लोकशाहीच्या मनमानीत
आरक्षणाच्या चढाओढीत
राजकारणाच्या मारामारीत
जणू सहनशक्तीचे बाप झालो
आज म्हणे आम्ही प्रजासत्ताक झालो

बाबासाहेबांना फोटोत बसवलं
रामाला कुंपणात अडकवलं
माणुसकीला वेशीला टांगलं
रावणाला घाबरून जणू कुंभाकर्णाचे दास झालो
आज म्हणे आम्ही प्रजासत्ताक झालो
झाडांना बोन्साय बनवलं
सिमेंटच जंगल वसवलं
धुराचं नवीन आकाश उधळलं
प्रतिस्वर्गाचे विश्वामित्र समजून भस्मासुराचे खास झालो
आज म्हणे आम्ही प्रजासत्ताक झालो
आशेचा किरण शोधतो आम्ही
मेणबत्त्या ने निषेध नोंदवतो आम्ही
मंदिराच्या वाऱ्यामध्ये आशीर्वाद विकतो आम्ही
स्वार्थाच्या हिशोबात फक्त भोगी ययाती झालो
आज म्हणे आम्ही प्रजासत्ताक झालो
जयदीप भोगले
25 जानेवारी 2017
No comments:
Post a Comment