कार्यक्रम - ग्रेट भेट
वाहिनी - आय बी एन लोकमत
वेळ - शनिवार ९ .३० रात्रौ, रविवार दुपारी १२

आय बी एन वाहिनीवर प्रक्षेपित होणारा ग्रेट भेट या कार्यक्रम तसा सुरु होऊन बरेच दिवस झाले पण गेले काही रविवार मी नियमित बघत असतो.नियमीतपणा हा सवयीमुळे किवा आवडीमुळे निर्माण होतो असे म्हणतात
यात आपल्याला ज्यांच्याबद्दल जाणून घ्यावे वाटते , ज्यांनी आपल्या क्षेत्रात विशेष उंची गाठली आहे अशा काही दिग्गज सेलेब्रिटीबरोबर निखील वागळे दिलखुलास बातचीत करतात. मी ते त्यांची मुलाखत घेतात असे म्हणणार नाही कारण मुलाखती इतकी औपचारिकता न आणता पण समोरच्या व्यक्तीच्या आदराच्या स्थानाला धक्का न पोहचवता ते एक एक पान उलटत जातात असे वाटते. भेट मग राजकारणासारख्या रुक्ष भासण-या क्षेत्रातील दिग्गजांची असो की नाट्यक्षेत्रात , चित्रपट क्षेत्रासारख्या चंदेरी दुनियेतील असो ती तितक्याच सहजतेने आणि कलात्मक पद्धतीने पुढे जाते ही या कार्याक्रमची खासियत वाटते.
गप्पा होताना निखील वागळे कुठेही त्या व्यक्तिमत्वाच्या आड येतात असे वाटत नाही . हिंदी वाहिनींवर बर-याच वेळा मला असे प्रकर्षाने जाणवते की मुलाखातकाराची उंची आणि स्तर वाढवा आणि त्याच्या कौशल्याचे कुठे तरी मूल्यमापन व्हावे म्हणूनच की काय उत्तुंग व्यक्तींना बोलावण्यात येते आणि ह्यांची सिधी बात कधी वाकड्या वळणावर जाते ते कळतच नाही बहुदा ती सरळ रस्ता गाठतच नाही.कार्यक्रम अगदीच व्यावसाईक नसल्यामुळे घाईत लोकल पकडल्यासारखे ब्रेक घेण्याची इथे पद्धत नाही. आणि निखील वागळे आजचा सवाल यात घणाघाती शब्द घाव घालत असले तरी इथे कुठेतरी परिपक्व होऊन आपण कदाचित भेटीला येणा-या व्यक्तीचे स्वगत ऐकत आहोत इतक्या मुक्तपणे कार्यक्रम पुढे नेतात.
कार्यक्रमातील व्यक्तींची निवड अगदी त्या चपखलपणे केलेली असते. मी निवडणुका असतना मा. शरद पवार, मा. राजसाहेब ठाकरे. आणि इतर सर्व पक्षांच्या प्रमुख व्यक्तींची भेट बघितली आणि ती माणसे वेगळ्या पक्षाची आहेत एवढीच वेगळी वाटली त्यांची कामाची जिद्द , त्यांचा दृष्टीकोन हा सर्व कुठेतरी दिसून आला. त्यांची उंची आपल्या आपल्या जागी श्रेष्ठ आहे असे कुठेतरी वाटुन गेले . खरेतर निवडणुकींच्या काळात अशा पद्धतीने मुलाखत घेणे मला अवघड वाटते. (मी मुलाखत घेणारा नसलो तरीही )
जयदीप भोगले
डॉक्टर लागूंची मुलाखत , शोभा दे यांची मुलाखत या मला विशेष आवडल्या कदाचित मला त्या क्षेत्राबद्दल आवड आहे किवा कुतूहल आहे म्हणून सुद्धा असेल .पण बाकी ग्रेट भेटी सुद्धा मला तितक्याच भावून गेल्या., कुठेतरी हव्या हव्याशा वाटून गेल्या .
मूल्यमापनच करायचे झाले तर ई टी वी वरचा संवाद हा एकाच कार्यक्रम कदाचित याच्या स्पर्धेत टिकू शकेल किंवा कदाचित थोडा वरचढ ठरेल असे मला सांगावे वाटते .पण त्यामुळे याची गुणवत्ता कुठेही कमी पडत नाही
येत्या रविवारी नुकतेच काळाच्या पडद्याआड गेलेले दिवंगत आ. नारायण सुर्वे यांची पुर्वासंग्रहित ग्रेट भेट असणार आहे हे मला वाहिनीच्या संकेतस्थळावर कळाले. आपण माझ्या मतांशी सहमत असाल किंवा या लेखामुळे आपले भेटीबद्दल कुतूहल वाढले असेल, तर चला तर मग ... वाफाळलेल्या चहाच्या कपाबरोबर एका नवीन भेटीला ... जयदीप भोगले
No comments:
Post a Comment