Showing posts with label चित्रपट. Show all posts
Showing posts with label चित्रपट. Show all posts

Thursday, October 14, 2010

मला भावलेले चित्रपट का पहावेत ? (भाग ५)

मित्रांनो ,




जगाच्या पाठीवर १९६०
दिग्दर्शक- राजा परांजपे 
संगीत- सुधीर फडके
पटकथा आणि गीते - ग दि माडगुळकर
कलाकार- राजा परांजपे , सीमा देव, धुमाळ
ह्या चित्रपटाचे मी लहानपणी पाहिलेले पोस्टर आठवते ... जगाच्या पाठीवर  लिहिलेले नाव आणि एका पेक्षा सुमधुर अशा गीतांची नावे असे या पोस्टर चे स्वरूप हिते
या वरूनच तुम्हाला कल्पना आली असेल कि या चित्रपटाची अजरामर बाजू याच्या गीतांमध्ये आहे.
मागे म्हटल्या प्रमाणे  सोप्या चालींची अवीट  गोडीची गाणी म्हणजे बाबूजींची गाणी .. आणि आधुनिक वाल्मिकी - गदिमांनी त्या गीतांचा प्राण म्हणजेच त्याचे शब्द असे रचले आहेत कि त्याबद्दल चांगले किंवा वाईट म्हणणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखे होईल त्यामुळे या दोघांना त्रिवार वंदन ...
गीतांबरोबर तितकीच   ह्रदयस्पर्शी पटकथा दर्जेदार मन हेलावून टाकणारे कलाकारांचे अभिनय यामुळे सुद्धा हा चित्रपट मनात कायमचे घर करून जातो .
बाबूजींच्या गीतांसाठी हा चित्रपट संग्रही ..




सांगत्ये ऐका -१९५९
दिग्दर्शक- अनंत माने 
कलाकार - जयश्री गडकर , सुलोचना , दादा साळवी , चंद्रकांत ,सुर्यकांत
सांगत्ये ऐका आणि जयश्री गडकर एक समीकरण आहे .. आठवणीतील चित्रपट आणि एखाद्या कलाकारासाठी लक्षात राहणारे काही चित्रपट असतात तर जयश्री गडकर यांच्यासाठी  हा सिनेमा लक्षात राहतो
चित्रपटाची कथा ग्रामीण पठडीतली व प्रभावी अशी आहे .
तमाशाप्रधान चित्रपटांच्या यादीत अव्वल असणा-या यादीत या चित्रपटाचे नाव मी पहिल्या तीनात नक्की ठेवले असते
बुगडि माझी .. आणि क्लाय्मक्स चा  तमाशा  अतिशय सुन्दर आहेत .

श्यामची आई - १९५३
दिग्दर्शक- प्र के अत्रे
कथा - साने गुरुजी 
कलाकार -वनमाला , माधव वझे , दामुनाना जोशी
श्यामची आई या साने गुरुजींच्या आत्म्चारीत्रावरून ह्या चित्रपटाची निर्मिती झाली.
श्यामची आई हे पुस्तक प्रत्येक मराठी मनात आई आणि मुलाबद्दल च्या नात्याबद्दल आदर निर्माण करते .या चित्रपटाला पहिले भारताबाहेरील सुर्वण कमळ देऊन गौरवण्यात आले . याला राष्ट्रीय पुरस्कार हि देण्यात आला .आजच्या पैशाच्या मागे लागलेल्या जगाला गरिबीत सुद्धा आपली मूल्य ढळू कशी देऊ नये हे हा चित्रपट शिकवून जातो.
प्रत्येक  मुलाने आपल्या आई बाबा बरोबर  पहावा असा चित्रपट ..


कुंकू  १९३७ 
दिग्दर्शक - वी शांताराम 
कलाकार- केशवराव दाते , शांता आपटे, शकुंतला परांजपे 
संगीत- केशवराव भोले 
मला हा चित्रपट एक सामाजिक चित्रपट म्हणून आणि कथानकाच्या पुरोगामी विचारसरणी या मुळे जास्त आवडतो. 
हा चित्रपट मी अगदी अलीकडे पहिला आणि मला कथानक अजिबात माहिती नव्हते .. पण चित्रपट पाहिल्यावर त्यातला अभिनय आणि कथानकामुळे मी फार प्रभावित  झालो . समाजप्रबोधन म्हणून ज्यावेळी चित्रपट बनवले जायचे त्यावेळी अशा पध्दतीची मांडणी अतिशय धाडसी वाटते ..
प्रभातच्या निर्मितीला सलाम..

संत तुकाराम - १९३६  

दिग्दर्शक- विष्णुपंत   गोविंद दामले  , फत्तेलाल 
कलाकार - विष्णुपंत  पागनीस , श्री भागवत , गौरी 
संत तुकाराम हा चित्रपट हा त्यातल्या संत भावासाठी बघावा .. कदाचित खरे तुकाराम कसे असतील जर कुणाला प्रश्न पडत असेल तर त्यांनी हा चित्रपट पाहावा.
माझी आजी हा चित्रपट पाहायला सिनेमागृहाच्या बाहेर चप्पल ठेऊन गेली होती  .. त्यात त्या काळातल्या साध्या प्रवृत्तीचे आणि त्या चित्रपटाच्या खरेपणाचे चित्र आपल्याला समजू शकेल.
प्रभात ची अजून एक अविस्मरणीय भेट


इतके दिवस आपल्यासमोर मला आवडलेले चित्रपट टप्प्या टप्प्याने सादर केले . कदाचित आपल्याला सुद्धा हे नक्कीच आवडतील अशी आशा करतो .
या लेखाला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आभार .
आपली मराठी चित्रपट सृष्टि अशीच समृद्ध रहो हीच सदिच्छा 

जयदीप भोगले 
१४.१०.१०
चित्रपट , कथानक ,प्रभात , फत्तेलाल , लेख  


Friday, October 1, 2010

मला भावलेले चित्रपट - का बघावेत ? ( भाग ४)




सिंहासन - १९८०
दिग्दर्शक - डॉ. जब्बार पटेल
संगीत - प. हृदयनाथ मंगेशकर 
कलाकार- अरुण सरनाईक , निळू फुले , सतीश दुभाषी ... आणि इतर सर्व मात्तबर मंडळी ...
सिंहासन हा अरुण साधू यांच्या मुंबई दिनांक आणि सिंहासन या कादंबऱ्यांवर आधारित सिनेमा आहे . मल्टी स्टार चित्रपात मराठी मध्ये जरा बोटावर 
मोजण्या  इतकेच आहेत त्यापिकी हा एक . ७० च्या दशकात रंगमंच गाजवणारे सर्व कलाकार एकत्र येण्याची पर्वणी या चित्रपटात घडून आली .
हा चित्रपट मला कोल्ड सिनेमा या धर्तीचा वाटतो . फार तद्काहेबाज संवाद नसूनही सिनेमाची पकड सुटत नाही .
धुरंदर आणि वास्तववादी राजकारणावर प्रकाश टाकणार चित्रपट .राजकारण . समाजकारण , कामगार संघटना यांचे तिरंगी बंडाळी यात दिसते  
या सर्व कलाकार मंडळींसाठी संग्रही ठेवावा असा चित्रपट 

हा खेळ सावल्यांचा १९७४
दिग्दर्शक -वसंत  जोगळेकर
कथा - मधुसूदन कालेलकर
संगीत - प. हृदयनाथ मंगेशकर
कलाकार- काशिनाथ घाणेकर, आशा काळे ,धुमाळ , राजा गोसावी
मराठी चित्रपट सृष्टीत भयपट आणि सस्पेन्स चित्रपट खूपच कमी झाले . पारध, अशी एक रात्र होती, एक रात्र मंतरलेली , झपाटलेल्या बेटावर,  पण पारध सोडता बाकी सगळे सुमार होते ..
उत्तम गाणी आणि खिळवून ठेवणारी कथा या मुळे हा चित्रपट एक उत्तम  भयपट म्हणून संग्रही हवा   
आशा काळे मला यात विशेष आवडली .. आणि गाणी तर मला वेगळे काही सांगायला नको अशीच आहेत 

सामना - १९७४ 
दिग्दर्शक- डॉ जब्बार पटेल
कथा आणि संवाद- विजय तेंडूलकर 
कलाकार - निळू फुले , डॉ श्रीराम लागू 
सामना हा चित्रपट मला या पूर्ण यादीत सर्वात जास्त आवडतो . दोन व्यक्ती आणि व्यक्तिमत्वाची झुंज . विजय तेंडूलकर यांची कथा आणि अतिशय प्रभावी संवाद, निळूभाऊ आणि डॉ लागू यांची कदाचित सर्वोत्तम ठरावी असा अभिनय आणि संवाद शैली .
हिंदुराव पाटील आणि मास्तर ( विफल गांधीवादी ) या व्यक्तिरेखा कदाचितच कुणाला अजून उत्तम रंगवता येतील किंवा आल्या असत्या. 
प्रत्येक बाबतीत हा चित्रपट सरस आहे .. हा चित्रपट रिलीज झाल्यावर ज्यांनी हा पडद्यावर पहिला मला त्यांचा हेवा वाटतो . या चित्रपटाशी निगडीत सर्व व्यक्तींना माझं त्रिवार वंदन 
प्रत्येक मराठी माणसाने  उत्तुंग आणि आंतरराष्ट्रीय  दर्जाचा मराठी चित्रपट( छायाचित्रण सोडून) म्हणून हा संग्रही ठेवावाच ...




पिंजरा - १९७२
दिग्दर्शक- वी शांताराम
संगीत- राम कदम 
गीते - जगदीश खेबुडकर 
कलाकार- श्रीराम लागू, निळू फुले, संध्या 
सामनाच्या दर्जाचा हा अजून एक चित्रपट . पिंजरा हा चित्रपट न ऐकलेला मराठी माणूस मी अजून पाहिलेला नाही .उत्तम लावण्या ( संगीत आणि गीते या दोन्हीही तितक्याच दर्जेदार ) आणि अभिनय याने नटलेला  हा एक चित्रपट
या चित्रपट मला तर  लागूंच्या व्यक्तिरेखेच्या होणा-या दैनेबद्दल डोळ्यात पाणी येते . काही काही डायरेक्शन सीन  अविस्मरणीय आहेत . राम कदम आणि जगदीश खेबुडकर यांनी या चित्रपटाचे सोने केले
सर्व दृष्टीने पंचतारांकित सिनेमा .. शांताराम बापूंच्या सिनेमा चाहत्यांच्या संग्रही असावा असा चित्रपट ..

सोंगाड्या - १९७०
कलाकर - दादा कोंडके , उषा चव्हाण , निळू फुले
संगीत - राम कदम
हा चित्रपट मी दादा कोंडके याच्या जयंतीदिवशी प्रभात सिनेमा पुणे इथे पहिला साल २००३ , आणि विशेष म्हणजे हाउसफुल ,. आणि आम्ही पहिल्या रांगेतून  पहिला.
दादांच्या  झंजावाती युगाची सुरवात करून  देणारा  चित्रपट . या नंतर दादांनी मराठी गावरान मेवा दिला ते काही सांगायची गरज नाही .
राम कदम यांचे संगीत, दादांची अफलातून अदाकारी. आणि कृश्न्धवल असून रंगीत वाटणारी गाणी यामुले हा चित्रपट अवीट गोडीचा आहे.


मुंबईचा जावई - १९७०
संगीत - सुधीर फडके
गीतकार- ग दि माडगुळकर 
हा चित्रपट तसा अगदी नेहमीच्या पठडीतला पण .  १९७० मध्ये मुंबईच्या चाळकरी जीवनतील गमती जमती आणि त्यातून फुलणारी कौटुंबिक प्रेमकथा हा विषय मस्त होता .
याची गाणी मला कधीही ऐकायला आवडतात .. साधी आणि सोपी गाणी कशी अवीट करावीत यात बाबुजींचा हात कुणीच धरू शकणार नाही,
संगीतासाठी चित्रपट संग्रही
.. आवडते गीत आज कुणी तरी यावे आणि प्रथम तुज पाहता ..

एकटी १९६८ 
निर्माता - राजा ठाकूर 
दिग्दर्शक - चौगुले 
नावाप्रमाणेच हा  चित्रपट म्हणजे आतडे पिळवटून टाकणारा सुलोचनाबाईंचा अभिनय ... खूप लहानपणी पाहिलेला चित्रपट ...
आईवेड्या मुलाने हा चित्रपट पाहून जर डोळ्यात पाणी आले नाही तर शपथ .... म्हणजे इतर लोकांनाही तितक्याच भावना आवरणार नाहीत हे ही खरे !!१
इथून दृष्ट काढते .. हे गीत ..तर लाजवाबच आहे ...मला मोलकरीण या चित्रपटापेक्षा हा चित्रपट जास्त वास्तव वाटतो म्हणून मी याला जास्त झुकते माप दिले ..

हा माझा मार्ग एकला  १९६४ 
दिग्दर्शक - राजा परांजपे
कलाकार - सचिन ( बालकलाकार ) राजा परांजपे 
हा चित्रपट एका बालकलाकाराचा म्हणालात तरी चालेल .. काही अफलातून छायाचित्रीत सीन्स , उत्तम गाणी . राजा परांजपे यांचा उच्च अभिनय 
आणि हळुवार पण कष्टी करणारी कथा ...
जुन्या सालच्या सिनेमामध्य या चित्रपटाचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते ..


जयदीप भोगले 







Wednesday, September 22, 2010

मला भावलेले मराठी चित्रपट - का पहावेत ?(भाग १)-


मित्रांनो कामाच्या गराड्यामुळे मी काही दिवस लिहू शकलो नाही . तुम्ही मला फार मिस केले असेल असे म्हणत नाही .. पण तरीही जे आजकाल माझा ब्लॉग वाचतात हे फक्त त्यांना उद्देशून ...
मी २५  उत्तम मराठी चित्रपट याची एक लिस्ट सांगितली होती आता चित्रपट प्रदर्शित झालेल्या सालाप्रमाणे ते का चांगले ते मी लिहणार आहे .
त्याचा पहिला भाग लिहिला आहे . आवडल्यास नक्की कळवा. न आवडल्यास टीका करा .. 


जोगवा - २००९
दिग्दर्शक - राजीव पाटील 
कलाकार - उपेंद्र लिमये , मुक्त बर्वे, किशोर कदम  
एक मन हेलावून टाकणारा अनुभव .. संवेदनशील दर्शकांना हा चित्रपट नक्कीच बेचैन करून टाकतो. अप्रतिम छायाचित्रण , भेदक आणि वास्तव संवाद आणि उपेंद्र लिमये व मुक्त बर्वे यांचा उत्तुंग अभिनय या मुळे हा चित्रपट व्यावसायिक नसून मला आवडून गेला. अजय अतुल यांची समर्पक गाणी हे सुद्धा या चित्रपटाची जमेची बाजू होती. जोगती समाज आणि त्यामध्ये माजलेली अंधश्रद्धा यावर प्रकाश टाकून राजीव पाटील यांनी या चित्रपटाचे सोने केले.
सर्वसाक्षी आणि इतर काही चित्रपट ही अंधश्रद्धेतून होणा-या पिळवनुकीवर  आधारित होते पण जोगवा हा चित्रपट जोगतिणीची दुर्दशा जास्त उत्तम रीतीने दाखवून जातो.
आजच्या भांडवलवादी प्रगतशील भारतीय  जगामध्ये अजूनही  दु:ख किती भयाण स्वरुपात जगत आहे हे जर आपल्याला हवे असेल तर हा चित्रपट आपल्या संग्रही हवाच .
नटरंग - २००९
दिग्दर्शक- रवी जाधव
कलाकार- अतुल कुलकर्णी , किशोर कदम ,
छायाचित्रण - महेश लिमये
जाऊ द्या ना घरी 
हिंदी चित्रपटाशी स्पर्धा करणारे छायाचित्रण , उत्तम संकलन , अप्रतिम संगीत आणि गीते याने नटरंग हा चित्रपट नटलेला होता.
चित्रपटातील विषय कलात्मक पठडीकडे झुकणारा असूनही व्यावसायिक दृष्टीने हाताळणी करून चित्रपटाच्या कथेला धक्का न लागू देणे यात दिग्दर्शक रवी जाधवांना यात यश आले आहे.जुन्या आणि कृष्णधवल जगात बंद असलेल्या तमाशाप्रधान चित्रपटाला पुन्हा एकदा नवतारुण्य देण्याचे काम या चित्रपटाने केले.
उत्तम बनवलेला  ग्रामीण चित्रपट हा शहरातही हाउसफुल्ल चालू शकतो हे याने दाखवले.
अतुल कुलकर्णी यांनी चित्रपटासाठी घेतलेली मेहनत ही आणखी एक जमेची बाजू .
हा चित्रपट गीतांसाठी आपल्या संग्रही नक्की हवा


मी शिवाजीराजे भोसले बोलतोय  २००९ 
दिग्दर्शक- संतोष  मांजरेकर
कलाकार- सचिन खेडेकर, महेश मांजरेकर 
स्फुरण फक्त ऐतिहासिक आणि युद्धपटांनी चढू शकते अशी जर आपली धारणा असेल तर हा चित्रपट आपण पहावाच. दिनकर मारुती भोसले या व्याक्तीचीत्रातून प्रत्येक मराठी माणसाला विचारलेला सवाल म्हणजे मी शिवाजी राजे बोलतोय . 
उत्तम विषय , अप्रतिम हाताळणी , उत्कृष्ट एक खांबी - सचिन खेडेकर यांचा अभिनय यांनी नटलेला हा एक व्यावसाईक चित्रपट .
मराठी चित्रपटातील आजतागायत सर्वात अधिक व्यावसाईक यश मिळवलेला . 
हा चित्रपट हा मला त्याच्या काल्पनिक जगतातून वास्तवाकडे कसे बोट दाखवता येते याचे उत्तम उदाहरण वाटते . प्रत्येक संवादातून आपल्याला मराठीपणाची जाणीव आणि अभिमान पुन्हा एकदा जागृत करून देणारा चित्रपट .
पटकथा आणि संवाद यासाठी हा चित्रपट संग्रही असावा 

कायद्याच बोला ..२००५ 
दिग्दर्शक - चंद्रकांत कुलकर्णी
कलाकार - मकरंद अनासपुरे , सचिन खेडेकर
एका कॉमेडी सम्राटाचा उदय अशी या चित्रपटची ओळख करून द्यावी लागेल .
हा चित्रपट हा निखळ विनोदी पण कुठेतरी उत्कंठा वाढवणारा आणि अतिशय सुटसुटीत पटकथा असणारा चित्रपट आहे.
चित्रपटाने व्यावसाईक यश तर मिळवलेच पण हळू हळू शहरी प्रेक्षक मल्टीप्लेक्स दर्शक मराठी चित्रपटांना जाऊ लागला .
जुन्या द्वैअर्थी , अंगविक्षेप प्रधान  विनोदांना बाजूला ठेऊन भाषाप्रधान विनोद या चित्रपटाने उचलून धरला आणि त्याचा उदय म्हणजे मकरंद अनासपुरे 
मकरंद अनासपुरेच्या निखळ विनोदासाठी हा चित्रपट संग्रही हवाच .

अगं बाई अरेच्चा ... २००४ 
दिग्दर्शक - केदार शिंदे 
कलाकार - संजय नार्वेकर , दिलीप प्रभावळकर 
संगीत - अजय अतुल 

हा चित्रपट एका इंग्रजी ( व्हाट वूमन वांट ?) या वर आधारित असूनही मराठी मातीचा सुगंध जपणारा असा आहे . चांगले कथानक आपल्या पद्धतीने फार कमी चित्रपटात उतरवलेले असते तसा एक चित्रपट. उत्तम गाणी  ' मन उधाण वा-याचे ' आणि दुर्गे दुर्गट भारी ही तर अविस्मरणीय आहेत .
अजय अतुल यांच्या सांगीतिक प्रवासाचा महत्वाचा टप्पा असे याला सांगावे लागेल.
हा चित्रपट तुम्ही कधी कुठही कुठूनही पहिला तरी तुम्ही पाहू शकता असे मला वाटते . आणि पुरुषाच्या मनातील सुप्त इच्छा ' मला बाईच्या मनातले कळले तर ' म्हणून गालातल्या गालात हसून स्वप्न रंगवण्यासाठी हा चित्रपट मला फार आवडतो .
स्वप्नकथेचे वास्तववादी मराठमोळे ' मुंबईकरी ' चित्रण म्हणून हा चित्रपट आपल्या संग्रही हवा . २ तासात नक्कीच फ्रेश व्हाल ....






जयदीप भोगले
२२-०९-२०१० 

Thursday, September 16, 2010

मला भावलेले मराठी चित्रपट - तुम्ही पाहिलेत ?


मित्रांनो, आठवणीतले चित्रपट, आवडती गाणी आपल्याला कायम हवेहवेसे वाटतात . आपण पुन्हापुन्हा त्यांच्याबद्दल बोलतो वाचतो , ते कुठल्या वाहिनीवर येत असतील तर अगदी थोडावेळ देवदर्शनासाठी थांबल्यागत थबकतो , आणी दर्दी लोक तर त्यांचा संग्रह ही करतात . असेच काही चित्रपट ते ही अस्सल मराठी.बर का !!
माझ्या मते हे चित्रपट मराठी सिनेमाच्या इतिहासात नक्कीच एक मनाचे स्थान बनून राहतील . या पंक्तीमध्ये तुम्हाला काही चित्रपट अजून जमा करावे वाटतील, कुठले तरी चित्रपट वादातीत म्हणून वजा करावे वाटतील पण हे चित्रपट नक्कीच तुम्हाला आवडतील , आवडलेले असतील याची मला खात्री आहे. 
इंडिया टायीम ने अग्रणी असलेल्या उत्तम बॉलीवूड चित्रपटाची लिस्ट जाहीर केली होती .. त्यामुळे मला वाटले आपल्या मराठी चित्रपटांमध्ये नक्कीच असे काही चित्रपट नक्कीच आहेत जे अत्युत्तम आणी न सोडण्याजोगे आहेत त्याची लिस्ट मी या पोस्ट मधून सांगणार आहे . आवडल्यास दाद अपेक्षित आणी हे चित्रपट बघणे ही अपेक्षित आहे आणि ते ही ओरिजिनल सी डी घेऊन बर का !! 





1 जोगवा2009


2 नटरंग2009


3 मी शिवाजीराजे भोसले बोलतोय 2009


4 कायद्याच बोला 2005


5अगं बाई .. अरेच्चा2004


6 सरकारनामा 1998


7 लपंडाव1993


8 कळत नकळत 1991


9 थरथराट1989


10अशी ही बनवा बनवी1988


11 धाकटी सून 1986


12 उंबरठा1982


13 सिंहासन1980


14 हा खेळ सावल्यांचा 1976


15 सामना1974


16पिंजरा1972


17 सोंगाड्या 1970


18 मुंबईचा जावई1970


19 एकटी 1968


20 हा माझा मार्ग एकला1963


21 जगाच्या पाठीवर 1960


22 सांगते ऐका1959


23 श्यामची आई 1953


24 कुंकू( प्रभातचा)1937


25 संत  तुकाराम १९३६ 





आहेत ना जबरदस्त हे चित्रपट?हे चित्रपट  वेगवेगळ्या पठडीतले आहेत . काही विनोदी ,काही गंभीर, काही कौटुम्बिक काही श्रवणीय आहेत पण सर्व चित्रपतानी  तिकिटबारिवर , समीक्षकांच्या लेखणीवर त्यांच्या काळात राज्य केले आहे . कालाबरोबर ते जुने होत नाहीत. अगदी कृष्णधवल असले तरीही ... या प्रत्येक चित्रपटाचे चार भागांमध्ये मी विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहे ,की हे  का चांगले आहेत. शक्य झाल्यास विडियो पण टाकेन.
आवडल्यास प्रतिक्रिया जरूर सांगा.. ( कदाचित याजसाठी केला होता अट्टहास ... :)

जयदीप भोगले
१५ -०९-२०१०
  





Friday, September 10, 2010

सल्लू मियाचा रमजानी शिरखुर्मा - दबंग



चित्रपट- दबंग 
भाषा- हिंदी
कलाकार- सलमान खान , नवतारका - सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान , सोनू सूद, आयटम बॉम्ब- मलायका अरोरा
दिग्दर्शक - अभिनव कश्यप 
संगीतकार- साजिद वाजीद 
पाहवा की नाही - पाहिल्यास मजा येईल
मित्रानो , डोक्याला त्रास देणारे , डोके धरून बघावे लागणारे , आणि डोके बाहेर ठेऊन जाऊन बघायचे अशी मी नवीन वर्गवारी केली आहे. आजच प्रदर्शित झालेला दबंग हा चित्रपट डोके बाहेर ठेऊन जायच्या पठडीतला चित्रपट आहे .
हा एक हाणामारी चित्रपट या धाटणीचा आहे. दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी हा चित्रपट शिट्या वाजवणारे , मजा करणारे तरुण , आणि सलमान खान चे पंखे यांना विचारात ठेऊन सर्वेषाम दर्शकांसाठी बनवलेला दिसतो आणि तो प्रयत्न अगदी चोख या चित्रपटात यांनी बजावला आहे.
चित्रपटात कथानक हे फार महत्वाचे ( आजकाल कुठे असते म्हणा) नसल्यामुळे चित्रपट कथावस्तू अशी आहे आणि तशी आहे असे मी सांगणार नाही .
पण तरीही आता हे परीक्षण लिहायचा घाट घातला आहे तर सांगतो, रॉबिनहूड चुलबुल पांडे ( सलमान खान) हा लहानपासुनच त्याचा सावत्र भावाबद्दल( अरबाज खान ) खार खाऊन असतो कारण त्याचे सावत्र वडील प्रजापती पांडे ( विनोद खन्ना) याला कधीच मायेचा हात देत नाहीत .. पण त्याची आई ( डिम्पल कपाडिया ) त्याला समजावून पुढे रेटत असते पुढे हाच मुलगा पोलीस अधिकारी बनतो .. त्याचे उत्तर प्रदेश राजकारणातील गुंडांबरोबर भांडण , एका कुंभार बालेशी  ( अतिशय नीटनेटकी आणि माती न लागलेली ) गुळ घालणे आणि ... बस्स  बस्स ...मला वाटते आता तुम्हाला कथा कशी असेल हे पुसटसे उमजले असेल.
 पण आता अशा कथानकात जर सलमान खानची स्टायील, वेगवान अशी साहस दृश्ये , श्रवणीय गाणी , भन्नाट टाळ्या वाजवायसारखे संवाद जर एखाद्या मसाल्यासारखे घातले तर हेच कथानकाचे सुरण कसे सुरण कबाब बनते हे बघणे मजेदार आहे.
आपल्या ( म्हणजे अरबाझच्या- अशी म्हणायची पद्धत आहे  ) मलायका अरोरा - ' मुन्नी बदनाम हुई - मै झंडूबाम हुई ' आयटम साँग घेऊन थेटर कसे  डोक्यावर घेता येईल याची काळजी घेतात
 तेरे मस्त मस्त दो नैन, हून दबंग  ही गाणी सुद्धा अगदी श्रवणीय आहेत
सोनू सूद या नव्या चेहऱ्याने आपली डावी भूमिका चोख बजावली आहे . बाकी सर्व ठीक .. आता मी बाकीच्या लोकांबद्दल जास्त सांगितले तर भाजिपेक्षा कढईचे कौतुक केल्यासारखे होईल . 
चित्रपटाची जाहिरात बऱ्याच दिवसापासून सर्वत्र धडाक्यात चालू होती आणि वोन्तेड चित्रपट हिट झाल्यापासून सलमानबद्दल प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षा आज जवळ जवळ सल्लू भाईनी  पूर्ण केल्या आहेत.
 'वान्तेद' इतकी जास्त रक्तरंजित दृश्ये नसल्यामुळे हा चित्रपट सुखावह वाटतो. शिवाय सवंग प्रसिद्धी साठी अश्लील दृश्ये बरबटलेले संवाद असे यात काही सापडणार नाही त्यामुळे आपण कुटुंबाबरोबर बिनधास्त हा चित्रपट बघू शकतात.सलमान खान हां यामध्ये  अत्यंत लक्षवेधी भूमिका साकार करतो अणि कदाचित हा सिनेमा त्याच्या कारकिर्दीतील एक चांगला चित्रपट म्हणावा लागेल .
.चित्रपट हा मनोरंजन करण्यासाठी असावा त्यातून आपला तीन तास टाईमपास व्हावा ,अशी माफक अपेक्षा असणा-या प्रेक्षकांना हा चित्रपट पर्वणी आहे आणि तो नक्कीच सुखावून जाईल. रमजान च्या या लॉन्ग वीकेंड साथी दबंग हा शीर्खुर्म्या सारखा मेजवानी ठरेल हे मात्र नक्की 
बाकी आपण प्रत्यक्ष पाहून ठरवावे ...

जयदीप भोगले 
 
 
   
 
 

एव्हरेस्ट

 ज्याचे त्याचे एव्हरेस्ट एव्हरेस्ट अस शिखर एकच नसतं प्रत्येक माणसाचं एव्हरेस्ट वेगळं असतं उंची कमी जास्त असेल समाजात शिखराची पण सर केल्यावरच...