Showing posts with label जयदीप भोगले. Show all posts
Showing posts with label जयदीप भोगले. Show all posts

Wednesday, April 14, 2021

महामानव

 महामानव


घटनेचा अविष्कार

मनुचा बहिष्कार

मानवतेचा पुरस्कार

वर्णव्यवस्थेचा तिरस्कार


 शिक्षणाचा सुविचार

 अर्थशास्त्राचा साक्षात्कार

  आधुनिक बिंबिसार

महामानवाला  नमस्कार


14 एप्रिल 2019

जयदीप भोगले



Sunday, July 5, 2020

मला उमजललेले गुरू"



गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या भारतात गुरुबद्दल कृतज्ञ होण्याचा दिवस..

आपण जे काही आहोत ते आपल्याला कुणी तरी केलेल्या संस्कारामुळे ,कधी जाणतेपणाने असतील किंवा कधी नकळत होणाऱ्या अनुभवाने सुदधा असतील ,त्याची एक आठवण ठेवून त्याबद्दल आभार मानायचा दिवस.

' आजकालच्या secret  असू देत किंवा  बुद्ध धर्माची ' lotus sutra' असू देत " Gratitude" या संकल्पने ला सर्वात जास्त महत्व दिले आहे .या धर्तीवरच की काय आपल्या संस्कृती मध्ये  सुदधा व्यासपूजन व गुरुपूजन, त्याबद्दल असणारी  कृतज्ञता व्यक्त  करावी म्हणून हा दिवस राखून ठेवला आहे.

गुरू म्हणजे शिक्षक जो आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातो मग ते पहिले पाऊल टाकायला शिकवणारी आई असेल की, पहिल्यांदाच रस्ता ओलांडायला शिकवणारे बाबा असतील . पहिली बाराखडी शिकवणाऱ्या आपले गुरुवर्य की अगदी आपल्या सध्याच्या व्यावसायिक  जीवनात आपले न भावणारे वरिष्ठ असो यांचे अपल्यावर कळत नकळत संस्कार होत असतात त्यातून आपण घडत असतो.
गुरू  आपल्या संपर्कात येणारा मूर्त माणूस सुदधा असतो किंवाआपली कर्मभूमी, आपल्या अवतीभवती असणारा समाज, अगदी निसर्ग हा सुदधा आपल्या वर गुरुप्रमाणे संस्कार  करतच असतो व तो सुदधा कधी आपल्या गुरूस्थानी जातो हे कळत नाही त्यांना सुदधा धन्यवाद देण्याचा दिवस.

 ज्योतिष शास्त्रात सुदधा गुरू ला फार वरचे स्थान दिले आहे आणि असे म्हणतात गुरू ज्या स्थानावर दृष्टी टाकतो ती शुभच असते  आणि म्हणूनच गुरु ही व्यक्ती असो की अमूर्त शिकवण, ती वयक्तिक रित्या कशीही असो ती जेव्हा गुरुस्थानी येते ती कायम आपल्याला नवीन काहितरी देऊन जाते . मग कधी काय करावे असेल तर कधी काय करू नये सुदधा..

गुरू शिष्य नात्यात बऱ्याच वेळा किंवा नेहमीच म्हणा शिष्याला जास्त प्रकाशझोत मिळतो मराठीमध्ये "Limelight"... आणि मग लोकांची गाडी वळते अरे याचा गुरू कोण ?? मग काही जण त्याला अमूर्त स्वरूप देतात व काही द्रोणाचार्य रूपी मूर्त व्यक्ती कडे नतमस्तक होतात.  सर्व ठिकाणी त्याच्या प्रत्येक वळणावर त्याला असंख्य गुरू भेटतात  व या सर्व गुरूस्थानी असणाऱ्या लोकांना स्मरण्याचा हा दिवस.

 त्यामुळे आपल्या धकाधकीच्या आयुष्यात जर आपल्याला प्रश्न पडला असेल माझा गुरू कोण ?? आजकाल गुरू शिष्य परंपरा नाहीच उरली .. गुरू असं काही म्हणावं असं काही कुणी मला समोर येत नाही... त्या सर्व जणांना आपला लहानपणापासून ते आत्तापर्यंत  डोळे बंद करून तुमच्यात बदल घडवणारे आईवडील असो की अगदी  कायम वेळेवर धावून आपल्याला वक्तशीरपणा शिकवणारी मुंबई लोकल असेल ही सुद्धा गुरुस्थानी मानून कृतज्ञ व्हायला हरकत नाही .
आणि ज्यांना आपले प्रमुख गुरू वंदनीय असतील त्यांना वंदन करून काही गुरुवर्य जे तुमच्या आठवणीत मागे पडले असतील त्यांना त्रिवार वंदन करून कृतज्ञ व्हायला हवे

कारण एक कृतज्ञ  शिष्यच आपल्या गुरुला सर्वोत्तम बनवतो .


जयदीप भोगले
5 जुलै 2020

Friday, February 2, 2018

कॉफी


धुंद तुझा गंध सखे
स्वच्छदं अशी साथ
श्याम रंग तुझा रात्र जागे
दौडे अशी तू मनात
शहाणी असे तू उष:काली
वेडी होई  जेव्हा रात
गप्पा असो की आठवण
प्रत्येक प्यालातून हाक
पहाडवरची ललना जणू
वाफेतून लागे घुमू
निर असो क्षीर कधी
तुझाच सम्राज्ञी चा थाट
ब्राझील ची लेडी म्हणू
का कुर्ग ची परी तू अस्मानी
काळी जादू करे जगात
जरी दुनिया गोऱ्यांची दिवाणी
कौतुकाचे शब्द माझे
कॉफी असे नाव तुझे
जुनी मैत्री असो की प्रीत नवी
सर्वांनाच तू हवी हवी

जयदीप भोगले
5 जानेवारी 2018
मुंबई एअरपोर्ट

Friday, November 10, 2017

Hamlet

नाकासमोर चालणं चांगलं होतं का वाईट हा प्रश्न कधी पडलाच नव्हता
हे करू का नको असा विचार मनात कधी आलाच नव्हता
पण तू आलास आणि अस काहीतरी झालं
मी खरा का माझं प्रतिबिंब हेच कोडं झालं
 हॅम्लेट च्या सावलीत माझा किंग लियर नेहमीच डळमळीत होतो
TO be or not to be म्हणत आजकाल माझाच हॅम्लेट होतो

जयदीप भोगले
11 ऑक्टोबर 2017

Tuesday, October 17, 2017

दिवाळीचा फराळ




लाडू सखे तुजसम गोड नि माझ्या इतका कडक आहे

चकली आहे खमंग तुजसम नि माझ्याजोगी  चिवट आहे

शुभ्र झाली करंजी तुजसम तरीही बाखर थोडे खवट आहे

चिरोटा अगदी हलका तुजसम पण मजसम  पसरट आहे

बायको म्हणाली हे कौतुक समजू माझे ?? का  फराळावरची टीका आहे

इतका तपशील पुरे झाला पुणेरी तुझ्यापुढे फिका आहे

तुझी कमेंट तर एक्दम जणू माझ्या ऑफिसचाच  फॉरमॅट आहे

काम कितीही भारी करा  तरी दिवाळी बोनस  भुईसपाट आहे

जयदीप भोगले
16 ऑक्टोबर 2017
😊☺☺☺😊

Monday, October 2, 2017

लिमिटेड समाजवादी



समाजकार्य सुद्धा आजकाल समजून करावं म्हणतोय

थोडंस calcluation करूनथोडं उदार व्हावं म्हणतोय

सगळंच केलं लोकांच्या हवाली तर
मला हवालदिल व्हावं लागू नये

म्हणूनच थोडी फी जास्त आकारावी म्हणतोय
थोडंस calcluation करून थोडं उदार व्हावं म्हणतोय

मला पिझ्झा मिळाला तर थोडासा पाव नक्कीच देता येईल
आडातच नाही उरलं तर पोहऱ्यात कोठून येईल

गांधीवादी म्हणून शर्ट काढला जरी नाही
लोकांच्या अश्रू पुसण्याला रुमाल द्यावा म्हणतोय

थोडंस calcluation करून थोडं उदार व्हावं म्हणतोय.



भांडवलवादी जगात असे समाजवादी सुद्धा उरले नाही
फ्लॅट घेऊन लॉक लावून ठेवतील पण
कमी भाड्याने लोकांना देणार नाही

लिमिटेड का होईना जरा माणुसकी जपावी म्हणतोय
थोडंस calcluation करून थोडं उदार व्हावं म्हणतोय

जयदीप भोगले
2 ऑक्टोबर 2017

Friday, December 16, 2011

सवयीचा गुलाम



मला वाटते असे करावे 
सवयीला फासावर द्यावे
           गुन्हेगार ती माझ्यापेक्षा ,
 एकटेच मी का मरावे
जर  मी अपराधी बेधुन्धीचा 
मग पाण्याने सुरा का बनावे 
देव म्हणतो श्रद्धा ठेवा
मग दगडात त्याने का लपावे
मीरेला जर विष देती दुनिया
कृष्णा तुझसी का पूजावे
सवाल माझा सवयीला या,
श्वासाला का सवय म्हणावे ?
असेल जर ती सवय जगाची
श्वास आणि जग मग बंद पडावे .
मला वाटते असे करावे 
सवयीला फासावर द्यावे


जयदीप भोगले 
१५.१२.२०११ 

Friday, October 15, 2010

करमणुकीची सरबत्ती --- कौन बनेगा करोडपती


 कार्यक्रम- कौन बनेगा करोडपती 
वेळ- ९.००-१०.००
वाहिनी- सोनी 
पहावा की नाही - अवश्य पहा ..
स्टार वाहिनीवर सुरवात करून स्टार आणि अमिताभ या दोघांनाही लोकप्रियतेच्या उच्चांकाला नेणारा  सर्वांचा लाडका प्रश्नोतरांचा कार्यक्रम कौन बनेगा करोडपती याने सोनी या वाहिनीवर  या सोमवारपासून नवीन सुरवात नाही तर शुभारंभ केला ( कॅडबरी चोकलेट हे याचे प्रस्तुतकर्ता आहेत .)
चुरशीच्या लढाईमुळे हाच कार्यक्रम शाहरुख खान याने काही काळ सुत्रसंचालीत केला होता .. बादशाह आणि बिग बी यांची चढाओढ कितीही रंजित केली तरी यावेळी मात्र आपल्या हिंदुस्तांनाच्या नव्हे तर प्रत्येक भारतीय मनावर राज्य करणाऱ्या श्री अमिताभ बच्चन यांनी सूत्र पुन्हा आपल्या हाती घेतली ..
यातच आता ही चुरशीचे पारडे कुणाकडे झुकले हे काही वेगळे नमूद करावे असे मला वाटत नाही. असो मोठ्यांच्या वादात आपलं विषयांतर नको .
सोनी वाहिनीवर जरी हा प्रोग्राम नव्याने  सुरु झाला तरी यात काही लाइफ लाईन  सोडल्या तर फार बदल नाहीत ..
पण अमिताभ बच्चन यांची पुन्हा एकदा भेट हेच प्रमुख आकर्षण आहे. 
आता लोकांनी कितीही सांगितले कि आता तो तोच तोच पणा वाटतो .. आता ती एनर्जी नाही .. अजून पुष्कळ कार्यक्रम पाहण्यासारखे आहेत. पण बच्चनची मजा काही वेगळीच
पहिल्याच भागात त्यांनी अग्निपथ आणि दिवार याचा संवाद सादर केला आणि जिंकले .. कदाचितच  इतकी इंटेन्स डिलेव्हरी कुणी दुसरे करू शकते .
अमिताभ बच्चन ज्या पद्धतीने आपल्या समोर बसलेल्या जन सामान्याला वागवतात, त्याचाशी संवाद साधतात , त्याचा आनंदाशी कुठेही वरचढ न होता एकरूप होतात हे वाखाणण्यासारखे आहे आणि हे या खेळाचे वैशिष्ट्य .. आणि कदाचित प्रश्नापेक्षा मला हेच पाहायला जास्त आवडते .
या वेळी एक्स्पर्ट पाहुणा एक नवीन भाग आहे आणि ते सुद्धा चपखलपणे बसवले आहे .
प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असल्यामुळे प्रत्येक जिंकलेल्या रकमेत आपल्याला उत्तर माहिती असेल तर आपणही जिंकू शकलो असतो ही हुरहूर प्रत्येक दर्शक करत असावा ..
शिवाय मी याबद्दलच्या चर्चा  जुन्या करोडपति  मध्ये तर रस्त्यावर, पानाच्या गादीवर, किराणा दुकानावर सुद्धा ऐकल्या आहेत ..त्यामुळे कोण स्पर्धक किती छान दिसतो पासून कोण किती बावळट ,निर्बुद्ध, ढ अशा सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया आपण कितीही सुमार बुधिमत्तेचे असलो तरी आपण मस्त ठोकून देऊ शकतो कारण आपल्याला उत्तर काय.. हे माहिती होते,
 अणि ही याची गम्मत आहे .
या कार्यक्रमाने स्लम डॉग ला सुद्धा मदतीचा हात दिला आणि त्या सिनेमात सुद्धा करोडपती हा महत्वाचा भाग होता.
याच कार्यक्रमाने कितीतरी क़्विज शो , विडम्ब्ने आणली .. प्रत्येक कॉमेडी कार्यक्रमात बच्चनची नक्कल केली जाऊ लागली 
कदाचितच इतकी लोकप्रियता आणि त्यावर भाजून घेतलेल्या पोळ्या दुस-या कुठल्या कार्यक्रमात झाल्या असतील असे मला वाटत नाही  ...
आणि सोनी वाहिनीसाठी प्रतिस्पर्धी बिग बॉस हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे  सोनी ला टी आर पी साठी फायदाच होईल नव्हे एव्हाना झाला असेल 
पण दूसरा हुशार मुलगा अजारी पडला म्हणून मी पहिला आलो असा कार्यक्रम करोडपति नक्कीच नाही .. आणि इतर चांगले काही नाही म्हणून बच्चन ला बघू असे दिवस किंवा दर्जा बच्चन साहेब कधीही येऊ देणार नाहीत ..
म्हणुनच सांगतो बच्चनच्या चाहत्यानी , मला लॉटरी लागली तर असे स्वप्न रंगवणा-या स्वप्नाळू दर्शकांनी ..,बरबटलेल्या कार्यक्रमातून आपल्या मुलाला कसे वाचवावे या विचारात असणा-या पालकांनी , आणि आमच्यासारख्या चूक की बरोबर ,चांगले की वाईट अशी उठाठेव करणार-या समीक्षकांनी कौन बनेगा करोडपती अवश्य पाहावा
नाराजी होणार नाही एवढी खात्री .. बाकी आपण सुज्ञ आहात ..
तो चलिये आप और हम देखते है दुनिया का अदभूत खेल ,, जिसका नाम है  -- कौन बनेगा करोडपती ....
 
जयदीप  भोगले
१५ .१० .  २०१० 

एव्हरेस्ट

 ज्याचे त्याचे एव्हरेस्ट एव्हरेस्ट अस शिखर एकच नसतं प्रत्येक माणसाचं एव्हरेस्ट वेगळं असतं उंची कमी जास्त असेल समाजात शिखराची पण सर केल्यावरच...