहि करते
दिल के शागिर्द हम बन गये जरूर
युं उस्तादी मे मगर खंजर चलाया नहि करते

हमसफर हमनवाज इन सब मे हम कहा
खानाबदोश कभी  घर बसाया नहि  करते
कलम और स्याही से बन जाये तू गजल हि  सही
संग और खिश्क के बगैर मुरत बनाया नही करते

जयदीप भोगले
२५ जुलै २०१७








.

Monday, July 24, 2017

स्वप्नाली


स्वप्नाली


 बेधुंद अशा सांजवेळी  ..तुझे पत्र उशाखाली

 शब्द तुझा स्पर्श जणू.. भास असे तो मखमाली

 स्वप्न असे का सत्य न कळे ..श्वास उरी वरखाली

 वाऱ्याची झुळूक सांगे मज ..का बनशी तू स्वप्नाली?

 सुगंध असे कस्तुरीसम ..पाश तुझा भवताली

 चांदणे ही मज दाह देई ..भेट तुझी ती रानजाई

 देह माझा एकटाच तो झुरे... सख्या तुझ्यापाई


सख्या तुझ्यापाई


 जयदीप भोगले
24 जुलै 2017
 खंडाळा

एव्हरेस्ट

 ज्याचे त्याचे एव्हरेस्ट एव्हरेस्ट अस शिखर एकच नसतं प्रत्येक माणसाचं एव्हरेस्ट वेगळं असतं उंची कमी जास्त असेल समाजात शिखराची पण सर केल्यावरच...