Sunday, May 9, 2021

हॅप्पी मदर्स डे

 365 दिवसांपैकी मी एक दिवस तिला आराम दिला

हॅपी मदर्स डे म्हणून मी आईला सलाम दिला

माझ्या आईला आणि माझ्या मुलाच्या आईला सुदधा 

होम मिनिस्टर असणाऱ्या या दोन राण्यांना एक दिवसाचा लुटीपूटीचा  गुलाम दिला

सकाळपासून केली कामाची यादी

म्हटलं आज दोनो मेमसाब को सब से आझादी

पण कामाची यादी कशी वाढतच जाते

जितकी करावी कामे पुन्हा कशी ही नव्याने येते

12 वाजेपर्यंत झाली माझी दमछाक

रोज या  कश्या करतात सगळं एका दमात??

रोज आपला टीकाकार कसा एकदम जागा असतो

मीठ जरी कमी असेल तर आईच्या पाककौशल्याचा उद्धार होतो

एक दिवस काही आईसाठी पुरेसा नाही

#share the load हेच सत्य त्याशिवाय पर्याय नाही

तरीही विशेष दिवस म्हणून मी केली कविता खास

आणि माझी आई आणि माझ्या मुलाची दोघीही म्हणाल्या शाब्बास !!


जयदीप भोगले!!

9 मे 2021

Wednesday, April 14, 2021

महामानव

 महामानव


घटनेचा अविष्कार

मनुचा बहिष्कार

मानवतेचा पुरस्कार

वर्णव्यवस्थेचा तिरस्कार


 शिक्षणाचा सुविचार

 अर्थशास्त्राचा साक्षात्कार

  आधुनिक बिंबिसार

महामानवाला  नमस्कार


14 एप्रिल 2019

जयदीप भोगले



Monday, March 8, 2021

महिलादिनी ..पाहिले ना मी तुला...

 "होम मिनिस्टर 'बनून घरची घेते जबाबदारी

"घेतला वसा टाकू नको "म्हणते ती प्रत्येक वारी

सदैव राबतानाच .." पाहिले ना मी तुला"

आणि तरीही .."कारभारी लै भारी "म्हणतेस तू मला

"येऊ कशी तशी मी नांदायला" म्हणून भांबावलीस सुरवातीला...

"अगं बाई सासू बाई "म्हणता म्हणता आपलंसं केलंस कुटुंबाला

फक्त असते अपेक्षा तुझी" माझा होशील ना" राहशील ना??

"लाडाची मी लेक "होते  माहेरची मान तरी तू देशील ना ??

महिला दिन वार्षिक नव्हे तर प्रत्येक दिवस तिचा असावा

उत्सव नात्यांचा तेव्हाच होईल हाच विचार मनी ठसावा


जयदीप भोगले

8 मार्च 2021

Wish you a very happy woman's day

Wednesday, August 12, 2020

विषाची परीक्षा

 जगाला आता मला घाबरायचे नाही

 तुझ्याशिवाय आता मला राहायचे नाही

चूक काय आणि बरोबर काय

याचा हिशोब मला लावायचा नाही

प्रेम म्हणू का सवय आहे ही

हाच प्रश्न पडतो सखे तुलाही

स्वर्ग जरी मिळाला मला जरी 

एकट्याने तिथे मला जायचे नाही

एवढ्यात तिने तिचा मुखवटा काढला

अचंबित तिचा चेहरा त्याने तो पाहीला

वाहवत गेले होते मी थोड्या वेळासाठी

जोड्या नेहमी असतात साता जन्माच्या गाठी

माझे नाते पहिले असे तुटणार नाही

तोडून सगळे बंध मी येणार नाही

आता त्याच्या आयुष्यात एक वादळ आले

नांगर तुटलेले जहाज भरकटत निघाले

रुसले खरे प्रेम खोट्या आभासासाठी

हातचे सुख सोडले गेला पळत्याच्यापाठी

पुढची गोष्ट मला सांगायची नाही

आणि म्हणुनच ... विषाची परीक्षा कुणी पहायची नाही


जयदीप भोगले

11 ऑगस्ट 2020

Sunday, August 2, 2020

मित्रपक्ष

मित्रच रहा मित्रपक्ष बनू नका
संधी नेहमीच असते संधीसाधू  होऊ नका
अडीच अक्षरी बोल हक्कापेक्षा वरचे असतात
झालाच तर  दुर्योधनाचा कर्ण बना जुलिअस चे brutas होऊ नका
मैत्री या विषयावर लिहलय पुष्कळ अनभुव घ्यायला कचरू नका
दिवस तर पितरांचे सुद्धा असतात कायमच्या साथी ला हरवू नका

मैत्रिदिनाच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा

आपला नेहमीचा मित्रच

जयदीप भोगले
2 ऑगस्ट 2020

Saturday, August 1, 2020

पुण्यतिथी



आजकाल शेंगा कुणी दुसरेच खातात 
आणि टरफले उचलण्याची स्पर्धा लागते
स्वेच्छेने गुलामी करणारी आनंदीत जनता 
जन्मसिद्द हक्क विसरून जाते
आमचे "केसरी"आणि #मराठा
 वैचारिक विनोद होऊन बसले आहेत
गीतारहस्य वगैरे सर्व काही बहुतेक 
मंडाले च्या तुरुंगातच  डांबले आहेत.
बाप्पा किती फुटी करायचा ??
एवढंच काय उत्सवात महत्वाचे आहे
चळवळीत भेसळ कमी जास्त
 पण जागृती मागेच पडत आहे
आजही तुमचे निर्भय डोळे 
पुतळ्यातून दिलगीर वाटतात
माणसाचे डोके ठिकाणावर आहे काय ?
याचे उत्तर शोधत राहतात

अभिवादन तुमच्या शिकवणीला 

जयदीप भोगले
1 ऑगस्ट 2020

Sunday, July 5, 2020

मला उमजललेले गुरू"



गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या भारतात गुरुबद्दल कृतज्ञ होण्याचा दिवस..

आपण जे काही आहोत ते आपल्याला कुणी तरी केलेल्या संस्कारामुळे ,कधी जाणतेपणाने असतील किंवा कधी नकळत होणाऱ्या अनुभवाने सुदधा असतील ,त्याची एक आठवण ठेवून त्याबद्दल आभार मानायचा दिवस.

' आजकालच्या secret  असू देत किंवा  बुद्ध धर्माची ' lotus sutra' असू देत " Gratitude" या संकल्पने ला सर्वात जास्त महत्व दिले आहे .या धर्तीवरच की काय आपल्या संस्कृती मध्ये  सुदधा व्यासपूजन व गुरुपूजन, त्याबद्दल असणारी  कृतज्ञता व्यक्त  करावी म्हणून हा दिवस राखून ठेवला आहे.

गुरू म्हणजे शिक्षक जो आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातो मग ते पहिले पाऊल टाकायला शिकवणारी आई असेल की, पहिल्यांदाच रस्ता ओलांडायला शिकवणारे बाबा असतील . पहिली बाराखडी शिकवणाऱ्या आपले गुरुवर्य की अगदी आपल्या सध्याच्या व्यावसायिक  जीवनात आपले न भावणारे वरिष्ठ असो यांचे अपल्यावर कळत नकळत संस्कार होत असतात त्यातून आपण घडत असतो.
गुरू  आपल्या संपर्कात येणारा मूर्त माणूस सुदधा असतो किंवाआपली कर्मभूमी, आपल्या अवतीभवती असणारा समाज, अगदी निसर्ग हा सुदधा आपल्या वर गुरुप्रमाणे संस्कार  करतच असतो व तो सुदधा कधी आपल्या गुरूस्थानी जातो हे कळत नाही त्यांना सुदधा धन्यवाद देण्याचा दिवस.

 ज्योतिष शास्त्रात सुदधा गुरू ला फार वरचे स्थान दिले आहे आणि असे म्हणतात गुरू ज्या स्थानावर दृष्टी टाकतो ती शुभच असते  आणि म्हणूनच गुरु ही व्यक्ती असो की अमूर्त शिकवण, ती वयक्तिक रित्या कशीही असो ती जेव्हा गुरुस्थानी येते ती कायम आपल्याला नवीन काहितरी देऊन जाते . मग कधी काय करावे असेल तर कधी काय करू नये सुदधा..

गुरू शिष्य नात्यात बऱ्याच वेळा किंवा नेहमीच म्हणा शिष्याला जास्त प्रकाशझोत मिळतो मराठीमध्ये "Limelight"... आणि मग लोकांची गाडी वळते अरे याचा गुरू कोण ?? मग काही जण त्याला अमूर्त स्वरूप देतात व काही द्रोणाचार्य रूपी मूर्त व्यक्ती कडे नतमस्तक होतात.  सर्व ठिकाणी त्याच्या प्रत्येक वळणावर त्याला असंख्य गुरू भेटतात  व या सर्व गुरूस्थानी असणाऱ्या लोकांना स्मरण्याचा हा दिवस.

 त्यामुळे आपल्या धकाधकीच्या आयुष्यात जर आपल्याला प्रश्न पडला असेल माझा गुरू कोण ?? आजकाल गुरू शिष्य परंपरा नाहीच उरली .. गुरू असं काही म्हणावं असं काही कुणी मला समोर येत नाही... त्या सर्व जणांना आपला लहानपणापासून ते आत्तापर्यंत  डोळे बंद करून तुमच्यात बदल घडवणारे आईवडील असो की अगदी  कायम वेळेवर धावून आपल्याला वक्तशीरपणा शिकवणारी मुंबई लोकल असेल ही सुद्धा गुरुस्थानी मानून कृतज्ञ व्हायला हरकत नाही .
आणि ज्यांना आपले प्रमुख गुरू वंदनीय असतील त्यांना वंदन करून काही गुरुवर्य जे तुमच्या आठवणीत मागे पडले असतील त्यांना त्रिवार वंदन करून कृतज्ञ व्हायला हवे

कारण एक कृतज्ञ  शिष्यच आपल्या गुरुला सर्वोत्तम बनवतो .


जयदीप भोगले
5 जुलै 2020

हॅप्पी मदर्स डे

 365 दिवसांपैकी मी एक दिवस तिला आराम दिला हॅपी मदर्स डे म्हणून मी आईला सलाम दिला माझ्या आईला आणि माझ्या मुलाच्या आईला सुदधा  होम मिनिस्टर अस...