Wednesday, March 29, 2017

जाऊ द्या ना बाळासाहेब


जाऊ द्या ना बाळासाहेब आता तुम्ही सैराट व्हा
होतो तेंडुलकर आउट कधीकधी तरी आयुष्याचा किल्ला व्हा
साडे माडे तीन म्हणून दे धक्का प्रयत्नाचा
हाय काय आणी नाय काय असं म्हणून लै भारी व्हा
कट्यार काळजात घुसलीे तरी बेलवलकर नटसम्राटच राहतो
व्हेंटिलेटर वर जरी ठेवलं तरी जगासाठी झकास व्हा
जाऊ द्या ना बाळासाहेब तुम्ही सैराट व्हा
गुलदस्त्यात असले जरी बरेच काही
आयुष्याचा टाईमपास होत नसतो
काकस्पर्श झाला तरी लोकमान्य एक युगपुरुषच राहतो
माउली चा जझबा घेऊन आता तुम्ही रुस्तम व्हा
जाऊ द्या ना बाळासाहेब आता तुम्ही सैराट व्हा
जयदीप भोगले
२८ मार्च २०१७

स्त्री


स्त्री कधी गोड भाषा ...कधी जीवनाची आशा
कधी ताराबाईच्या तरवारी ची धार
कधी सावित्रीबाईंच्या शिक्षणाचं सार
कधी आंनदी बाई जोशींची सुश्रुषा
कधी शांता शेळक्यांच्या लेखणीची मनीषा
कधी लता दिदींचा स्वर्गीय स्वर
कधी माधुरीच्या अलवार हास्याची जर
कधी बनून मेधाताईंची नर्मदा परिक्रमा
कधी करून वीणाताईंसम वर्ल्ड ची पादाक्रांत सीमा
जणू तुळजाभवानीचा विजयी आशीर्वाद
गोदावरीच्या धारेची अखंड वाट
विविध रूपे तुझी विविध नावे तुझी
शब्दांची सुमने अर्पून स्मरतो सदैव महती तुझी

जयदीप भोगले
८ मार्च २०१७

बिनडोक


संघर्ष कशाचा कुणासाठी कशाला???
का बनावं आम्ही आता जळू असंच फक्त जगायला ?
वाघांची संख्या रोडावली म्हणे या जगात 
तरसांचे कळप एकत्र येतीं शिकार करायला
इकडे आड तिकडे विहिर या म्हणीचाच अर्थ सगळे सांगती
कुणाला कळेल का मला शिकायचंय समुद्रात पोहायला
मांडलिक आत्ता पालखीत मिरावती
राजाचं घोडं जातंय आता नेहमीच पेंड खायला
रहस्य कळेल का मला बिंडोकंपणाचं
मी सुद्धा शिकवणी लावू म्हणतोय बिनडोक बनायला


जयदीप भोगले
25 मार्च 2017

डायटींग फायटिंग


डाएट च्या जगात सगळं कसं अजब असतं
जिलेबी असते शत्रू आणी तूप म्हणे जहर असतं

जीभ आणी पोट याचे ते शीतयुद्ध असतं
ती जिंको कि ते आपल दोन्हीकडे मरण असतं

एकीला चवीचं प्रेम तर एकाला कॅलरीच वावडं असत
ही म्हणते लोणचं छान तर याचं फायबर बरोबर लफडं असत

वेळेवर जेवा असं पोटाचं भाषण कडवं असतं
ही मात्र खोडसर ,म्हणते अंबावडीचे आणि वेळेचं सदा वाकडं असतं

हिचं ऐकू कि त्याचं हे माझं नेहमीच कोडं असतं
म्हणूनच वर्षात एकदा जी एम डायट ला माझं मनोभावे साकडं असतं

बाकी वर्षभर मात्र माझं जिभेवर प्रेम एकदम खरं आणी भाबडं असतं

जयदीप भोगले 6 फेब्रुवारी 2017

थोडं लाईट व्हा

थोडं लाईट व्हा आणि काईट व्हा 

दुःख मागे टाकून थोडसं तुम्हीें ब्राईट व्हा।

येतो कधी काळोख सामोरा... हळूच तुम्ही व्हाइट व्हा।

दिवसाने जर घेतली परीक्षा रिलॅक्स अशी नाईट व्हा।

जगात आहेत दृष्टिहीन बरेच... तुम्ही हळूच त्यांची साईट व्हा।


थोडं लाईट व्हा आणि काईट व्हा....


जयदीप भोगले
१३ फेब २०१७

उबर परी

माझ्या मित्राला एकदा अमेरिकेत उबेर मध्ये एक सुंदर महिला ड्रायव्हर म्हणून आली म्हणे ... तो म्हणाला मी असतो तिथे तर नक्कीच एक कविता केली असती ... म्हणून हा एक केला छोटा प्रयत्न.


एक कोमल आणि अलवार ही कथा
माझी सारथी झाली आज जणू मेनका
वेग कसा सुगंधी तो जाहला
रस्त्याची जणू होई आज वाटिका
प्रवास हा सुरेल का भासे मज कळेना
आह जरीे निरव आणि स्वच्छदं ती शांतता
डोळ्यांचे डोह डोकावती हळूच ते
क्षणिक ते चंचल पण गूढ असे आर्तता
वळण ते आले आणि अनुभव तो संपला
वास्तवात येऊनी करितो संसार हा नेटका

जयदीप भोगले
१६ फेब २०१७

बाल बाल देखो




केसांची केस कशी हाताबाहेर गेली
जरी आम्ही लावले पॅराशूट डेली

कुणी म्हणाले हा तर स्ट्रेस चा परिणाम 
 काहिनीं सांगितले हेरीडीटी स्ट्रॉंग आहे जाम

नाव्ह्याने सुद्धा हजामत बिनपाणी केली
जरी आम्ही लावले पॅराशूट डेली

Gel आणि कंगवे शत्रू जणू जाहले
रिचफिल आणी बत्रा उगा सलगी करू पाही

जुन्या मैत्रिणीच्या भेटीला टोपी सुद्धा नेली
जरी आम्ही लावले पॅराशूट डेली

मग म्हणलो मी ...जाऊ द्या ना राव
केस नसले तरी मला व्यक्ती म्हणून भाव

'बाल' भले गेले आणि 'असली 'पर्सनॅलिटी घावली
खुशाल आम्ही लावतो पॅराशूट डेली

Thursday, January 26, 2017

कस्तुरीमृग

डोळ्यांच्या दुनियेत हरवलाय कधी।
 स्वप्नाच्या गावात राहिलाय कधी।
 रातराणी चा सुगंध दरवळतोय नजीकच।
पण त्याचा माग काढलाय कधी।
शुक्राची चांदणी शोधलीय कधी।
 वाऱ्याला सारथी केलय कधी ।
वाट कुणाची पाहता पाहता रात्र अशी जागलीय कधी
क्षणाचं आयुष्य अनुभवलंय कधी।
 कस्तुरीमृग बनून बहाकलात कधी।
 एक होकाराच्या आशेमधून कविता अशी लिहलीय कधी ?

जयदीप भोगले। विक्रोळी ते पवई ऑटो 😂5 jan 2017

नकाराचं गणित

नकाराचं गणित नेहमी वजाबाकीच करतं
भेटीची बेरीज नेहमी बाजूलाच ठेवतं।
 चोरून पाहून कधी मनातलं समजत नाही।
 मनातल्या मनात पोहता कधी येतं ?।
बुडायच्या भीतीने ते किनाऱ्यावरच मरतं
किती सांगू किती नाही म्हणून पत्र ते लिहतं ।
पत्ता न सांगता आपल्या वाहितचं ठेवंत।
शाईचे पेन होतं दौतीविना रितं ।
 देवाच्या चरणी ते आशेनं जातं ।
कधी होईल कृपा म्हणून एकटक पाहतं।
आस्तिक म्हणून ते हळूच अगतिक होतं
आणि नकाराचं गणित नेहमी वजाबाकीच करतं
मग एकदिवशी ते मनाशी ठरवतं ।
 मन आणि कृतिचा गुणाकार करतं
एका दमात सगळं बोलूनच टाकतं ।
आणि मग ती म्हणते हसून  खरंच ...
. सुरवंटाच फुलपाखरू कोष फाडूनचं होतं  

जयदीप भोगले
30 डीसेम्बर 2017

ती सध्या काय करते ??




ती सध्या काय करते आजकाल प्रत्येक जण विचारते
कधी वॊटसॅप च्या गर्दीत तर कधी मित्रांच्या वर्दीत प्रत्येकाला तिची नसती पंचायत असते

तिचं लग्न झालं का रे?  इतक्यातच  फिसकलं का रे ?
पोलीसापेक्षा यांचीच जासुसगिरी फार असते
'

'ती' चा पगार किती? 'ती'ला मुलं नाहीत कशी ?
तिच्या हातावरच्या रेषांना सुदधा यांच्यापेक्षा कमी माहिती असते

कधी 'ती' ला सुद्धा विचारा  खरी कहाणी काय असते
 तुमच्या कल्पनेच्या भाकितात जगण्यापेक्षा तिच्या सत्यात काय घडत असते

विस्फारलेल्या नजरेपेक्षा तिला मैत्रीची हाक हवी असते
प्रत्येकवेळी वाचवायला कृष्ण नको पण  माणसांची दुनिया नक्कीच  हवी  असते
'ती' च्या पेक्षा तिला 'तू' बनणं जास्त पसंत असते

जयदीप भोगले
12 जानेवारी 2017

आज म्हणे आम्ही प्रजासत्ताक झालो





लोकशाहीच्या मनमानीत
आरक्षणाच्या चढाओढीत
राजकारणाच्या मारामारीत
जणू सहनशक्तीचे बाप झालो
आज म्हणे आम्ही प्रजासत्ताक झालो


बाबासाहेबांना फोटोत बसवलं
रामाला कुंपणात अडकवलं
माणुसकीला वेशीला टांगलं
रावणाला घाबरून जणू कुंभाकर्णाचे दास झालो
आज म्हणे आम्ही प्रजासत्ताक झालो


झाडांना बोन्साय बनवलं
 सिमेंटच जंगल वसवलं
धुराचं नवीन आकाश उधळलं
प्रतिस्वर्गाचे विश्वामित्र समजून भस्मासुराचे खास झालो
आज म्हणे आम्ही प्रजासत्ताक झालो

आशेचा किरण शोधतो आम्ही
मेणबत्त्या ने निषेध नोंदवतो आम्ही
मंदिराच्या वाऱ्यामध्ये आशीर्वाद विकतो आम्ही
स्वार्थाच्या हिशोबात फक्त भोगी ययाती झालो
आज म्हणे आम्ही प्रजासत्ताक झालो

जयदीप भोगले
25 जानेवारी 2017

Wednesday, October 12, 2016

दिल मराठी धडकन मराठी – झी मराठी अवार्ड्स


सर्वांना सर्वप्रथम विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
विजय म्हणजे बक्षीस मिळणे , मन जिंकणे , मान मिळणे , विजयी पताका आणि विजयी जल्लोष हे सगळ आपसुख येतच .आणि जिंकण्याची गोष्ट, जर  रसिकांची मने जिंकल्यामुळे कुठे तरी रसिकांनी दिलेली प्रेमाची पावती आणि प्रेमाचे बक्षीस म्हणजे झी मराठी अवार्ड्स ...
दरवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा झी मराठी अवार्ड्स २३ ऑक्टोबर ला  रसिकांच्या भेटीला येणार आहे असे प्रोमोवरून समजले .
पण यावर्षीचा जल्लोष काय वेगळा असेल काय धमाल असेल याची उत्कंठा सगळ्याच लोकांना असते तशी मला सुद्धा तितकच लागून राहिली आहे

एक वाहिनीचा प्रामाणिक दर्शक म्हणून मला यावर्षी झी मराठी मध्ये काही विशेष जाणवते ते म्हणजे  मालिकांचे वैविध्य, विषयांची  व्याप्ती , विषय कौटुंबिक असूनही प्रत्येक कृतीची हटके  मांडणी , मालिकांची भव्यता दिपवून सुद्धा मराठी साधेपणाला जपणारी हाताळणी .
आणि म्हणूनच संध्याकाळी सहा पासून रात्री १२ वाजेपर्यंत प्रत्येक दर्शकाला आवडले ,रुचेल , असे कार्यक्रम होम मिनिस्टर पासून ते  रात्रीस खेळ चाले पर्यंत झी मराठी घेऊन येते आणि प्रत्येक दर्शक आपल्या हृदयातल्या एका कप्यात झी मराठीचा अनुभव जपत असते .

मराठी भाषाप्रकार आणि बोली भाषा यांची गोडी वेगवेगळी असूनही प्रत्येकाची गोडी तितकीच हवीहवीशी वाटणारी  आहे याचा अनुभव मला फक्त झी मराठीवर पाहायला मिळतो. मग नागपुरी बोलीमधील माझ्या नव-याची बायको असो की कोकणातील रात्रीस खेळ चाले असो. प्रत्येक दर्शकाला जोडणारी मालिका बनवणे हा फक्त प्रसिद्धीचा भाग असू शकत नाही तर  यात प्रत्येक मराठी मनाला समजून घेण्याची मानसिकता आहे असे जाणवते.

जगामध्ये प्रत्येक “brand” तेव्हाच मोठा होतो जेव्हा त्याचे लोकांशी भावनिक नाते बनले जाते.म्हणूनच झी मराठी ही एक वाहिनी न राहता आता त्याचा एक “ brand” झाला आहे असे मला एक मार्केटिंग चा माणूस म्हणून जाणवते .
आता या अशा कार्यक्रमाचे मालिकांचे अवार्ड्स जेव्हा असतील त्यावेळी मला बक्षीस कुणाला मिळेल यापेक्षा प्रत्येक कलाकाराचे केलेले कौतुक जास्त महत्वाचे वाटते . झी मराठी मधले कार्यक्रम म्हणजे मला टीम इंडिया ची तेंडुलकरच्या काळची क्रिकेट टीम वाटते . मग तेंडूलकर सारखे फटकेबाजी करणारी “हवा येऊ द्या” असो की सावधपणे संथ गतीने द्रविडसारखी माझ्या नव-याची बायको असो . प्रत्येक कार्यक्रम वाहिनीला उंचीवर नेतो . तेंडूलकर मोठा म्हणून द्रविड नको असे म्हणता येत नाही .


बर जाऊ दे मी लई सिरीअस  बोललो . 
मला काहे दिया परदेस जाम आवडते .. “शिव” आवडणाऱ्या कित्येक मुली मला माहिती आहेत आणि गौरी ला बघून “ आयला अशी कुणीतरी मिळाली पाहिजे “ अशी स्वप्नाळू पोरही .

रात्रीस खेळ चाले याची मालवणी भाषा कशी चुकीची !!! अशी खास पुणेरी चर्चा मी ऐकली आहे .

चला हवा येऊ द्या चा जिलेट- सलून झालय रे.... अशी टीका करून सैराट चा एपिसोड काय भारी झाला “ आईच्या गावात” असे म्हणणारे मित्रांचे वोटसप वाचले आहेत

आणि जय मल्हार आता फार खेचली असे म्हणून “ काल सातला लाईट गेलेले म्हणून मी अकरा वाजता रिपीट पहिला” असा म्हणणा-या  माझ्या मावशीचा फोनही ऐकला आहे .

अशा या मालिकांचा कौतुक सोहळा त्यात विनोदी नाटक नाच आणि मस्त निवेदन याची फोडणी म्हणजे ३ तासात झी मराठीचे आठ तास पाहिल्यासारखे आहे ... विजेची बचत आणि वेळेचीही ...


फक्त या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाच्या दिवशी  पुरुषांनी घ्यायची काळजी
 पुरुषांनी रिमोट लपवून ठेवू नये ...( सीमावादापेक्षा मोठा गदारोळ होऊ शकतो)

कामवाल्या बाईला सुट्टी स्वताहून देणे किंवा संध्याकाळी बाहेरून काहीतरी मागवणे . पाककुशल पुरुषांनी आधीच स्वयपाक केल्यास गौरीसदृश्य  कौतुकाची नजर तुम्हालाही घरबसल्या मिळू शकते .

माझ्या नवऱ्याची बायको यात बायकोची बाजू बरोबर आहे हे सदैव सांगणे .( नाहीतर मोबईल वर पहारा बसल्यामुळे “कमल” या तुमच्या बॉस च्या फोन ला सुद्धा संशयी नजर मिळू शकेल )

बिग बॉस या कार्यक्रमाबद्दल फार जवळीक न दाखवता स्त्रीसहिष्णू राहणे या दिवशी चांगले.

वामन हरी पेठे ज्वेलर्स याचे प्रायोजक असल्यामुळे हसतमुखाने दिवाळीला आपले पाकीट हलके करावे लागू शकते याची आगाऊ मानसिक तयारी करणे.



तर मित्रहो ... मी ही सगळी काळजी  घेऊन हा सोहळा  माझ्या कुटुंबासमवेत नक्की पाहणार आहे कारण “ there are some emotions  which TV cannot fulfill  for everything else there is Zee Marathi”

Monday, June 15, 2015

दिसतं तस नसतं

दिसतं तस नसतं 
पण नसतं ते शोधयच असत
असतं ते जपायच असतं 
जपल तरी मुक्त सोडायच असतं
कधी जवळ कधी नजरे आड़ करायच असत
दिसत तस नसतं
तरीही फसुन कधी बघायच असत
अनुभव म्हणून साठवायच असत
साठवून पण उधळायच असतं
कधी हसुन कधी अश्रुंनी रित करायच असतं
दिसतं तस नसतं
म्हणून हैमलेट कधी व्हायच असतं
किंग लियर म्हणून जगायच
नाहीतर रोमिओ बनून मरायच असतं
नाटक जरी वेगळ शेक्सपियर बनून अजरामर व्हायच असत

जयदीप भोगले


Thursday, April 24, 2014

येळकोट येळकोट ….जय मल्हार !!!



नाविन्य , औत्सुक्य , भव्यता  या तिहेरी धाग्यात जेव्हा काही विणले जाते आणि त्यातून जी कलाकृती बनते , ती नेहमीच कलासक्त माणसाचा आणि अगदी अरसिक मनाचा सुद्धा  ठाव घेतल्याशिवाय  राहत नाही . या धर्तीवर आपली लाडकी झी मराठी वाहिनी नेहमीच काहीतरी घेऊन येते . मग अगदी  सारेगमप  असो , मराठी पाउल पुढे ते थेट विनोद या तीन अक्षरी शब्दाला नया है  म्हणून हसायला लावणारी   फु बाई  ,. या प्रत्येक कार्यक्रमात  ही तीन वैशिष्ट्ये  आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात …
आता काही दिवसापूर्वीच अजून एक असाच प्रोमो मी  पाहिला आणि  थोडा थबकलो … पिवळ्या रंगात  संबळाच्या आवाजात एक भारदस्त आवाज आला जेजुरीचा राणा  तू येळकोट  मल्हारी …।
तर सगळ्या प्रस्तावनेचा प्रयोजन असं  की  १८ मे  पासून  जय मल्हार ही मालिका झी वाहिनीवर येतेय असं  ऐकलय असं  वाचलंय . आता पुन्हा तेच तीन गुण   ,

नाविन्य … असा प्रयोग  मराठी मालिकेत झाला नाही . तसा पुरुष नायक असलेल्या  मालिकेचे या टी  वी ला वावडेच असते म्हणा… पण ह्याचा हिरोच जर आमचा मल्हारी मार्तंड आहे तर अजून काय सांगू ? .आणी खंडोबा आपला कुलदैवत आहे, पण आपल्या कुलदैवता बद्दल माहिती असतेच असे नाही  त्यामुळे कथा  नवीन आहे हे वेगळे कशाला सांगावे  

औत्सुक्य…. प्रोमो वरून तर  उत्कंठा वाढती आहे . खंडोबा ची  भूमिका कोण करताय  ? त्याची कहाणी काय .आपण जेजुरी ला जातो,  पण जुने जेजुरी कसे  होते …

भव्यता … वर्तमानपत्रात लिहिल्याप्रमाणे ही सर्वात महागडी मालिका असेल,  त्यामुळे ही मालिका भव्य असावी कारण प्रोमो तर नक्कीच भव्य वाटतोय .  पौराणिक व ऐतिहासिक काळ  दाखवताना जर भव्य नसेल तर त्याचा परिणाम होणार नाही त्यामुळे ती भव्य असेल अशी आशा  तरी झी मराठीकडून  नक्कीच करू शकतो .

 आजकाल झी मराठी होणार सून , जुळून येती  मुळे  प्रसिद्धीच्या   शिखरावर असल्यामुळे, कांचनगंगा शिखर सर करणाऱ्या गिर्यारोहकाला जसे एवरेस्टच  गाठावे लागते, तसे काही या मालिकेकडून अपेक्षित आहे हे मात्र नक्की .

मी लहान असताना आलेले 'भारत एक खोज' मला एकदम निराळे वाटले होते. तसा काहीतरी अनुभव ही मालिका देऊन जाईल का?
सासू सुनाच्या ओशट  प्रेम आणी  अश्रूंच्या पुरातून वाचवून  ही मालिका  टी वी ला थोडे  रांगडेपण देईल का ? स्वयपाक घरातील राजकारण आणी मागच्या परसात हैदोस घालणाऱ्या , पुढच्या पावलाच्या मालिकांची   ही  हकालपट्टी करेल का ?
 असे बरेच प्रश्न माझ्या मनात तर आहेत . त्याची उत्तरे मिळायला थोडा वेळ तर लागेल . पण  तितके वाट पाहण्याची  सवय आपल्याला जाहिरातींनी  लावलेलीच आहे .
 त्यामुळे एखादी आवडीचा कार्यक्रम पाहताना जसा मी दबा  धरून बसतो तसाच जय  मल्हार पाहण्यासाठी  बसतोय  …

तुमच्यापैकी सुद्धा माझे  काही मित्र  अशी वाट  नक्कीच पाहत असाल …

 पाहू या तर मग येळकोट मल्हारी मार्तंडचा ….

जयदीप भोगले
23 .04.14


Sunday, August 25, 2013

क्षितिजापल्याड भरारी मारणारा .. उंच माझा झोका पुरस्कार

मित्रांनो . वाहिनीवरच्या कार्यक्रमाबद्दल कमेंट करण्याचा छंद असून कित्येक दिवस काही लिहू शकलो नव्हतो. कार्यक्रम किती भिकार ...बटबटीत होता  हे लिहून  उगाच गूगल ची भाषांतर परीक्षा घेण्याचे मी गेले कित्येक दिवस टाळत होतो . पण चांगल्या कार्यक्रमाची स्तुती करण्यासाठी माझ्या laptop ने दिलेला त्रास . गुगल काकांनी दिलेली तोकडी मदत सुद्धा मला खूप उत्साह देऊन जाते .. आणि मग त्यात जर रविवारच्या संध्याकाळी maggi खात खात एका अविस्मरणीय कार्यक्रम पहायला मिळाला तर ..
गेले कित्येक दिवस पुढचे पाउल म्हणत म्हणत १०० वर्षापूर्वीचा सासू सून वाद ..पाहून मी मराठी वाहिन्या पाहाव्या की नको या विचारात पडलो होतो. पण पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीने मला सकारात्मक विचार करायला भाग पडले.
गेले कित्येक दिवस गाजत असलेली “उंच माझा झोका” ही मालिका , मालिका न ठेवता त्यातून प्रत्येक घरात नांदणाऱ्या स्त्रीशक्तीचा गौरव करून, त्यातून  एक पुरस्कार सोहळा करण्याचा संकल्पना करणाऱ्या झी मराठी वाहिनीचे अभिनंदन.
मनोरंजन वाहिनी ही सामाजिक बांधिलकी, जबाबदारी  जपणारी सुद्धा असू शकते याचे हे उत्तम उदाहरण.
सामाजिक बांधिलकी जपणे हे फक्त सह्याद्री वाहिनी पुरतेच मर्यादित आहे का काय असे मला वाटत होते पण कदाचित या प्रश्नांचे यथोचित उत्तरच झी मराठी ने या पुरस्काराने दिले आहे.
महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्रीशक्तींना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणे आणि ‘कतरिना’ वादळात फसलेल्या आपल्यासारख्या तरुणायीला, स्त्री प्रत्येक क्षेत्रात तेवढीच मोठी वादळवाट बनवतेय हे समोर आणायचे स्तुत्य काम या पुरस्काराने केले असे मला वाटून गेले
पुरस्कार मिळणाऱ्या माधुरीताई असोत की कब्बडी मध्ये जग जिंकून येणारी दीपिका जोसेफ असो प्रत्येक पुरस्कार महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिरकणी ला दिला आहे असे मला वाटत होते.
प्रत्येक पुरस्कार मिळताना आपण या जगात किती छोटे आहोत याची कुठेतरी चुटपूट मला लागत होती.
कार्यक्रमाची बांधणी पुरस्कारांच्या प्रत्येक हिऱ्याला न्याय देऊन बनवलेली होती . नाहीतर मनोरंजन या नावाखाली आजकाल चित्रपटातील तांत्रिक पुरस्काराना जशी कात्री मारली जाते , एन्ड क्रेडीट मध्ये चित्रपटात मेहेनत केलेल्या माणसाना जसे नकळत डावलले जाते तसे कुठेही वाटले नाही. हे सुद्धा खूप आवडले .
या कार्यक्रमाच्या ब्रेक मधल्या जाहिराती सुद्धा अतिशय योग्य आणि पुरस्काराला साजेश्या होत्या हे सुद्धा कौतुकास्पद म्हणावे लागेल.
मग सोसायटी चहाची असो की dove साबणाची J ..
पण होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या वेळी गर्दी करणाऱ्या महिला या सुवर्णक्षणी का गर्दी करत नाहीत हे कुठेतरी कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये असलेल्या तरुण महिलांच्या सहभागावरून वाटून गेले. कदाचित याच कारणामुळे आपल्या समाजात भवानी शक्ती उपासनेसाठी वर्षातून नउच दिवस का? याचे उत्तर मिळते .
मनोरंजन वाहिन्यामुळे आपण गाणे गावे, नाच करावा किंवा अभिनय करावा असे वाटणाऱ्या लहान मुलींना  सोबत बसून, प्रत्येक क्षेत्रात काम करून वलय हे निर्माण करता येऊ शकते  असे कुठेतरी या पुरस्कारातून दाखवून दिले.
गांधी सिनेमा हा जसा प्रत्येक गांधी जयंती ला आवर्जून पाहिला जातो तसा हा पुरस्कार दर वर्षी तितकाच आदराने पाहावा आणि प्रत्येकाने त्यातून प्रेरणा घ्यावी हीच या पुरस्कार सोहळ्याची  खरी पावती ठरेल...


    


Tuesday, February 26, 2013

अवधूत गुप्तेची ची ओपन हार्ट हाताळणी ...खुपते तिथे गुप्ते


कार्यक्रम-खुपते तिथे गुप्ते
वाहिनी-झी मराठी
वेळ- बुधवार गुरुवार ९.३०
पहावा का नाही- न चुकता  पहाणे
मित्रांनो, माझा आवडता छंद चांगले कार्यक्रम ऐकणे आणि पहाणे. ( आणी त्यावर लिहून आपले मत ठोकून देणे J)
झी मराठी वर सुरु असणारा खुपते तिथे गुप्ते त्यातलाच एक ...
तसा हा या कार्यक्रमाचा ३ रा सीजन आहे बहुतेक . हिऱ्याला जसे पैलू पडावेत, चंद्र जसा कलाकलाने अधिक सुंदर व्हावा किंवा आपली आवडती मैत्रीण किशोर वयातून तारुण्यात येताना अधिक सुंदर आणि अधिक हवी हवीशी वाटावी या प्रमाणे हा कार्यक्रम उत्तरोत्तर अधिक हवा हवासा वाटतो आहे .
मुलाखतवजा ग्रेट भेट , संवाद , Rendezvous अशा कार्यक्रमच्या यादीत हा कार्यक्रम कधी जाऊन बसला ते कळलेच नाही . मार्केटिंग च्या भाषेत आपण यादीत जाऊन सुद्धा आपल (positioning ) वेगळे ठेवणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते आणि ते या कार्यक्रमाचे यश आहे असे मला वाटते.
हा कार्यक्रम पाहताना मला तराजू आठवतो ... दोन पारड्यात दोन तितकीच तुल्यबळ व्यक्तिमत्व असूनही पारडे कधी इकडे झुकवावे आणि कधी तिकडे अशा वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने गुप्ते साहेब कार्यक्रम हाताळत असतात.
अवधूत गुप्ते तर माझ्यासाठी हा एक प्रवास आहे . झी च्या पहिल्या सारेगामा च्या पर्वा पासून ते खुपते तिथे गुप्ते च्या तिस-या पर्वापर्यंत त्याच्यातील परीपक्वता उतरोत्तर वाढत गेली पण मिश्कीलपणा कुठेच कमी झाला नाही . मला judge म्हणून त्यांनी मारेलेल्या “ टांगा पलटी घोडे फरार” सारख्या नवीन ट्रेडमार्क कमेंट आणि खुपते तिथे मध्ये आपल्या समोरच्या व्यक्तीच्या वयाला अनुसरून त्यांच्या आयुष्याची काही पाने चाळण्याचा प्रयत्न दोनीही तितक्याच अभिनव आणि “ अवधूत” ब्रान्ड वाटतात
कार्यक्रमाची भक्कम बाजू अवधूत असल्यामुळे मुलाखती साठी समोर कोण आहे याला फार महत्व द्यावे असे वाटलेच नाही. करोडपती मध्ये जसा अमिताभ , वहिनी  कुठलीही असो समोर आदेश भौजी असले की प्रत्येक वहिनी मनमोकळ्या गप्पा मारणारच.... तसेच अवधूत दादा, विनय आपटे असो की की फटाकडी सोनाली कुलकर्णी . प्रतेयक संवाद तितकाच मुलखात देणाऱ्या पाहुण्याच्या  रंगात रंगून जातो.
कार्यक्रमात नेहमीच सांगितल्याप्रमाणे त्यांचा जादूचा फोन ही या कार्यक्रमाची खासियत ...
मग रोहिणी हत्तंगडी यांचा कस्तुरबा गांधी बरोबर झालेला फोन की अजून कोणाचा प्रत्येक फोन तितकाच वेगळा.
मास्क सिनेमा मध्ये जसा मास्क हा फक्त मास्क लावणाऱ्या व्यक्तीसारखा वागतो ,फक्त अधिक उजळ अधिक जादुई ...तसेच खुपते मधला सेलिब्रिटी…. 
 जसा आहे तसाच समोर येतो, फक्त…  अधिक उजळ होऊन
कार्यक्रमाचा वाद्यवृंद उगाच जिथे तिथे म्युझिक वाजवू पाहत नाही ही सुद्धा जमेचीच बाजू
हिंदी सारेगामापा चा विजेता जसराज जोशी याच कार्यक्रमात चमकून गेला होता
दाटून कंठ येतो हे गाणे त्याने इतके भावपूर्ण म्हटले होते की फयाज यांच्या डोळ्यात कधी पाणी आले व आमच्या आईच्या सुद्धा कळलेच  नाही .
थोडक्यात आजकालच्या predicted जगात काहीतर न ओळखता येणारे कार्यक्रम कमीच. यात हा कार्यक्रम नक्कीच गणता येईल
सो ... हृदयाला भिडणारा संवाद आणि थेट हृदयप्रिय कलाकारांबरोबर म्हणूनच म्हणतो हे काही जणू नाजूक ओपन हार्ट करण्याजोगे आहे ..
तर हीच ती वेळ आणि हाच तो क्षण..... पहायला विसरू नका J
  
जयदीप भोगले
२६ . २. २०१३ 



Thursday, February 21, 2013

सिनेमा सिनेमा !!!!

सिनेमा सिनेमा !!!!

मित्रानो !!!
फार दिवसांनी काही लिहावे वाटत आहे .
आता मी लिहिले नाही म्हणजे लोकसत्ता आला नाही किंवा झी मराठी पहिले नाही अशी चुटपूट तुम्हाला
नक्कीच वाटणार नाही . पण माझा खरडणे बऱ्याच जणांना बरे वाटायचे ( कोकणस्थी “बरे” म्हणजे  चांगले !!!)
असो !!! ताकाला जाऊन भांडे लपवण्यापेक्षा मुद्द्याला हात घालतो
सिनेमा सिनेमा !!! म्हटलं की ज्या लोकांना चंदेरी दुनयेची आवड आहे त्यांना लगेच “ पाहिलेला पहिला सिनेमा “ पाहिलेला -- बालक पालक ( बी पी), वीकेंड ला पाहिलेला सिनेमा अस समोर येऊ शकते. 
मी  लहानपणापासून सिनेमाचा फार शौकीन!!!
सिनेमा चांगला किंवा वाईट हे ठरवण्यासाठी एकदा तो पाहावा लागतो हे वाटणारा
नुसती टायीम्स चे स्टार आणि मसंद च्या पसंदी बरोबर माझी पसंद जुळवून घेणे म्हणजे दुकानात जाऊन साडी घेणाऱ्या बाईसारखे झाले . तुमच्यावर चांगली दिसेल म्हंटले की भिकार साडी सुद्धा घ्यायची आणि पाकीट हलके करायचे .

तर सांगायचा मुद्दा असा लहानपणापासून मी वेगवेगळ्या प्रकारे सिनेमा पहिला.वेगवेगळ्या गावाला …  विचार केला  लिहावी त्याची  गम्मत … 
गावातला  सिनेमा
मी लातूर मध्ये राहायचो घरात सिनेमाची खूप आवड . पप्पा कधीही दौऱ्यावरून आले की म्हणायचे चला सिनेमाला त्यावेळी जाम खुश व्हायचो कारण पप्पांबरोबर बाल्कनी वर बसायला मिळायचे. 
पण खरी मजा यायची सिनेमा मित्रांबरोबर पाहायला. मी गल्ली मध्ये राहायचो आणि आमचे सगळे मित्र कडके त्यामुळे कायम बाल्कनी सोडून थर्ड क्लास ला एकाला स्पोन्सर करून सिनेमा पाहावा लागायचा . आणि मग पुढच्या सीटवरून टपोरी पोरात सिनेमा पहायचे वेगळे थ्रिल असायचे . त्या फायटिंग ला शिट्ट्या . “ लघवी ची गाणी”) म्हणजे गाणी चालू झाली कि खालचा क्लास कायम बाहेर जायचा मला ते आजतागायत कळले नाही पण त्यामुळे जरा गर्दीत उकाडा कमी व्हायचा.
पुढची पब्लिक श्रीदेवी माधुरीला दाद द्यायला चिल्लर उडवायची . ते जाम आवडायचा पण बरेच दिवस कधी तसल माझ धाडस झाला नाही .. मग मी सैलाब सिनेमात पहिल्यांदा १ रुपयाची चिल्लर २० २० पैशाची पाच नाणी उडवली आणि काहीतरी जग जिंकल्याचा अनुभव घेतला. पण हे धाडस पन्नास वेळा अंधारात आपल्या बाजूला कोणी नाही हे पाहून केलेले त्यामुळे अजून धमाल . आजही हमको आज कल है ऐकला कि माझा पाहिलं धाडस समोर याते.
मल्टीप्लेक्स संस्कृतीत कदाचित असभ्य वागणुकीबद्दल आपल्याला बाहेर काढण्यात सुद्धा येऊ शकेल पण “वाजले कि बारा” पाहताना फेटा उडवण्याची धमाल जशी एखद्या रांगड्या गाड्याला येते तीच  चिल्लर उडवायला येते हे सभ्य लोक काय समजणार.
 ते गर्दीत जाऊन काढलेले तिकीट  . डोअर कीपर च्या ओळखीने तिकीट , लेडीज ला विनंती करून काढलेले तिकीट,.शाळेतल्या मैत्रीनीला भीत भीत विचारून आपले काढलेले तिकीट , पावसात उभा राहून काढलेले हम सिनेमाचे तिकीट.आणि ब्ल्याक ने काढलेले तिकीट. यामुळे सिनेमा तिकीट काढण्यापासून थ्रिल्लिंग असायचा . पहिल्या दिवशी पहिला शो आणि त्याला मिळालेले तिकीट कदाचित पहिल्या पगारापेक्षा मला आवडलेले आहे . कारण हाउसफुल शो मध्ये आपण एक आहोत याचा आनंद . चुकून माकून एखादा दुसरा मित्र विना तिकीट परत जात असला तर कोण आनंद!!!

विडीओ पार्लर सिनेमा
१९८५ ९० पर्यंत आमच्याकडे ५ ते ७ रुपये बाल्कनी असायची तरी आधी सांगितल्याप्रमाणे कडकीनंदन लोकांमुळे दीड रुपयात नव्या सिनेमाचा आनंद छोट्या पडद्यावर मी विडीओ पार्लर ला घ्यायचो यात आधी गाणी सुद्धा लागायची अर्धा तास आणि नंतर सिनेमा. आमच्या गावात नवीन सिनेमा रिलीज ला VIDEOला यायच्या. त्यामुळे व्ह्यल्यू फॉर मनी असा काहि म्हणतात तसा काहीतरी वाटायचा
२ चार वेळेला मी पाहिलेला अनाडी १०० डेज सुपरहिट झाल्यामुळे मी VIDEOला पाहिलेले सिनेमा सुपरहिट होतो अशी अंधश्रद्धा हि मी बाळगून होतो पण रूप कि रानी चोरो का राजा पाहिल्यावर माझा हा भ्रमाचा भोपळा फुटला .
अशाच या पार्लर मध्ये मला JACKY चेन , बॉंड यांची ओळख झाली आणि मी इंग्रजी सिनेमे पाहतो अशी आमच्या वर्गात कुख्याती व्हायला लागली( मराठी मध्यम!!!) . मी गल्लीत राहायचो आणि अभ्यासात पहिल्या पाचात असायचो तरी माझा नेहमी मागच्या बाकड्याचा ग्रुप होता . कॉलनी मधल्या पुस्तकी किड्यांना  “ स्कॉलर GANG” ला मी वाया गेलो आहे असे वाटायचे पण मी टर्मीनेटर ची स्टोरी सांगताना हीच पोर चोरून चोरून ऐकत बसायची. मी तिथे भाव खाऊन जायचो.
अशा पद्धतीने मी ज्यावेळी इंजिनीरिंग ला गेलो त्यावेळी  माझा सिनेमा थोडा बदलला!!!
केरळ चा सिनेमा
आमच्या कॉलेज च्या क्लब मध्ये ६ रुपयात सिनेमा दाखवायचे आणि ऑडी मध्ये खुर्च्या नवत्या मग आम्ही वर्तमानपत्र घेऊन जायचो आणि पाहायचो
पण आपल्या मित्रामध्ये पाहिलेला सिनेमा असा रॉयल वाटायचा. मग मी आईने दिलेली सतरंजी नेऊन थोडी राजेशाही बैठक सुद्धा बनवू लागलो . सगळी आमची पोर असा राजेशाही बसायची
आमच्या रागिंग मध्ये तेजाब आला होता तेव्हा आम्हाला पूर्ण स्टोरी विथ संवाद लिहायला सांगितली होती सिनिअर्सनी!!! तो तेजाब जगावेगळा होता
“ तेरी जिंदगी और मौत के बीच का फसला मुन्ना के चाकू कि धार से ज्यादा नाही है “ हा डायलॉग अजूनही मला तितकाच स्पष्ट आठवतो.
डॉल्बी तेव्हा नवीन प्रकरण होता . आम्ही क्राऊन नावच्या टाकीज ला पहिल्यांदा इंडिपेंडन्सडे पहिला त्यावेळी असा आवाज आयुष्यात पहिल्यांदा ऐकला होता आणि ३० रुपये सिनेमला सुद्धा पहिल्यांदा दिले होते.
कॉलेज पासून सिटी ३० किमी लांब होती  त्यामुळे रात्रीचा शो पाहायला आम्हला जीप करावी लागायची
एका महिंद्र जीप मध्ये आम्ही १० जन बसायचो “पुन्हा कडकी” त्या शो ला आम्ही जीप शो असा नाव ठेवलेले. शुक्रवारी २ तरी जीप जायच्या.
दिल से , सत्या ,दिल तो पागल  हे जीप शो ने पाहिलेलं काही सिनेमे
आम्ही शनिवारी ज्यावेळी जायचो तेव्हा एक हिंदी एक इंग्लिश असा सिनेमा पाहायचो नंतर थोडी ब्रांडी आणि मग पान आणि मग कॉलेज ला बस ने परत .
हा लोडेड सिनेमा सुद्धा जाम लक्षात राहायला.

पुण्याचा सिनेमा
कॉलेज नंतर नोकरीच्या शोधात जेव्हा पुण्यात आलो त्यावेळी नारायण पेठेत बस्तान मांडला एकदम
आयडियल जागा . विजय , अलका , प्रभात , डेक्कन चार चार टाकीज चालण्याच्या अंतरावर
इथे मी जाम इंगर्जी सिनेमे पहिले आणि तितके मराठी सुद्धा
दादा कोंडके च्या वाढदिवसाला पाहिलेला सोंगाड्या “ ४५ वर्षानंतर सुद्धा हाउस फुल जी मजा आली होती ती कदाचित कुठल्या दुसर्या मराठी सिनेमाला आलेली
मग सिटी प्राईडचा खूळ आला होता . स्क्रीन १ स्क्रीन २ . सिनेमाच्या न लक्षात राहणाऱ्या वेळा असा काहीतरी होता.
पण राहुल ला पाहिलेला लगान , डेक्कन ला पाहिलेला गदर आणि विजय चा GALDIATOR मनात घर करून गेलेले

दिल्लीचा सिनेमा
मल्टीप्लेक्स चे पीक आता भरपूर आले होते WAVE सिनेमा PVR वगैरे ही नाव पचनी पडली होती
सिनेमाला आधी जाऊन तिकीट काढायचे असते . बुकिंग करायचे असते. सेटर सीट्स . मैत्रीण असली कि कॉर्नर सीट असली काय भानगड असते जमाय्लागली होती
माझ्या लहानपणी अख्या वर्षात पाहिलेल्या सिनेमाचा तिकिटाची बेरीज दळभद्री पॉपकोर्न ला द्यावी लागत होती.
पण यात सुद्धा मी माझे दोन मित्र दर शनिवारी सिनेमाला जायचो . पॉपकोर्न टब घ्यायचो .आणि या मैत्रीमुळे बंटी आणि बबली , ब्लड डायमंड असे सिनेमे कायम लक्षात राहिले
सिनेमाची वेळ नऊ पासून ११ पर्यंत वाढलेली होती .

मुंबईचा सिनेमा
अस सगळ करून मी मुंबईच्या चंदेरी दुनियेत आलो . वाटला मुंबईत म्हणजे सिनेमाची मजा
पण नंतर कळले कि आपण पेपरात वाचलेले स्टर्लिंग, प्लाझा , रिगल पुष्कळ लांब असतात सिनेमा आपल्या सबर्ब मध्ये जवळ कुठे असतो हे त्या १०० सिनेमा थियेटर च्या यादीतून हुडकायचे असते
तीन दिवसात पाहिला तर पाहिला नाही तर तो शो नसायची शक्यता असू शकते
ऑफिस मधून यायला उशीर होत असल्यामुळे ११ चा शो पेक्षा ११.१५ चा शो असतो का रात्री हे BLACKBERRY वर चेक करावे लागते
सिनेमा अनुभव या जाहिरातीखाली १००० रुपये सुद्धा तिकीट असू शकते.

आजचा सिनेमा 

पूर्वी मी उभा राहून सुद्धा आवडीने सिनेमा पहिला. आता झोपून पाहता येतो ( थोडक्यात पाहता पाहता झोपून सुद्धा जाता येते इतका सिनेमा भिकार असू शकतो)
ऑन लाईन जाऊन तिकीट बुक करता येते कारण तुम्हाला तुमची सीट बुक करता येते.
पण याला गर्दीतून तिकीट मिळून शेजारी आपला मित्र भेटणे . आपल्या कॉलेज ची मुलगी तिकीट काढताना दिसल्यावर ती शेजारी येईल का ही प्रार्थना करणे असले अनुभव फक्त जुन्या कप्प्यात राहून गेले आहेत
१०० करोड चे गणित ,अगणित टाळ्या पेक्षा सिनेमा निर्मात्याला जास्त आकर्षक वाटू लागले आहे याला वाढलेल्या थियेटर ची संख्या , सिनेमाची तिकिटे , लोकांचे सुट्टी च्या दिवशी सिनेमा पाहण्याचे प्रमाण हे कारण आहे  ..
पण २५ आठवडे झालेला साजन जेव्हा हार घातलेल पोस्टर पाहून अजून एकदा हाउस फुल व्हायचा तोच आता २०० कोटी कमावलेला एक था... होतो का? होईल का ?
आजकाल एस एम एस ने फोडलेला सस्पेन्स -जुन्याकाळी पेपर मध्ये “ सुरवात चुकवू नका आणि शेवट कुणाला सांगू नका” या जाहिरतेपेक्षा गतिमान झाला आहे.
सिनेमा पाहून आलेला माणूस जुन्या चकाळात गुणगुणत असलेल्या गाण्याने , घरात पाउल ठेव्तानाच्या वेळेमुळे किंवा आपल्या शेजाऱ्याने पाहिल्यामुळे पकडला जायचा.
आता या प्रकारची भीती नाही सिनेमाची उत्सुकता नाही ( प्रमोशन कैक प्रमाणात वाढून सुद्धा)
सिनेमाचा थ्रिल राहिला आहे का नाही मला नेहमी प्रश्न पडतो . हा विचार एक अंगी असू शकेल. कदाचित आजचा कॉलेज कुमार जास्त प्रकाश टाकू शकेल.

पण तरीही मी वेळात वेळ काढून सिनेमाच्या वेळा पन्नास वेळा पडताळून ( इतका मी लॉग टेबल सुद्धा पहिला नाही  इतका ) सिनेमा पाहतो
इंग्लिश विन्ग्लीश, आणि प्रेमाची गोष्ट जेव्हा मी हाउस फुल शो ला पहिला त्यादिवशीपासून असा काहीतरी लिहावा असा मनात होता
त्याला आज  गुगल काकांनी शब्द दिले ...

प्रत्येकाच्या आयुष्यात असा काही सिनेमा असतो आणि तो तुमच्या सुद्धा असणार . त्यामुळे कुठेतरी जरा सिनेमा राईड मारून पहा.. नक्की मजा येईल


जयदीप भोगले
२१ . 0२ . १३ 

एव्हरेस्ट

 ज्याचे त्याचे एव्हरेस्ट एव्हरेस्ट अस शिखर एकच नसतं प्रत्येक माणसाचं एव्हरेस्ट वेगळं असतं उंची कमी जास्त असेल समाजात शिखराची पण सर केल्यावरच...