Sunday, November 18, 2018

प्रोजेक्ट जैतापूर

 ...

"खेड्याकडे चला" असं वाक्य कृत्तिका च्या कानावर पडलं.. कॉलेज ची वक्तृत्व स्पर्धा आणि तिच्या काळ्याभोर डोळ्यासमोर चौकडा हाफ शर्ट घालून आवेशाने बोलणार अनिकेत होता . बोलके डोळे , खांद्यावर रुळणारे मोकळे केस , भुवयांच्या मधोमध शांती लावते तशी बाण असलेली टिकली आणि खळखळून हसणारे क्लोजप स्माईल असणारी कृत्तिका, हिची स्वप्न तिच्या डोळ्यात असणाऱ्या अनिकेतपेक्षा नक्कीच निराळी होती.
दोघे जेव्हा एकत्र झी मराठी पहायचे त्यावेळी "चमकत रहा" ची जाहिरात पाहून रंगत जाणारी स्वप्न तिची व अनिकेतच्या हातात प्रकाशवाटा व डोळ्यात वाढत जाणारा निर्धार दिसायचा.
ती नेहमी म्हणायची 12 वी नंतर मला मुंबईत जायच आहे,  MBA  करायचं आहे मोठ्या कंपनीमध्ये नोकरी, सगळं मोठं हवं .आपण खेड्यात आहोत म्हणून काय झालं? शहरात हुशार आणि मेहनती लोकांची कदर असते, पैसा मिळतो आणि.. हो खेड्यात असणाऱ्या नजरा सुद्धा नसतात बरका ??
आणि अनिकेत एक स्मित द्यायचा आणि म्हणायचा शहर म्हणजे त्या फुगणाऱ्या बेडकी सारखं झालय कधी फुटेल नेम नाही.. खेड्यात जर विकासाला चालना मिळाली तर एक वेगळ्या महाराष्टची निर्मिती होऊ शकेल . आपण चांगल्या समाजात जाण्यापेक्षा आपण जाताना लोकांना एक नवीन समाज देऊन जावा असं मला वाटतं. गांधीजीपासून ते प्रकाश आमटे यांनी लोकांनी मोठं म्हणावं म्हणून काम कधीच केले नाही .तेवढ्यात अनिकेतच्या आईच्या चहाने त्यांच्या भिन्न विचारांना समान पातळीवर आणले  मग दोघे हसले . कृतिका म्हणाली अहो समाजसुधारक साहेब तुमचे विचार चांगले आहेत पण बाजूला ठेवावे लागतील 12 वीच्या परिक्षेचे वेळापत्रक आले आहे . आणि म्हणाली चल मी निघते.. बाबा आले असतील .
कृत्तिकाचे बाबा स्टेट बँकेत बदलीवर जैतापूर ला आलेले आणि अनिकेत चे बाबा 8 एकर कोरडवाहू जमिनीचे भूमिपुत्र .एकिकडे पहिल्या तारखेची वाट  बघणारे बँक अकाउंट आणि एकीकडे पावसाची वाट पाहणारे बळीराजाचे डोळे अशी अवस्था असताना या दोघांचे मैत्रीचे सूर कसे जुळले याचं सगळ्या जैतापुर ला आश्चर्य होतं. पण फ्युजनच हे एकदम मराठमोळे उदाहरण होतें.हळूहळू अभ्यासाच्या रात्री वाढू लागल्या, हसण्याचा आवाज बदलून डिस्कशनचा झाला दिवस सरले  परीक्षा संपली दोघे 12 चा शेवटचा पेपर देऊन बाहेर आले .अनिकेत म्हणाला चला चहा घेऊ या, ती म्हणाली नको.. मी घरी जाते .  त्यावर तो म्हणाला चल मी सुद्धा येतो बरेच दिवस झाले सिनेमा सुद्धा पाहिला नाही . टीव्ही लावला तर, झी मराठीवर प्रकाश बाबा आमटे आणि झी टॉकीजवर टाईमपास .इथं सुद्धा कृत्तिकाची परीक्षा टीव्ही वहिनी सुद्धा घेतेय असं चित्र होतं.तेवढ्यात कृत्तिकाचे बाबा बँकेतून आले आणि म्हणाले काय अनिकेत कशी गेली परीक्षा? तुमच्या परीक्षेच्या निकलाआधी आमची परीक्षा आम्ही पास झालो असं दिसतंय.  म्हणजे काका? मी समजलो नाही. अरे बँकेने माझी बदली मुंबईला केली आहे पुढच्या आठवड्यात जॉईन व्हायचंय . मग अनिकेतला कृत्तिका गप्प का याचं कारण लक्षात लागलं.मग 12 वी नंतर काय? ये मुंबई ला.. तिथे चांगली वसतीगृह सुद्धा असतात.you have  good future. नाही काका जैतापूर  च्या शेतकी कॉलेजचा राज्यात वरचा क्रमांक लागतो मी इथेच शिकायचं ठरवलं आहे अनिकेत उत्तरला. माझ्या भविष्यापेक्षा माझ्या गावचं, राज्याचं भविष्य मला जास्त महत्वाचं आहे.बाहेर जाताना तो कृत्तिका ला म्हणाला मी शेतकऱ्याचा मुलगा आहे,आभाळाचा रंगावरून पावसाचा अंदाज बांधणारा तू जा. तुला तुझी स्वप्न आहेत ती पूर्ण मुंबईतच होतील. टाईमपास पाहत होतीस ना टक लावून ?.अंग मला कळतं तुझ्या मनातलं.. पण टाईमपास एक कथा आहे आणि प्रकाश बाबा आमटे ही सत्यकथा.अव्यक्त असून दोघांना उमजणाऱ्या प्रेमाला स्वप्न आणि ध्येय याच्या क्रॉसिंगवर  थांबावे लागले.नेमका त्याच दिवशी आलेल्या वळवाच्या पावसाने दोघांच्या अश्रूंना लपवून टाकले. दिवस पालटले अनिकेत व कृत्तिका दोघे विशेष प्रविण्याने उत्तीर्ण झाले . त्याने शेतकी कॉलेज व तिने बेडेकर कॉलेज ला प्रवेश घेतला .मधल्या काळातल्या कोरड्या दुष्काळात हळूहळू दोघांचे जग वेगळे बनले. वक्तृत्व स्पर्धेची जागा आंदोलनाच्या भाषणाने घेतली . जलयुक्त शिवार, शेततळी, कोरडवाहू शेती प्रयोग असे वेगळे विचार जैतापूर ला वाहू लागले. अनिकेत चा 5 वर्षात अनिकेत दादा रूपांतर झाले.  मुंबईत  सुद्धा कृत्तिका एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये रूजु झाली.एकाची जमिनीवर राहण्याची व एकीची गगनभरारी घेण्याची धडपड सुरू झाली.कृत्तिका खरंच चमकत रहा च्या जाहिरातीप्रमाणे तिच्या कंपनीमध्ये चमकत होती.रात्री उशिरा काम करून परत येताना आलिशान कार मध्ये कृत्तिका ला अधूनमधून जैतापूर च्या आठवणी यायच्या . "खेड्याकडे चला" हा आवाज घुमायचा पण नंतर पुन्हा “डेडलाईन” हा राक्षस  सगळ्या आठवणींना  मागे टाकायला भाग पाडायचा.
हळूहळू राजकारण हे ऑफिस आणि जैतापूर या दोन्हीकडे शिरकाव करत होते .एकीकडे समाजकारण आणि एकीकडे अर्थकारण या जगात योग्य राजकारण किती महत्वाचे आहे हे एका ध्येयवेड्या व एका स्वप्नवेडीला समजावत होते. खेड्याला योग्य न्याय हवा असेल तर योग्य  व्यासपीठ शहरात आहे, मंत्रालयात आहे हे विचार प्रोजेक्ट जैतापूर- चळवळ चालवणाऱ्या अनिकेतच्या मनात घर करत होते. राजकीय वर्तुळात सुद्धा शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून त्यांची ओळख वाढत होती .कृत्तिका तिच्या कंपनी मध्ये शेतमालाच्या भावांमध्ये होणाऱ्या अवमूल्यनामुळे उद्विग्न होत होती . सोनं पिकवणाऱ्या बळीराजाला खरा भाव न देता organic म्हणून माल दुप्पट नफ्याने विकणाऱ्या लोकांची तिला चीड येत होती .
या दरम्यान अनिकेतचे आमदार म्हणून निवडून येणे , वेगवेगळ्या वाहिन्यांवर त्याच्या प्रोजेक्ट चे होणारे कौतुक कृत्तिका च्या नजरेसही पडले होते. या गोष्टीचे कौतुक व आश्चर्य दोन्ही तिला होतेच पण काळाबरोबर त्यांचे मार्ग बदलले होते कदाचित फोन नंबर सुदधा...
 १२ वी मधला अनिकेत तिला नेहमी आठवायचा शेतकऱ्याबद्दल तळमळ आठवायची व सगळ्याचा उद्रेक होऊन तिने एक दिवस धाडस करून कोर्पोरेट दुनियेला रामराम ठोकला व तिने शेतकऱ्यांच्या मालाला नीट भाव मिळावा यासाठी NGO स्थापन केली व तिचा सुद्धा पहिला प्रोजेक्ट होता.. प्रोजेक्ट जैतापूर .
त्याच दिवशी मुख्यमंत्रि महोदयांनी मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा केली आणि  अनिकेत ने कृषिमंत्री पदाची शपथ घेतली .वर्तमानपत्रात मथळा होता प्रोजेक्ट “जैतापूर चळवळीचे प्रणेते अनिकेत पाटील यांची कृषिमंत्री म्हणून नियुक्ती”
.दोघांची स्वप्न व ध्येय प्रोजेक्ट जैतापूर या समान नावाने का होईना पुन्हा नव्याने कदाचित एका वाटेवर  आली होती.

जय
१८ ऑगस्ट २०१८

Friday, November 9, 2018

आणि .... सुबोध भावे


चित्रपट:    आणि... काशिनाथ घाणेकर

कलाकार ...सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी आणि बरेच मातब्बर कलाकार


दिग्दर्शक : अभिजीत देशपांडे


पाहावा की नाही: 'तुला पाहते रे पाहता का ?? ' मग उत्तर मिळेल..

नावात काय आहे असं बरेच जण सांगतात अनुभवतात पण जेव्हा एखादा बायोपिक तयार होतो त्याच्या नावातच सगळं असतं कुतुहुल, कथा, आठवणी ,परीक्षा आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्यासाठी दिग्दर्शक ते प्रेक्षक "याजसाठी केला अट्टहास" म्हणत असतात.

बहुचर्चित व दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित झालेला हा चित्रपट,  बऱ्याच जणांच्या लाडक्या असणाऱ्या डॉ काशिनाथ घाणेकर यांची कथा सध्या महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या मध्यमवयीन देखणा  आणि घाऱ्या डोळ्याचा नट सुबोध भावे साकारतो आहे म्हणजे कुतूहल व परीक्षा या दोन्ही गोष्टी  शिगेला असणारच..

यात काशीनाथ घाणेकर यांचा डॉक्टर ते ऍक्टर असा प्रवास.
सिगरेट च्या धुरासारखं उडत जाणारं वलयांकित  आयुष्य.
दारूच्या घोटसारखी  अर्थशात्रच्या इंजिल लॉ ऑफ consumption ला खोटे ठरवणारी अफाट प्रसिद्धी...
व उंच अशा धबधब्याजोगी प्रसिद्धी ते नाराजी असणारी त्यांच्या जगण्याची बेफीक्री या सगळ्याचा मिलाफ म्हणजे आणि डॉ काशीनाथ घाणेकर...

बालगंधर्व ,लोकमान्य आणि काशिनाथ या तीन भूमिका तितक्याच वेगळ्या पद्धतीने साकारणारे सोने म्हणजे सुबोध भावे . बालगंधर्व सम गळ्यातला लक्ष्मी हार असू दे की सोनेरी मानपत्र असलेलं लोकमान्यांचं आयुष्य... आणि हेवा वाटणारं व कधीही हरवेल अस मनगटात असणाऱ्या डॉ काशिनाथ घाणेकर यांचं ब्रेसलेट ...या सगळ्याची घडण सुबोध भावे यांच्या बावनकशी सोन्यातूनच घडलीय आणि एकदम शोभलीय सुद्धा..

स्क्रीनभर पुरून उरणारा सुबोध भावे , दिवाळीच्या फराळाच्या थाळीत असणारा प्रत्येक पदार्थ जसा आवश्यक असतोच आणि एकदम जमून जातो असे सर्व कलाकार व त्यांचे अभिनय  यामुळं सिनेमा मराठी रसिकांना पसंतीस पडेल हे नक्की..

सिनेममधली गाणी थोडासा रटाळ वाटणारा शेवट व फक्त अश्रू आणि संभाजी यावर सुपरस्टार होणारं डॉक्टरांच आयुष्य या गोष्टी खटकणा-या वाटतील सुदधा पण परिपूर्णता म्हणजे पूर्ण विराम .. त्यामुळे कलाकृती उद्गारवाचक , प्रश्नार्थक असणं जास्त चांगलं असं मला नेहमी वाटतं...उसमे क्या है !!!!

डॉ साहेबांनी रंगभूमीला पुष्कळ काही दिलं पण त्यांच्या धुरकट व प्यालाच्या  चष्म्यातून पाहिलेल्या आयुष्यामुळे आम्ही तरुण एका मोठ्या नटाला रंगभूमीवर पाहायला मुकलो याची खंत नक्कीच वाटते.

चित्रपटात एक स्वगत आहे की टाळी ही कलाकाराला सरस्वतीने दिलेला शाप आहे .
पण खरं तर सुधाकरापासून काशीनाथपर्यंत (बाकी सुद्धा बरेच) लोप पावणारे  स्पिरीट चे दिवे पाहिले की कळते की सुरा हाच कलेला न कळलेला  शाप आहे.

अर्ज किया है

ए गालिब तू वली होता
अगर तू बादाखार न होता

सुबोध भावे यांना त्यांच्या वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।।।

जेडी
9 नोव्हेंबर 2018

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...