Sunday, February 17, 2019

ध्यासपर्वाची विलक्षण अनुभूती -आनंदी गोपाळ



निर्मिती -फ्रेश लाईम फिल्म्स, झी स्टुडिओज
दिग्दर्शक- समीर विद्वंस
कलाकार - ललित प्रभाकर ,अंकिता गोस्वामी आणि भाग्यश्री मिलिंद आणि गीतांजली कुलकर्णी
संवाद -इरावती कर्णिक
गीते- वैभव जोशी संगीत -हृषीकेश दातार जसराज जोशी

प्रत्येकाने पहावा व दुसऱ्यांना दाखवावा असा

डॉ आंनदी बाई जोशी पहिल्या महिला डॉक्टर असं हुशार मुले ,सामान्य ज्ञान असणारी जिद्यांसू मुले , यांना हे नाव कदाचित परिचित असेलच..

पण एखादं नाव नावारूपाला येण्याआधी त्यामागचा संघर्ष ,तिच्या आयुष्यातील खडतर प्रवास, प्रतिकूल परिस्थिती असून त्यावर केलेली मात आणि ही ज्ञानगंगा चित्रलोकी आणण्याचं काम करणारा भगीरथ म्हणजे गोपाळराव जोशी  ( आनंदी बाईंचे पती ) या सर्वाचं सिंहावलोकन करून 2 तास 14 मिनिटात त्याचा एक बायोपिक पाहुन जेव्हा नतमस्तक व्हाव वाटतं  ती कलाकृती म्हणजे "आनंदी गोपाळ "
प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे असणाऱ्या अगणित माता पत्नी शिक्षक यांची मोठी यादी आपल्याकडे नक्कीच असते पण  150 वर्षांपूर्वी आपण शिकू शकतो हे मनाला शिवत सुद्धा नाही अशा स्त्री ला आपल्या काहीशा जिद्दी हेकेखोर टोकाच्या आणि तऱ्हेवाईक दृष्टीकोन ठेवुन डॉक्टर बनवणारे वल्ली भगीरथ म्हणजे गोपाळराव जोशी .  या जोडप्याच्या ध्यासाची आणि त्यांच्या प्रवासाची अत्यंत प्रभावशाली गोष्ट म्हणजे चित्रपट ..आंनदी गोपाळ

... चित्रपट म्हणून एक उत्कृष्ट कथा, त्यामागची भूमिका जाणून केलेलं जाणतं दिग्दर्शन ,ते घडताना तोच दृष्टीकोन दाखवणारं  डोळस छायाचित्रण, या छायाचित्रणाला 150 वर्षापूर्वी घेऊन जाणारे अत्यंत प्रभावी असे कला दिग्दर्शन आणि वेशभूषा, या सर्व गोष्टीला साजेसे हृदया व मनाला हलवणारे संवादलेखन व गीतलेखन
व या पंचमहाभूतातून बनलेले व्यक्तिचित्र आणि त्या भूमिका जगणारे ललित प्रभाकर ,भाग्यश्री मिलिंद, गौरी कुलकर्णी
या मुळे अतिशय उत्कृष्ट चित्रनिर्मिती  म्हणजे… आनंदी गोपाळ

उंच माझा झोका सारखी सारखी उत्कृष्ट मालिका सासू सून झंझावात असताना सुद्धा झी मराठीने प्रवाहाविरुद्ध निर्माण केली आणि त्याच सोनं केलं या झी समूहाने या विषयाला भक्कम निर्मिती साथदिली हेंसुद्धा त्यांनी गोपाळराव जोशी यांच्या प्रयत्नांना साथ दिल्यासारखं आहे असं मला इथं म्हणावं वाटतं

हा सिनेमा हा फक्त त्या काळाचं दर्शन व जाणीव किंवा डॉ आनंदीबाई जोशी  यांना वंदन करून थांबणारा नक्कीच नाही तर अजूनही प्रत्येक पुरुषाला महिलांना समान संधीच्या वाटा निर्माण करून देण्याची गरज आहे हे सांगणारा सुदधा आहे.
अजून सुद्धा आपली संस्कृती “पंचकन्या स्मरे नित्यम” म्हणणारी जरी असली तरी काचेचं छप्पर देऊन तिला रोखणारी सुद्धा तितकीच आहे हे सगळ्या पुरुषांना कळत नकळत माहीत असेलचं..
कदाचित म्हणूनच चित्रपताशेवटी असणाऱ्या काही वेधक छायाचित्रात अजूनही पहिली महाराष्ट्राची मुख्यमंत्री स्त्री नाही हे कुठतरी जाणवून जातेच..
पण हा सिनेमा पाहून आल्यावर उद्या जर आपल्या घरातील स्त्री ची कुठलीही महत्वाची मीटिंग काम असेल तर तिचा डबा जरी घरच्या पुरुषाने भरून दिला तर चित्रपट निर्मितीचा सर्व खर्च कारणी लागला असं निर्मात्यांना  म्हणावं लागेल..

हे सर्व वाचल्यावर आणि आनंदी गोपाळ सिनेमागृहात पाहिल्यावर कदाचित तुमच्या मधला सकारात्मक गोपाळ जागा होईल व तुमच्या जवळच्या आनंदीला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देईल ही ईश्वर चरणी प्रार्थना...

जयदीप भोगले
17 फेब्रुवारी 2019

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...