चित्रपट- दबंग
भाषा- हिंदी
कलाकार- सलमान खान , नवतारका - सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान , सोनू सूद, आयटम बॉम्ब- मलायका अरोरा
दिग्दर्शक - अभिनव कश्यप
संगीतकार- साजिद वाजीद
पाहवा की नाही - पाहिल्यास मजा येईल
मित्रानो , डोक्याला त्रास देणारे , डोके धरून बघावे लागणारे , आणि डोके बाहेर ठेऊन जाऊन बघायचे अशी मी नवीन वर्गवारी केली आहे. आजच प्रदर्शित झालेला दबंग हा चित्रपट डोके बाहेर ठेऊन जायच्या पठडीतला चित्रपट आहे .
हा एक हाणामारी चित्रपट या धाटणीचा आहे. दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी हा चित्रपट शिट्या वाजवणारे , मजा करणारे तरुण , आणि सलमान खान चे पंखे यांना विचारात ठेऊन सर्वेषाम दर्शकांसाठी बनवलेला दिसतो आणि तो प्रयत्न अगदी चोख या चित्रपटात यांनी बजावला आहे.
चित्रपटात कथानक हे फार महत्वाचे ( आजकाल कुठे असते म्हणा) नसल्यामुळे चित्रपट कथावस्तू अशी आहे आणि तशी आहे असे मी सांगणार नाही .

पण तरीही आता हे परीक्षण लिहायचा घाट घातला आहे तर सांगतो, रॉबिनहूड चुलबुल पांडे ( सलमान खान) हा लहानपासुनच त्याचा सावत्र भावाबद्दल( अरबाज खान ) खार खाऊन असतो कारण त्याचे सावत्र वडील प्रजापती पांडे ( विनोद खन्ना) याला कधीच मायेचा हात देत नाहीत .. पण त्याची आई ( डिम्पल कपाडिया ) त्याला समजावून पुढे रेटत असते पुढे हाच मुलगा पोलीस अधिकारी बनतो .. त्याचे उत्तर प्रदेश राजकारणातील गुंडांबरोबर भांडण , एका कुंभार बालेशी ( अतिशय नीटनेटकी आणि माती न लागलेली ) गुळ घालणे आणि ... बस्स बस्स ...मला वाटते आता तुम्हाला कथा कशी असेल हे पुसटसे उमजले असेल.
पण आता अशा कथानकात जर सलमान खानची स्टायील, वेगवान अशी साहस दृश्ये , श्रवणीय गाणी , भन्नाट टाळ्या वाजवायसारखे संवाद जर एखाद्या मसाल्यासारखे घातले तर हेच कथानकाचे सुरण कसे सुरण कबाब बनते हे बघणे मजेदार आहे.
आपल्या ( म्हणजे अरबाझच्या- अशी म्हणायची पद्धत आहे ) मलायका अरोरा - ' मुन्नी बदनाम हुई - मै झंडूबाम हुई ' आयटम साँग घेऊन थेटर कसे डोक्यावर घेता येईल याची काळजी घेतात
तेरे मस्त मस्त दो नैन, हून दबंग ही गाणी सुद्धा अगदी श्रवणीय आहेत
सोनू सूद या नव्या चेहऱ्याने आपली डावी भूमिका चोख बजावली आहे . बाकी सर्व ठीक .. आता मी बाकीच्या लोकांबद्दल जास्त सांगितले तर भाजिपेक्षा कढईचे कौतुक केल्यासारखे होईल .
चित्रपटाची जाहिरात बऱ्याच दिवसापासून सर्वत्र धडाक्यात चालू होती आणि वोन्तेड चित्रपट हिट झाल्यापासून सलमानबद्दल प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षा आज जवळ जवळ सल्लू भाईनी पूर्ण केल्या आहेत.
'वान्तेद' इतकी जास्त रक्तरंजित दृश्ये नसल्यामुळे हा चित्रपट सुखावह वाटतो. शिवाय सवंग प्रसिद्धी साठी अश्लील दृश्ये बरबटलेले संवाद असे यात काही सापडणार नाही त्यामुळे आपण कुटुंबाबरोबर बिनधास्त हा चित्रपट बघू शकतात.सलमान खान हां यामध्ये अत्यंत लक्षवेधी भूमिका साकार करतो अणि कदाचित हा सिनेमा त्याच्या कारकिर्दीतील एक चांगला चित्रपट म्हणावा लागेल .
.चित्रपट हा मनोरंजन करण्यासाठी असावा त्यातून आपला तीन तास टाईमपास व्हावा ,अशी माफक अपेक्षा असणा-या प्रेक्षकांना हा चित्रपट पर्वणी आहे आणि तो नक्कीच सुखावून जाईल. रमजान च्या या लॉन्ग वीकेंड साथी दबंग हा शीर्खुर्म्या सारखा मेजवानी ठरेल हे मात्र नक्की
बाकी आपण प्रत्यक्ष पाहून ठरवावे ...
जयदीप भोगले
Mastach.. already booked for Sunday..
ReplyDeletepicture chaan aahe..
ReplyDelete