Sunday, July 16, 2017

फ्लॉवर्स आणि कॉलीफ्लॉवर


कॉलेज च्या गेटटूगेदर ला आल्या होत्या मुली
काही होत्या कधी फ्लॉवर आणि काही तर एकदम हॉट चिली
कुणी होतं चवळीची शेंग तर कोणी होती डेलिया
एक होती जाईसम तर कोण सोनचाफ्यागत सोनिया
पण आजचे सत्य गमतीचे होते
जुई झालीे कमळ आणि राज्य ढोभळी मिरचीचे होते
फ्लॉवर चा झाला होता कॉलिफ्लॉवर आणि अँकरिंग दुधी भोपळ्याचे होते
मग मी हळूच कॉलेजचा आरसा बघितला
माझा झालेला लाल आणि शेजारच्याचा चक्की भोपळा बघितला
सगळ्या आमच्या मैत्रिणी पण वजनात फक्त फरक होता
आता कोणी होते डॉक्टर तर कुणाला बिजनेस चा जाम उरक होता
मग मला कळाले भाज्यांची नावे जरी निराळी तरी सत्व एकदम झकास होते
मुलं झाली होती भोपळे पण त्यांच्या डोक्यात अजून सुद्धा बटाटेच होते
जयदीप भोगले
31 मे 2017

😀😀😀



Saturday, July 15, 2017

सॉफ्टी...


कालची एक गोष्ट सांगतो मी नेरुळ इथे गुप्ता भेळ या दुकानात पाणीपुरी खात होतो.
ताई आणि बायको बरोबर होत्या
गुप्ता भेळ शेजारी जम्बो वडापाव चे सुद्धा दुकान आहे। आम्ही सँडविच सुद्धा मागवले ..ते खात असताना एक फुगेवाला आला ..लहान मुलगा... 10 -11 वर्षाचा असेल । मला म्हणाला फुगा घ्या ...मी नाही म्हणल..ं मग म्हणाला फुगा घेऊ नका पण मला एक आईस्क्रीम चा कोन घेऊन द्या ना?? ।मी त्याला 15 रुपयाची सॉफटी घेऊन दिली । त्याला आनंदाने softee खाताना पाहून मला खूप बरे वाटले ।
मला माहित नाही मी भीक दिली का त्याला आनंद दिला । पण हरवलेल्या लहानपणा मध्ये शहराच्या सुखवस्तू जगात असे कित्येक जण मन मारत जगत असतील असं मला वाटून गेलं ।
मी महान किंवा कर्ण वगैरे नाही पण कदाचित गल्लीत राहताना मी गरिबी जवळून पाहिली म्हणून ती कणव मला जास्त प्रखरतेने येऊ शकली ।आमच्या गल्लीत अशी कित्येक मुस्लिम मुले पापड विकायची ।मी फटाके उडवताना त्यांच्या मला पाहतानाच्या आशाळभूत नजरा मला अजूनसुद्धा आठवतात
ह्या क्षणिक वैराग्यातून बाहेर येऊन मी माझ्या कारची काच वर केली आणि माझ्यातल्या घोड्याला झापड लावली...

जयदीप भोगले

Friday, July 14, 2017

योगा डे


नुसत्या श्रद्धेच्या साथीने कपालभाती होत नाही
Reebok घेऊन महागडा... खेळाडु कधी जन्मत नाही
कधी तरी घड्याळाचा गजर सकाळी स्वतःहून बंद करावा लागतो
सूर्योदय डोळे किलकिले करून नाही तर बाहेर जाऊन पहावा लागतो
आस्था चॅनल च्या आस्थने शरीर लवचिक जर बनले असते
सगळे यांचे दर्शक उसेन बोल्ट पेक्षा जोरात पळाले असते
योगा डे हा दिवस नव्हे तर जगण्याची रीत असावी
रामदेव बाबा कंपनीचा दुधी ज्युस पिण्यापेक्षा बागेच्या ओल्या मातीवर प्रीत असावी
मी सुद्धा कागदावर लिहिलेले कृतीत आणावं म्हणतोय
योगा डे च्या निमित्तानं रोज प्राणायाम नियमित सुरू करतोय


जयदीप भोगले
21 जून 2017
9 वाजता

अर्बन जंगल


प्राण्यांची करून रवानगी अभयारण्यात
आले सगळे तरस शहरी जंगलात
म्हणाले हे जंगलांपेक्षा बरं वाटतंय
इथलं माणूस आपल्यासारखं पशु वाटतंय
उगाच तरस म्हणून जंगलातली उपेक्षा कशाला
इथं कशी सामान्य माणसाची हाडकं उशाला
हां आहेत म्हणा इथं काही तरसांची टोळकी
काहीतरी आहेत आपल्या पेक्षा सुदधा खूप बेरकी
उगाच सिंह आणि वाघ जंगलांचे राजे कशाला
इथं कशी सामान्य माणसाची हाडकं उशाला
शहरी जंगलात तरस आणी गिधाडे यांची पक्की दोस्ती
आपण करू हाडके फस्त गिधाडे माणसांचे लचके तोडती
तुमचा बुवा आपल्यावर इतका राग कशाला
इथं मी थोडी टाकली तुमच्या माणसाची हाडकं उशाला
जयदीप भोगले
7 जुलै 2017
9.00 वाजता

Friday, June 23, 2017

जुमेरात ची इफ्तारी .... सुखन











दर रमजान मध्ये काही मुंबईकर खास वेळ काढून मोहमद अली रोड ला जातात आणि मालपुआ कबाब यावर मनसोक्त ताव मारतात.काही जण खास दिल्ली आग्रा फतेहपुर सिक्री आणि “शहर ए तहजीब” लखनऊ ला भटकतात या सगळ्या जागी एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे मुगल मुगलाई आणि त्या  काळापासून वाढलेली एक मधुर अशी भाषा उर्दू !!!
काही जणांना आजकाल उर्दू म्हणजे बंदुकीच्या गोळ्यांचा आवाजाची भाषा आहे असा गैरसमज आहे
तर काहीजण “फ्रेंच माझी सेकंड लँग्वेज आहे” असे म्हणून त्यांना सगळ्या  आपल्या भाषा घरकी मुर्गी आहेत
म्हणूनच का काय ही उर्दू एकदम मोडी जवळ जाऊन बसली आहे . मोडीत काढणे म्हणजे काय याचा अर्थ मला हळू हळू समजू लागलाय
१९७० १९८० मध्ये उर्दू आपल्या काही सिनेमातून जिवंत राहिली . साहिर साहेब व मजरूह साहेब यांनी तिला थोडे गुणगुणत ठेवले. १९८० नंतर जगजीत सिंग व पंकज उधास यांनी गजल मधून ही आम करून दिवाने खास मध्ये तरी खिळवून ठेवली. पण आता उर्दू आजकालच्या ओढून ताणून बनवलेल्या संवादात धडपडत असते . इर्शाद व मुकर्रर याचे “ शॉर्ट फॉर्म” नसल्यामुळे whatsaap मधून सुद्धा तिची हकालपट्टी होते
या अशा इतक्या मधूर व खुसरो ने “ अमीर “ केलेल्या उर्दू ला वाचवायला “ सेव्ह टायगर “ असा उपक्रम  सुद्धा करता येत नाही त्यामुळे संस्कृत मोडी उर्दू या ... आपल्या पूर्वजांच्या फोटो प्रमाणे धूळ खात पडतात. आपण वर्षामधून त्यांचे पितारांसारखे दिवस सुद्धा घालतो म्हणा !!!


तर अशी ही उर्दू एखादि  मराठमोळी  मंडळी आपल्या समोर आणतात असा म्हणालो तर तुम्ही मला कदाचित वेड्यात काढू शकाल पण या अशा औलिया लोकांचा लौकिक प्रयत्न म्हणजे “ सुखन”
हा काल मी ठाण्यात गडकरी रंगायतन ला पाहिला . बुक माय शो मधून परीक्षण वाचून गेलो होतो तरीही तिथला अनुभव म्हणजे पावसाची कविता वाचणे आणि पावसात भिजणे यात काय फरक असतो  इतका सुंदर व जिवंत होता
सुखन मधले प्रत्येक कलाकार अगदी (सारंगी व हार्मोनियम सहित)  म्हणजे  गजल बनवण्यासाठी लागणाऱ्या शायरी मध्ये जसे  रदीफ काफिया वजन असं काहीतरी लागतं म्हणतात व त्याच्या हव्या तितक्या प्रमाणात असण्यानेच एक आविष्कार घडतो तसे आहेत .
 मग मखमली आवाजाची अवंती पटेल असो कि सुफी अंदाज असणारा जयदीप वैद्य.प्रत्येक कलाकार आपल्याला वेगळ्या विश्वात घेऊन जातात. या कार्यक्रमाचे दोन कलाकार म्हणजे शरीर आणि आत्मा असल्यागत आहेत ते म्हणजे ओम भूतकर आणि नचिकेत . पुणेरी श्रीखंड खाऊन इतक्या उच्च प्रतीची उर्दू कोणी बोलू शकतो  याची देही याची डोळा प्रचीती घायची असेल तर ही कलानिर्मिती पाहणे एकदम Must!! आहे
जसं गर्द हिरवळीची मजा घेत  आपल्या धुंदीत जगण्यासाठी स्वतः वनस्पत्तीशास्त्रज्ञ असण्याची गरज नसते तसच “सुखन” पाहताना उर्दू यावीच अशी नक्कीच अट नाही व गरज तर नक्कीच नाही
इरूवर सिनेमामध्ये मला ऐश्वर्या राय ची तमिळ “ न समजता” जितकी गोड वाटली तितकीच प्रत्येक गजल व कव्वाली (उर्दू फार जास्त  न समजता ) मला तितकीच हविहवीशी वाटली.
हे या कार्यक्रमाचे परीक्षण म्हणून मी नक्कीच लिहिलेले नाही .  काही लोक या जगात किती चाकोरीबाहेर जाऊ शकतात  त्यांना किमान पहावं ,त्यांचे कौतुक करावं व त्यातून एक निखळ आनंद मिळवावा, व जमलं तर त्यांच्यासारखं आपणही कधी वेडे व्हावं  म्हणून लिहिलं आहे
उर्दू म्हंटल कि गालिब, मीर, मोमीन इतकच काही जणांना आठवत पण यांच्या खजिन्यात अशी असंख्य रत्न आहेत  तर आज म्हणे ते दिनानाथ मंगेशकर पार्ल्यात सुखन घेऊन येतायत ... तर तुम्ही अवश्य जा खुल जा सिमसीम म्हणा !!! आणि जमल नाहीच तर हे सुखनवर मुंबई व पुण्यात असेच येत राहो अशी सदिच्छा तर नक्कीच असू देत
है और भी दुनिया मे सुखनवर बहुत अच्छे
कहते है के “ ओम भूतकर” का अंदाजे बयान और

जयदीप भोगले

Wednesday, March 29, 2017

जाऊ द्या ना बाळासाहेब


जाऊ द्या ना बाळासाहेब आता तुम्ही सैराट व्हा
होतो तेंडुलकर आउट कधीकधी तरी आयुष्याचा किल्ला व्हा
साडे माडे तीन म्हणून दे धक्का प्रयत्नाचा
हाय काय आणी नाय काय असं म्हणून लै भारी व्हा
कट्यार काळजात घुसलीे तरी बेलवलकर नटसम्राटच राहतो
व्हेंटिलेटर वर जरी ठेवलं तरी जगासाठी झकास व्हा
जाऊ द्या ना बाळासाहेब तुम्ही सैराट व्हा
गुलदस्त्यात असले जरी बरेच काही
आयुष्याचा टाईमपास होत नसतो
काकस्पर्श झाला तरी लोकमान्य एक युगपुरुषच राहतो
माउली चा जझबा घेऊन आता तुम्ही रुस्तम व्हा
जाऊ द्या ना बाळासाहेब आता तुम्ही सैराट व्हा
जयदीप भोगले
२८ मार्च २०१७

स्त्री


स्त्री कधी गोड भाषा ...कधी जीवनाची आशा
कधी ताराबाईच्या तरवारी ची धार
कधी सावित्रीबाईंच्या शिक्षणाचं सार
कधी आंनदी बाई जोशींची सुश्रुषा
कधी शांता शेळक्यांच्या लेखणीची मनीषा
कधी लता दिदींचा स्वर्गीय स्वर
कधी माधुरीच्या अलवार हास्याची जर
कधी बनून मेधाताईंची नर्मदा परिक्रमा
कधी करून वीणाताईंसम वर्ल्ड ची पादाक्रांत सीमा
जणू तुळजाभवानीचा विजयी आशीर्वाद
गोदावरीच्या धारेची अखंड वाट
विविध रूपे तुझी विविध नावे तुझी
शब्दांची सुमने अर्पून स्मरतो सदैव महती तुझी

जयदीप भोगले
८ मार्च २०१७

बिनडोक


संघर्ष कशाचा कुणासाठी कशाला???
का बनावं आम्ही आता जळू असंच फक्त जगायला ?
वाघांची संख्या रोडावली म्हणे या जगात 
तरसांचे कळप एकत्र येतीं शिकार करायला
इकडे आड तिकडे विहिर या म्हणीचाच अर्थ सगळे सांगती
कुणाला कळेल का मला शिकायचंय समुद्रात पोहायला
मांडलिक आत्ता पालखीत मिरावती
राजाचं घोडं जातंय आता नेहमीच पेंड खायला
रहस्य कळेल का मला बिंडोकंपणाचं
मी सुद्धा शिकवणी लावू म्हणतोय बिनडोक बनायला


जयदीप भोगले
25 मार्च 2017

डायटींग फायटिंग


डाएट च्या जगात सगळं कसं अजब असतं
जिलेबी असते शत्रू आणी तूप म्हणे जहर असतं

जीभ आणी पोट याचे ते शीतयुद्ध असतं
ती जिंको कि ते आपल दोन्हीकडे मरण असतं

एकीला चवीचं प्रेम तर एकाला कॅलरीच वावडं असत
ही म्हणते लोणचं छान तर याचं फायबर बरोबर लफडं असत

वेळेवर जेवा असं पोटाचं भाषण कडवं असतं
ही मात्र खोडसर ,म्हणते अंबावडीचे आणि वेळेचं सदा वाकडं असतं

हिचं ऐकू कि त्याचं हे माझं नेहमीच कोडं असतं
म्हणूनच वर्षात एकदा जी एम डायट ला माझं मनोभावे साकडं असतं

बाकी वर्षभर मात्र माझं जिभेवर प्रेम एकदम खरं आणी भाबडं असतं

जयदीप भोगले 6 फेब्रुवारी 2017

थोडं लाईट व्हा

थोडं लाईट व्हा आणि काईट व्हा 

दुःख मागे टाकून थोडसं तुम्हीें ब्राईट व्हा।

येतो कधी काळोख सामोरा... हळूच तुम्ही व्हाइट व्हा।

दिवसाने जर घेतली परीक्षा रिलॅक्स अशी नाईट व्हा।

जगात आहेत दृष्टिहीन बरेच... तुम्ही हळूच त्यांची साईट व्हा।


थोडं लाईट व्हा आणि काईट व्हा....


जयदीप भोगले
१३ फेब २०१७

उबर परी

माझ्या मित्राला एकदा अमेरिकेत उबेर मध्ये एक सुंदर महिला ड्रायव्हर म्हणून आली म्हणे ... तो म्हणाला मी असतो तिथे तर नक्कीच एक कविता केली असती ... म्हणून हा एक केला छोटा प्रयत्न.


एक कोमल आणि अलवार ही कथा
माझी सारथी झाली आज जणू मेनका
वेग कसा सुगंधी तो जाहला
रस्त्याची जणू होई आज वाटिका
प्रवास हा सुरेल का भासे मज कळेना
आह जरीे निरव आणि स्वच्छदं ती शांतता
डोळ्यांचे डोह डोकावती हळूच ते
क्षणिक ते चंचल पण गूढ असे आर्तता
वळण ते आले आणि अनुभव तो संपला
वास्तवात येऊनी करितो संसार हा नेटका

जयदीप भोगले
१६ फेब २०१७

बाल बाल देखो




केसांची केस कशी हाताबाहेर गेली
जरी आम्ही लावले पॅराशूट डेली

कुणी म्हणाले हा तर स्ट्रेस चा परिणाम 
 काहिनीं सांगितले हेरीडीटी स्ट्रॉंग आहे जाम

नाव्ह्याने सुद्धा हजामत बिनपाणी केली
जरी आम्ही लावले पॅराशूट डेली

Gel आणि कंगवे शत्रू जणू जाहले
रिचफिल आणी बत्रा उगा सलगी करू पाही

जुन्या मैत्रिणीच्या भेटीला टोपी सुद्धा नेली
जरी आम्ही लावले पॅराशूट डेली

मग म्हणलो मी ...जाऊ द्या ना राव
केस नसले तरी मला व्यक्ती म्हणून भाव

'बाल' भले गेले आणि 'असली 'पर्सनॅलिटी घावली
खुशाल आम्ही लावतो पॅराशूट डेली

Thursday, January 26, 2017

कस्तुरीमृग

डोळ्यांच्या दुनियेत हरवलाय कधी।
 स्वप्नाच्या गावात राहिलाय कधी।
 रातराणी चा सुगंध दरवळतोय नजीकच।
पण त्याचा माग काढलाय कधी।
शुक्राची चांदणी शोधलीय कधी।
 वाऱ्याला सारथी केलय कधी ।
वाट कुणाची पाहता पाहता रात्र अशी जागलीय कधी
क्षणाचं आयुष्य अनुभवलंय कधी।
 कस्तुरीमृग बनून बहाकलात कधी।
 एक होकाराच्या आशेमधून कविता अशी लिहलीय कधी ?

जयदीप भोगले। विक्रोळी ते पवई ऑटो 😂5 jan 2017

नकाराचं गणित

नकाराचं गणित नेहमी वजाबाकीच करतं
भेटीची बेरीज नेहमी बाजूलाच ठेवतं।
 चोरून पाहून कधी मनातलं समजत नाही।
 मनातल्या मनात पोहता कधी येतं ?।
बुडायच्या भीतीने ते किनाऱ्यावरच मरतं
किती सांगू किती नाही म्हणून पत्र ते लिहतं ।
पत्ता न सांगता आपल्या वाहितचं ठेवंत।
शाईचे पेन होतं दौतीविना रितं ।
 देवाच्या चरणी ते आशेनं जातं ।
कधी होईल कृपा म्हणून एकटक पाहतं।
आस्तिक म्हणून ते हळूच अगतिक होतं
आणि नकाराचं गणित नेहमी वजाबाकीच करतं
मग एकदिवशी ते मनाशी ठरवतं ।
 मन आणि कृतिचा गुणाकार करतं
एका दमात सगळं बोलूनच टाकतं ।
आणि मग ती म्हणते हसून  खरंच ...
. सुरवंटाच फुलपाखरू कोष फाडूनचं होतं  

जयदीप भोगले
30 डीसेम्बर 2017

ती सध्या काय करते ??




ती सध्या काय करते आजकाल प्रत्येक जण विचारते
कधी वॊटसॅप च्या गर्दीत तर कधी मित्रांच्या वर्दीत प्रत्येकाला तिची नसती पंचायत असते

तिचं लग्न झालं का रे?  इतक्यातच  फिसकलं का रे ?
पोलीसापेक्षा यांचीच जासुसगिरी फार असते
'

'ती' चा पगार किती? 'ती'ला मुलं नाहीत कशी ?
तिच्या हातावरच्या रेषांना सुदधा यांच्यापेक्षा कमी माहिती असते

कधी 'ती' ला सुद्धा विचारा  खरी कहाणी काय असते
 तुमच्या कल्पनेच्या भाकितात जगण्यापेक्षा तिच्या सत्यात काय घडत असते

विस्फारलेल्या नजरेपेक्षा तिला मैत्रीची हाक हवी असते
प्रत्येकवेळी वाचवायला कृष्ण नको पण  माणसांची दुनिया नक्कीच  हवी  असते
'ती' च्या पेक्षा तिला 'तू' बनणं जास्त पसंत असते

जयदीप भोगले
12 जानेवारी 2017

आज म्हणे आम्ही प्रजासत्ताक झालो





लोकशाहीच्या मनमानीत
आरक्षणाच्या चढाओढीत
राजकारणाच्या मारामारीत
जणू सहनशक्तीचे बाप झालो
आज म्हणे आम्ही प्रजासत्ताक झालो


बाबासाहेबांना फोटोत बसवलं
रामाला कुंपणात अडकवलं
माणुसकीला वेशीला टांगलं
रावणाला घाबरून जणू कुंभाकर्णाचे दास झालो
आज म्हणे आम्ही प्रजासत्ताक झालो


झाडांना बोन्साय बनवलं
 सिमेंटच जंगल वसवलं
धुराचं नवीन आकाश उधळलं
प्रतिस्वर्गाचे विश्वामित्र समजून भस्मासुराचे खास झालो
आज म्हणे आम्ही प्रजासत्ताक झालो

आशेचा किरण शोधतो आम्ही
मेणबत्त्या ने निषेध नोंदवतो आम्ही
मंदिराच्या वाऱ्यामध्ये आशीर्वाद विकतो आम्ही
स्वार्थाच्या हिशोबात फक्त भोगी ययाती झालो
आज म्हणे आम्ही प्रजासत्ताक झालो

जयदीप भोगले
25 जानेवारी 2017

Wednesday, October 12, 2016

दिल मराठी धडकन मराठी – झी मराठी अवार्ड्स


सर्वांना सर्वप्रथम विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
विजय म्हणजे बक्षीस मिळणे , मन जिंकणे , मान मिळणे , विजयी पताका आणि विजयी जल्लोष हे सगळ आपसुख येतच .आणि जिंकण्याची गोष्ट, जर  रसिकांची मने जिंकल्यामुळे कुठे तरी रसिकांनी दिलेली प्रेमाची पावती आणि प्रेमाचे बक्षीस म्हणजे झी मराठी अवार्ड्स ...
दरवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा झी मराठी अवार्ड्स २३ ऑक्टोबर ला  रसिकांच्या भेटीला येणार आहे असे प्रोमोवरून समजले .
पण यावर्षीचा जल्लोष काय वेगळा असेल काय धमाल असेल याची उत्कंठा सगळ्याच लोकांना असते तशी मला सुद्धा तितकच लागून राहिली आहे

एक वाहिनीचा प्रामाणिक दर्शक म्हणून मला यावर्षी झी मराठी मध्ये काही विशेष जाणवते ते म्हणजे  मालिकांचे वैविध्य, विषयांची  व्याप्ती , विषय कौटुंबिक असूनही प्रत्येक कृतीची हटके  मांडणी , मालिकांची भव्यता दिपवून सुद्धा मराठी साधेपणाला जपणारी हाताळणी .
आणि म्हणूनच संध्याकाळी सहा पासून रात्री १२ वाजेपर्यंत प्रत्येक दर्शकाला आवडले ,रुचेल , असे कार्यक्रम होम मिनिस्टर पासून ते  रात्रीस खेळ चाले पर्यंत झी मराठी घेऊन येते आणि प्रत्येक दर्शक आपल्या हृदयातल्या एका कप्यात झी मराठीचा अनुभव जपत असते .

मराठी भाषाप्रकार आणि बोली भाषा यांची गोडी वेगवेगळी असूनही प्रत्येकाची गोडी तितकीच हवीहवीशी वाटणारी  आहे याचा अनुभव मला फक्त झी मराठीवर पाहायला मिळतो. मग नागपुरी बोलीमधील माझ्या नव-याची बायको असो की कोकणातील रात्रीस खेळ चाले असो. प्रत्येक दर्शकाला जोडणारी मालिका बनवणे हा फक्त प्रसिद्धीचा भाग असू शकत नाही तर  यात प्रत्येक मराठी मनाला समजून घेण्याची मानसिकता आहे असे जाणवते.

जगामध्ये प्रत्येक “brand” तेव्हाच मोठा होतो जेव्हा त्याचे लोकांशी भावनिक नाते बनले जाते.म्हणूनच झी मराठी ही एक वाहिनी न राहता आता त्याचा एक “ brand” झाला आहे असे मला एक मार्केटिंग चा माणूस म्हणून जाणवते .
आता या अशा कार्यक्रमाचे मालिकांचे अवार्ड्स जेव्हा असतील त्यावेळी मला बक्षीस कुणाला मिळेल यापेक्षा प्रत्येक कलाकाराचे केलेले कौतुक जास्त महत्वाचे वाटते . झी मराठी मधले कार्यक्रम म्हणजे मला टीम इंडिया ची तेंडुलकरच्या काळची क्रिकेट टीम वाटते . मग तेंडूलकर सारखे फटकेबाजी करणारी “हवा येऊ द्या” असो की सावधपणे संथ गतीने द्रविडसारखी माझ्या नव-याची बायको असो . प्रत्येक कार्यक्रम वाहिनीला उंचीवर नेतो . तेंडूलकर मोठा म्हणून द्रविड नको असे म्हणता येत नाही .


बर जाऊ दे मी लई सिरीअस  बोललो . 
मला काहे दिया परदेस जाम आवडते .. “शिव” आवडणाऱ्या कित्येक मुली मला माहिती आहेत आणि गौरी ला बघून “ आयला अशी कुणीतरी मिळाली पाहिजे “ अशी स्वप्नाळू पोरही .

रात्रीस खेळ चाले याची मालवणी भाषा कशी चुकीची !!! अशी खास पुणेरी चर्चा मी ऐकली आहे .

चला हवा येऊ द्या चा जिलेट- सलून झालय रे.... अशी टीका करून सैराट चा एपिसोड काय भारी झाला “ आईच्या गावात” असे म्हणणारे मित्रांचे वोटसप वाचले आहेत

आणि जय मल्हार आता फार खेचली असे म्हणून “ काल सातला लाईट गेलेले म्हणून मी अकरा वाजता रिपीट पहिला” असा म्हणणा-या  माझ्या मावशीचा फोनही ऐकला आहे .

अशा या मालिकांचा कौतुक सोहळा त्यात विनोदी नाटक नाच आणि मस्त निवेदन याची फोडणी म्हणजे ३ तासात झी मराठीचे आठ तास पाहिल्यासारखे आहे ... विजेची बचत आणि वेळेचीही ...


फक्त या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाच्या दिवशी  पुरुषांनी घ्यायची काळजी
 पुरुषांनी रिमोट लपवून ठेवू नये ...( सीमावादापेक्षा मोठा गदारोळ होऊ शकतो)

कामवाल्या बाईला सुट्टी स्वताहून देणे किंवा संध्याकाळी बाहेरून काहीतरी मागवणे . पाककुशल पुरुषांनी आधीच स्वयपाक केल्यास गौरीसदृश्य  कौतुकाची नजर तुम्हालाही घरबसल्या मिळू शकते .

माझ्या नवऱ्याची बायको यात बायकोची बाजू बरोबर आहे हे सदैव सांगणे .( नाहीतर मोबईल वर पहारा बसल्यामुळे “कमल” या तुमच्या बॉस च्या फोन ला सुद्धा संशयी नजर मिळू शकेल )

बिग बॉस या कार्यक्रमाबद्दल फार जवळीक न दाखवता स्त्रीसहिष्णू राहणे या दिवशी चांगले.

वामन हरी पेठे ज्वेलर्स याचे प्रायोजक असल्यामुळे हसतमुखाने दिवाळीला आपले पाकीट हलके करावे लागू शकते याची आगाऊ मानसिक तयारी करणे.



तर मित्रहो ... मी ही सगळी काळजी  घेऊन हा सोहळा  माझ्या कुटुंबासमवेत नक्की पाहणार आहे कारण “ there are some emotions  which TV cannot fulfill  for everything else there is Zee Marathi”

Monday, June 15, 2015

दिसतं तस नसतं

दिसतं तस नसतं 
पण नसतं ते शोधयच असत
असतं ते जपायच असतं 
जपल तरी मुक्त सोडायच असतं
कधी जवळ कधी नजरे आड़ करायच असत
दिसत तस नसतं
तरीही फसुन कधी बघायच असत
अनुभव म्हणून साठवायच असत
साठवून पण उधळायच असतं
कधी हसुन कधी अश्रुंनी रित करायच असतं
दिसतं तस नसतं
म्हणून हैमलेट कधी व्हायच असतं
किंग लियर म्हणून जगायच
नाहीतर रोमिओ बनून मरायच असतं
नाटक जरी वेगळ शेक्सपियर बनून अजरामर व्हायच असत

जयदीप भोगले


Thursday, April 24, 2014

येळकोट येळकोट ….जय मल्हार !!!



नाविन्य , औत्सुक्य , भव्यता  या तिहेरी धाग्यात जेव्हा काही विणले जाते आणि त्यातून जी कलाकृती बनते , ती नेहमीच कलासक्त माणसाचा आणि अगदी अरसिक मनाचा सुद्धा  ठाव घेतल्याशिवाय  राहत नाही . या धर्तीवर आपली लाडकी झी मराठी वाहिनी नेहमीच काहीतरी घेऊन येते . मग अगदी  सारेगमप  असो , मराठी पाउल पुढे ते थेट विनोद या तीन अक्षरी शब्दाला नया है  म्हणून हसायला लावणारी   फु बाई  ,. या प्रत्येक कार्यक्रमात  ही तीन वैशिष्ट्ये  आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात …
आता काही दिवसापूर्वीच अजून एक असाच प्रोमो मी  पाहिला आणि  थोडा थबकलो … पिवळ्या रंगात  संबळाच्या आवाजात एक भारदस्त आवाज आला जेजुरीचा राणा  तू येळकोट  मल्हारी …।
तर सगळ्या प्रस्तावनेचा प्रयोजन असं  की  १८ मे  पासून  जय मल्हार ही मालिका झी वाहिनीवर येतेय असं  ऐकलय असं  वाचलंय . आता पुन्हा तेच तीन गुण   ,

नाविन्य … असा प्रयोग  मराठी मालिकेत झाला नाही . तसा पुरुष नायक असलेल्या  मालिकेचे या टी  वी ला वावडेच असते म्हणा… पण ह्याचा हिरोच जर आमचा मल्हारी मार्तंड आहे तर अजून काय सांगू ? .आणी खंडोबा आपला कुलदैवत आहे, पण आपल्या कुलदैवता बद्दल माहिती असतेच असे नाही  त्यामुळे कथा  नवीन आहे हे वेगळे कशाला सांगावे  

औत्सुक्य…. प्रोमो वरून तर  उत्कंठा वाढती आहे . खंडोबा ची  भूमिका कोण करताय  ? त्याची कहाणी काय .आपण जेजुरी ला जातो,  पण जुने जेजुरी कसे  होते …

भव्यता … वर्तमानपत्रात लिहिल्याप्रमाणे ही सर्वात महागडी मालिका असेल,  त्यामुळे ही मालिका भव्य असावी कारण प्रोमो तर नक्कीच भव्य वाटतोय .  पौराणिक व ऐतिहासिक काळ  दाखवताना जर भव्य नसेल तर त्याचा परिणाम होणार नाही त्यामुळे ती भव्य असेल अशी आशा  तरी झी मराठीकडून  नक्कीच करू शकतो .

 आजकाल झी मराठी होणार सून , जुळून येती  मुळे  प्रसिद्धीच्या   शिखरावर असल्यामुळे, कांचनगंगा शिखर सर करणाऱ्या गिर्यारोहकाला जसे एवरेस्टच  गाठावे लागते, तसे काही या मालिकेकडून अपेक्षित आहे हे मात्र नक्की .

मी लहान असताना आलेले 'भारत एक खोज' मला एकदम निराळे वाटले होते. तसा काहीतरी अनुभव ही मालिका देऊन जाईल का?
सासू सुनाच्या ओशट  प्रेम आणी  अश्रूंच्या पुरातून वाचवून  ही मालिका  टी वी ला थोडे  रांगडेपण देईल का ? स्वयपाक घरातील राजकारण आणी मागच्या परसात हैदोस घालणाऱ्या , पुढच्या पावलाच्या मालिकांची   ही  हकालपट्टी करेल का ?
 असे बरेच प्रश्न माझ्या मनात तर आहेत . त्याची उत्तरे मिळायला थोडा वेळ तर लागेल . पण  तितके वाट पाहण्याची  सवय आपल्याला जाहिरातींनी  लावलेलीच आहे .
 त्यामुळे एखादी आवडीचा कार्यक्रम पाहताना जसा मी दबा  धरून बसतो तसाच जय  मल्हार पाहण्यासाठी  बसतोय  …

तुमच्यापैकी सुद्धा माझे  काही मित्र  अशी वाट  नक्कीच पाहत असाल …

 पाहू या तर मग येळकोट मल्हारी मार्तंडचा ….

जयदीप भोगले
23 .04.14


Sunday, August 25, 2013

क्षितिजापल्याड भरारी मारणारा .. उंच माझा झोका पुरस्कार

मित्रांनो . वाहिनीवरच्या कार्यक्रमाबद्दल कमेंट करण्याचा छंद असून कित्येक दिवस काही लिहू शकलो नव्हतो. कार्यक्रम किती भिकार ...बटबटीत होता  हे लिहून  उगाच गूगल ची भाषांतर परीक्षा घेण्याचे मी गेले कित्येक दिवस टाळत होतो . पण चांगल्या कार्यक्रमाची स्तुती करण्यासाठी माझ्या laptop ने दिलेला त्रास . गुगल काकांनी दिलेली तोकडी मदत सुद्धा मला खूप उत्साह देऊन जाते .. आणि मग त्यात जर रविवारच्या संध्याकाळी maggi खात खात एका अविस्मरणीय कार्यक्रम पहायला मिळाला तर ..
गेले कित्येक दिवस पुढचे पाउल म्हणत म्हणत १०० वर्षापूर्वीचा सासू सून वाद ..पाहून मी मराठी वाहिन्या पाहाव्या की नको या विचारात पडलो होतो. पण पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीने मला सकारात्मक विचार करायला भाग पडले.
गेले कित्येक दिवस गाजत असलेली “उंच माझा झोका” ही मालिका , मालिका न ठेवता त्यातून प्रत्येक घरात नांदणाऱ्या स्त्रीशक्तीचा गौरव करून, त्यातून  एक पुरस्कार सोहळा करण्याचा संकल्पना करणाऱ्या झी मराठी वाहिनीचे अभिनंदन.
मनोरंजन वाहिनी ही सामाजिक बांधिलकी, जबाबदारी  जपणारी सुद्धा असू शकते याचे हे उत्तम उदाहरण.
सामाजिक बांधिलकी जपणे हे फक्त सह्याद्री वाहिनी पुरतेच मर्यादित आहे का काय असे मला वाटत होते पण कदाचित या प्रश्नांचे यथोचित उत्तरच झी मराठी ने या पुरस्काराने दिले आहे.
महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्रीशक्तींना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणे आणि ‘कतरिना’ वादळात फसलेल्या आपल्यासारख्या तरुणायीला, स्त्री प्रत्येक क्षेत्रात तेवढीच मोठी वादळवाट बनवतेय हे समोर आणायचे स्तुत्य काम या पुरस्काराने केले असे मला वाटून गेले
पुरस्कार मिळणाऱ्या माधुरीताई असोत की कब्बडी मध्ये जग जिंकून येणारी दीपिका जोसेफ असो प्रत्येक पुरस्कार महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिरकणी ला दिला आहे असे मला वाटत होते.
प्रत्येक पुरस्कार मिळताना आपण या जगात किती छोटे आहोत याची कुठेतरी चुटपूट मला लागत होती.
कार्यक्रमाची बांधणी पुरस्कारांच्या प्रत्येक हिऱ्याला न्याय देऊन बनवलेली होती . नाहीतर मनोरंजन या नावाखाली आजकाल चित्रपटातील तांत्रिक पुरस्काराना जशी कात्री मारली जाते , एन्ड क्रेडीट मध्ये चित्रपटात मेहेनत केलेल्या माणसाना जसे नकळत डावलले जाते तसे कुठेही वाटले नाही. हे सुद्धा खूप आवडले .
या कार्यक्रमाच्या ब्रेक मधल्या जाहिराती सुद्धा अतिशय योग्य आणि पुरस्काराला साजेश्या होत्या हे सुद्धा कौतुकास्पद म्हणावे लागेल.
मग सोसायटी चहाची असो की dove साबणाची J ..
पण होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या वेळी गर्दी करणाऱ्या महिला या सुवर्णक्षणी का गर्दी करत नाहीत हे कुठेतरी कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये असलेल्या तरुण महिलांच्या सहभागावरून वाटून गेले. कदाचित याच कारणामुळे आपल्या समाजात भवानी शक्ती उपासनेसाठी वर्षातून नउच दिवस का? याचे उत्तर मिळते .
मनोरंजन वाहिन्यामुळे आपण गाणे गावे, नाच करावा किंवा अभिनय करावा असे वाटणाऱ्या लहान मुलींना  सोबत बसून, प्रत्येक क्षेत्रात काम करून वलय हे निर्माण करता येऊ शकते  असे कुठेतरी या पुरस्कारातून दाखवून दिले.
गांधी सिनेमा हा जसा प्रत्येक गांधी जयंती ला आवर्जून पाहिला जातो तसा हा पुरस्कार दर वर्षी तितकाच आदराने पाहावा आणि प्रत्येकाने त्यातून प्रेरणा घ्यावी हीच या पुरस्कार सोहळ्याची  खरी पावती ठरेल...


    


एव्हरेस्ट

 ज्याचे त्याचे एव्हरेस्ट एव्हरेस्ट अस शिखर एकच नसतं प्रत्येक माणसाचं एव्हरेस्ट वेगळं असतं उंची कमी जास्त असेल समाजात शिखराची पण सर केल्यावरच...