Wednesday, August 15, 2018

देशभक्ती व देहभक्ती



१५ ऑगस्ट जवळ आला की उगाच देशभक्तीपर गीते तिरंगी झेंडे ,जय हिंद चे फेसबुक स्टेटस आणि हो ..आजकालचे मनापेक्षा वेगाने पुढे जाणारे व्हाट्सएप मेसेजेस यात वाढ व्हायला लागते .हा दिवस फादर मदर आणि रोज या सारखाच एकदिवसाचा बनतोय असं मला नक्की वाटतंय.

आता हेच पहा ना हा लेख मी कदाचित जुलै महिन्यात सुद्धा लिहिला असता पण मला बरोबर 15 ऑगस्ट च्या तोंडावर सुचतोय म्हणजे मी सुदधा फार काही वेगळा नाही ,
पण देशभक्ती किंवा एकूण भक्ती या गोष्टीवरच चिंतन करावं असं मला वाटतंय म्हणून हे सगळं मनातलं मांडण्याचा खटाटोप .

मी माझ्या मुलाला जागृती सिनेमाचं आओ बच्चे गाणं दाखवतं होतो त्यावेळी त्याने मला विचारलं बाबा हे बलिदान म्हणजे काय असतं??
लहान वयात बलिदान वगैरे समजणं त्याला कठीण आहे मला कळत होतं ,पण मग त्यावरून मला लक्षात आलं की सध्या आपण एकूणच समाजाभिमुख भूमिकेकडून वयक्तिक दृष्टिकोन ठेवत आहोत .
 वयक्तिक दृष्टिकोन इतका जवळचा झालाय की माझा फोन ,माझा प्रोग्रॅम, माझा वेळ, माझी प्रायव्हसी अगदी माणसाचे गोल सुद्धा पर्सनल गोल्स बनत आहेत.
 आता इतकं जर वयक्तिक आपण आपल्या रोजच्या आयुष्यात बनत आहोत तर देशभक्ती सारखी अत्युच्च आणि समजायला कठीण अशी भावना मनात तयार होणे नक्कीच कठीण आह.
यात लोकांची किती चूक आहे हे मला सांगायचं नाही पण हेच कदाचित हळू हळू सर्व स्तरांवर होणाऱ्या बोथट भावनांचं कारण आहे असं मला वाटतं आहे

पहिल्यांदा येते शेअरिंग मग येते सामावून घेणे ते कळते तेव्हा त्याग समजायला लागतो व या सगळ्या गोष्टी जेव्हा एकदम रुजतात त्यावेळी खरी देशभक्ती ची भावना रुजायला लागते

देहभक्ती व वयक्तिक सुख व समाधान या सर्वात महत्वाचा वाटणारा विचार देशभक्ती कशी घडवून आणू शकतो कदाचित आणणे कठीण आहे .

आजकालची असणारी पोकळ आरक्षणे व समाज निदर्शने यात सुदधा फक्त वयक्तिक स्वार्थ यापेक्षा कुठलाही विचार समोर येतो आहे असं मला जाणवत नाही.

परदेशी कापडाची होळी व चरखा आणि खादी वापरण्याचा विचार असेल किंवा स्वतःच्या देशाच्या शिक्षण संस्था असाव्यात असा टिळकांचा व्यापक विचार असेल यात प्रत्येक ठिकाणी त्याग व सामावून घेण्याची भावना दिसून येते ती नक्कीच कमी झाली आहे.

समाज प्रगत होतो आहे . स्त्री जास्त स्वतंत्र होते आहे वेगवेगळ्या विचारामधले स्वातंत्र्य हे नक्कीच दिसून येते आहे .
पण भारत स्वतंत्र जरी होत असेल तर आपण स्वतः किती देशभक्त होत आहोत हे आपण अगदी आपल्या सार्वजनिक मालमत्तेच्या वापर असो की त्याचे होणारे नुकसान असो याच्या विषयी असणाऱ्या आस्थेवरून  आपल्याला पडताळून पाहणे गरजेचे आहे.

आता ही देशभक्ती ही केवळ शाहिद होणाऱ्या लोकांना अभिवादन करून वाढणार आहे का ? का आपण फक्त स्वदेशीचा वापर करून बळावणार आहे तर असं मला नक्कीच वाटतं नाही.

देशभक्ती ही फक्त सांडणारं रक्त आणि ऑलम्पिक मधल्या वाढणाऱ्या मेडल नी वाढत नसते .
आपण देशासाठी वाचवलेलं पेट्रोल, एखादं लावलेलं आणि वाढवलेल झाडं , सार्वजनिक मालमत्तेची जपणूक , वाचवलेलं एक ग्लास पाणी यातून सुध्दा ती तितकीच सार्थ बनू शकते .

आर्थिक दृष्ट्या दुर्बल असताना किंवा गुलामगिरीतला देश मेहनतीने व प्रतिकाराने आपली प्रगती करणे हे कदाचित न्यूटन च्या नियमात बसेल,
 पण जेव्हा आपला स्वयंपूर्ण होणारा व आर्थिक स्तर उंचावणारा समाज जेव्हा orbit shifting करून झेपावत असेल तर नियम वेगळ्या दृष्टीने पहाणे तितकेच महत्वाचे ठरेल असे मला सांगावे वाटते.

त्यामुळे या १५ ऑगस्टला ए मेरे वतन के लोगो ऐकून शाहिद लोकांचे स्मरण जरूर करू या पण आपल्या प्रत्येकाने देहभक्ती कडून थोडे तरी वेगळ्या पद्धतीने देशभक्त बनायला सुरवात करू या ...

जय हिंद

भारतीय स्वातंत्र्यादिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जयदीप भोगले
१५ ऑगस्ट २०१८

Wednesday, August 8, 2018

गटारी

गटामध्ये येऊन सारी
घेऊन  येती आज दारी
करती अवस ती साजरी
म्हणे गटारी ती

सौजन्य नसो की सोयरीक
पाणी असो वा की "नीट"
आज होती सगळे धीट
डोळे वटारी ...ती

कोंबडीस एक मासाचे अभय
मोडून रोजची ती सवय
दाढी वाढवायची ती सोय
वाटे विषारी  ती

आला वीकेंड तो जवळ
मित्र घालती हो शीळ
पटियाला भरून चंगळ
करतात गटारी ती

तळीरामच्या दुनियेत....
जयदीप (सुधाकर) भोगले
७ ऑगस्ट २०१८

😊😊😊

Sunday, August 5, 2018

मैत्री

मैत्री म्हणजेच एक कविता असते
वात्रटिका असो की भावगीत
दोन्ही जागी एकदम परिपूर्ण असते
फ्रेंडशिप डे च्या आठवणींची मुलाहिजा ती कधी बाळगत नाही
पण  या दिवशी खळखळून हसायला तिची कधीच ना नसते
भूतकाळ असो की वर्तमानकाळ कायम ती चिरतरुणच राहते
LIC  चं माहीत नाही पण ही जिंदगी के साथ और जिंदगी के बाद जरूर राहते

जयदीप भोगले
5 ऑगस्ट 2018

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...