Tuesday, September 14, 2010

सुहाना सफ़र--(हिंदी आरी इल्ला ... मल्यालम आरियो?)

मित्रानो ,प्रत्येक कविता लिहिताना काहीतरी पार्श्वभूमी असते आणि कोणीतरी प्रेरणा असते असे म्हणतात आणि ते काही खोटे नव्हे .
ही माझी अगदी पहिली वहिली म्हटली तरी चालेल अशी कविता आहे . पण हा प्रसंग अगदी मजेशीर आहे . आता मी मजेशीर म्हणतो आहे पण त्यावेळी काही तसा वाटला नाही..  
 मी कालिकत ला शिकायला होतो इन्जिनीरिंग ला  . जयंती एक्सप्रेस ने जायचो सोलापुरहून.. म्हणजे लातुरहून सोलापूरला ट्रेन पकडायला जावे लागायचे .. .
मी साइड लोअर बर्थ वर होतो  ३ जानेवारी १९९९ ची गोष्ट  .. सकाळ झाली.. गाड़ी केरळ मध्ये आली होती . आपल्या भारतीय रेलवे मध्ये पद्धत आहे की स्लीपर क्लास सकाळी अचानकपणे जनरल डब्या प्रमाणे वागायला लागतो.अचानक ७२ जनाचा डबा १७२ जनांचा भासु लागतो ..पण भारतात नेहमी ( प्लीज अडजस्ट..)  करावे लागते. मला पायाला काहीतरी लागल्यासारखे जाणवले म्हणून उठून बसलो आणि अचानक उठल्यानंतर होणारी चीड चीड  एकदम नाहीशी झाली ( समोर टी सी किंवा पोलिस होता म्हणून नव्हे ) पण एक सुंदर तरुणी माझ्या शेजारी म्हणजे पायाशेजारी बसलेली होती.ही अनुभूति मी किती तास घेत होतो कोण जाणे..
 मी हळूच पांघरलेल्या शालित लपवत चिमटा काढला ( स्वत:च्या  हाताला ) की हे स्वप्न तर नव्हे ?. एरवी एकदम ओस असणारी रेलवे आज एकदम पावसाळ्यात हिरवी झाली होती. पण मला एकदम त्या यौवनाचे म्हणतात तसे चटके बसत होते . अहो वयाच्या १९ वर्षी असे होणार नाही का?  .. रेलवे ला आगगाडी का म्हणतात आता मला कळू लागले होते.
मी पटकन पाकिजाचा सीन आठवला.. पण हा काही पाकीजा नव्हे असे काही मला जाणवले नाही  आणि फार जास्त स्वप्नाळू  बनुन लेखणी हातात घेउन ख़ाली लिहलेली कविता खर खर लिहून काढली मला वाटले आता मी राजकुमार का कोण होणार ...पकिजातला..कविता हिंदी मध्ये लिहिली होती  


ये जर्द है आँखे 
बेदर्द हो तूम
पास होके भी क्यों  दूर हो तुम
चुपचाप हो क्यों गुमसुम हो तुम 
   
ये शीतल सी नजर
पर शोला हो तुम
ठंडी जलन सी है
पर चन्दन हो तुम
सात सुरों की बौछार हो तुम
मगर,चुपचाप हो क्यों गुमसुम हो तुम

अँधेरे का कोई आफताब हो तुम
सेहरा की हरियाली हो तुम
सोने में जादा हीरा हो तुम
सफ़र में घायल हो गए हम
मगर दवा हो तूम दवा हो तुम 

 आता ही कविता लिहली पण कवितेला दाद मिळाल्याशिवाय मला काही चैन पडेना. आता मी एकटाच प्रवास करत होतो मला एकदम कविता सुचली, ही टिमकी गाजवण्यासाठी मित्र ही जवळ नव्हते. मग मी एकदम धाडस करून त्या ललनेला सांगायचे ठरवले. जरा इकडे तिकडे अंदाज घेतला की तिचा भाऊ , मामा , वडिल काही दिसत तर नाही ना ... पण तशी खत्री पटल्यावर मी जरा गाल मागे करून ( उगीच रिस्क नको ) हलों म्हणालो .. मग कुठे जाणार वगैरे विचारपूस केली .. आणि मग जीव मुठीत घेउन घाबरत म्हणालो .'मैडम मैंने आपसे इंस्पायर होके एक कविता लिखी है क्या आप सुनना चाहोगी ?'


मैडम थोड्या हसल्या आणि सुंदर स्वप्नात असताना ,अचानक पाणी फेकल्यासारखे म्हणल्या ( हिंदी आरी इल्ला ... मल्यालम आरियो ?) अचानक मला काय सांगावे, हसावे का रडावे असा प्रश्न पडला .. मी पचका झाल्याचा हावभाव ना आनु देता तिला म्हणालो इट इज ओके ... आणि या सकाळी झाल्येल्या औट घटकेच्या देवदासाने चहाचा कप हातात घेतला .
अजुन सुद्धा मी कविता करण्याचा प्रयत्न करतो पण आगगाडी मध्ये बसल्यावर लोअर साइड बर्थ कधीही बुक करत नाही .
जयदीप भोगले
  

No comments:

Post a Comment

31 डिसेम्बर

  31 डिसेंबर मला भारी अजब वाटते  कधी मागच्या वर्षाचा कॅलिडोस्कोप   तर कधी नवीन वर्षाची दुर्बीण वाटते तिला पहिल्या भेटीची भाषा कळते नव्या काम...