Wednesday, September 22, 2010

मला भावलेले मराठी चित्रपट - का पहावेत ?(भाग १)-


मित्रांनो कामाच्या गराड्यामुळे मी काही दिवस लिहू शकलो नाही . तुम्ही मला फार मिस केले असेल असे म्हणत नाही .. पण तरीही जे आजकाल माझा ब्लॉग वाचतात हे फक्त त्यांना उद्देशून ...
मी २५  उत्तम मराठी चित्रपट याची एक लिस्ट सांगितली होती आता चित्रपट प्रदर्शित झालेल्या सालाप्रमाणे ते का चांगले ते मी लिहणार आहे .
त्याचा पहिला भाग लिहिला आहे . आवडल्यास नक्की कळवा. न आवडल्यास टीका करा .. 


जोगवा - २००९
दिग्दर्शक - राजीव पाटील 
कलाकार - उपेंद्र लिमये , मुक्त बर्वे, किशोर कदम  
एक मन हेलावून टाकणारा अनुभव .. संवेदनशील दर्शकांना हा चित्रपट नक्कीच बेचैन करून टाकतो. अप्रतिम छायाचित्रण , भेदक आणि वास्तव संवाद आणि उपेंद्र लिमये व मुक्त बर्वे यांचा उत्तुंग अभिनय या मुळे हा चित्रपट व्यावसायिक नसून मला आवडून गेला. अजय अतुल यांची समर्पक गाणी हे सुद्धा या चित्रपटाची जमेची बाजू होती. जोगती समाज आणि त्यामध्ये माजलेली अंधश्रद्धा यावर प्रकाश टाकून राजीव पाटील यांनी या चित्रपटाचे सोने केले.
सर्वसाक्षी आणि इतर काही चित्रपट ही अंधश्रद्धेतून होणा-या पिळवनुकीवर  आधारित होते पण जोगवा हा चित्रपट जोगतिणीची दुर्दशा जास्त उत्तम रीतीने दाखवून जातो.
आजच्या भांडवलवादी प्रगतशील भारतीय  जगामध्ये अजूनही  दु:ख किती भयाण स्वरुपात जगत आहे हे जर आपल्याला हवे असेल तर हा चित्रपट आपल्या संग्रही हवाच .
नटरंग - २००९
दिग्दर्शक- रवी जाधव
कलाकार- अतुल कुलकर्णी , किशोर कदम ,
छायाचित्रण - महेश लिमये
जाऊ द्या ना घरी 
हिंदी चित्रपटाशी स्पर्धा करणारे छायाचित्रण , उत्तम संकलन , अप्रतिम संगीत आणि गीते याने नटरंग हा चित्रपट नटलेला होता.
चित्रपटातील विषय कलात्मक पठडीकडे झुकणारा असूनही व्यावसायिक दृष्टीने हाताळणी करून चित्रपटाच्या कथेला धक्का न लागू देणे यात दिग्दर्शक रवी जाधवांना यात यश आले आहे.जुन्या आणि कृष्णधवल जगात बंद असलेल्या तमाशाप्रधान चित्रपटाला पुन्हा एकदा नवतारुण्य देण्याचे काम या चित्रपटाने केले.
उत्तम बनवलेला  ग्रामीण चित्रपट हा शहरातही हाउसफुल्ल चालू शकतो हे याने दाखवले.
अतुल कुलकर्णी यांनी चित्रपटासाठी घेतलेली मेहनत ही आणखी एक जमेची बाजू .
हा चित्रपट गीतांसाठी आपल्या संग्रही नक्की हवा


मी शिवाजीराजे भोसले बोलतोय  २००९ 
दिग्दर्शक- संतोष  मांजरेकर
कलाकार- सचिन खेडेकर, महेश मांजरेकर 
स्फुरण फक्त ऐतिहासिक आणि युद्धपटांनी चढू शकते अशी जर आपली धारणा असेल तर हा चित्रपट आपण पहावाच. दिनकर मारुती भोसले या व्याक्तीचीत्रातून प्रत्येक मराठी माणसाला विचारलेला सवाल म्हणजे मी शिवाजी राजे बोलतोय . 
उत्तम विषय , अप्रतिम हाताळणी , उत्कृष्ट एक खांबी - सचिन खेडेकर यांचा अभिनय यांनी नटलेला हा एक व्यावसाईक चित्रपट .
मराठी चित्रपटातील आजतागायत सर्वात अधिक व्यावसाईक यश मिळवलेला . 
हा चित्रपट हा मला त्याच्या काल्पनिक जगतातून वास्तवाकडे कसे बोट दाखवता येते याचे उत्तम उदाहरण वाटते . प्रत्येक संवादातून आपल्याला मराठीपणाची जाणीव आणि अभिमान पुन्हा एकदा जागृत करून देणारा चित्रपट .
पटकथा आणि संवाद यासाठी हा चित्रपट संग्रही असावा 

कायद्याच बोला ..२००५ 
दिग्दर्शक - चंद्रकांत कुलकर्णी
कलाकार - मकरंद अनासपुरे , सचिन खेडेकर
एका कॉमेडी सम्राटाचा उदय अशी या चित्रपटची ओळख करून द्यावी लागेल .
हा चित्रपट हा निखळ विनोदी पण कुठेतरी उत्कंठा वाढवणारा आणि अतिशय सुटसुटीत पटकथा असणारा चित्रपट आहे.
चित्रपटाने व्यावसाईक यश तर मिळवलेच पण हळू हळू शहरी प्रेक्षक मल्टीप्लेक्स दर्शक मराठी चित्रपटांना जाऊ लागला .
जुन्या द्वैअर्थी , अंगविक्षेप प्रधान  विनोदांना बाजूला ठेऊन भाषाप्रधान विनोद या चित्रपटाने उचलून धरला आणि त्याचा उदय म्हणजे मकरंद अनासपुरे 
मकरंद अनासपुरेच्या निखळ विनोदासाठी हा चित्रपट संग्रही हवाच .

अगं बाई अरेच्चा ... २००४ 
दिग्दर्शक - केदार शिंदे 
कलाकार - संजय नार्वेकर , दिलीप प्रभावळकर 
संगीत - अजय अतुल 

हा चित्रपट एका इंग्रजी ( व्हाट वूमन वांट ?) या वर आधारित असूनही मराठी मातीचा सुगंध जपणारा असा आहे . चांगले कथानक आपल्या पद्धतीने फार कमी चित्रपटात उतरवलेले असते तसा एक चित्रपट. उत्तम गाणी  ' मन उधाण वा-याचे ' आणि दुर्गे दुर्गट भारी ही तर अविस्मरणीय आहेत .
अजय अतुल यांच्या सांगीतिक प्रवासाचा महत्वाचा टप्पा असे याला सांगावे लागेल.
हा चित्रपट तुम्ही कधी कुठही कुठूनही पहिला तरी तुम्ही पाहू शकता असे मला वाटते . आणि पुरुषाच्या मनातील सुप्त इच्छा ' मला बाईच्या मनातले कळले तर ' म्हणून गालातल्या गालात हसून स्वप्न रंगवण्यासाठी हा चित्रपट मला फार आवडतो .
स्वप्नकथेचे वास्तववादी मराठमोळे ' मुंबईकरी ' चित्रण म्हणून हा चित्रपट आपल्या संग्रही हवा . २ तासात नक्कीच फ्रेश व्हाल ....






जयदीप भोगले
२२-०९-२०१० 

No comments:

Post a Comment

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...